या जागेविषयी खूप जणांकडून ऐकले होते. खूप उत्सुकता होती म्हणून एकदा ठरवून आम्ही तिथे बघायला गेलो. ती इमारत बाहेरून पाहिल्यावरच आम्ही थक्क झालो, कारण ही इमारत जरा वेगळ्या आकाराची आणि इतकी सुंदर दिसत होती; त्यामुळे कधी एकदा आत मध्ये जाऊन बघते असे झाले. ही इमारत म्हणजे एक सार्वजनिक वाचनालय आहे.
Carl Deichman हा 17व्या शतकात नॉर्वे मध्ये राहणारा एक व्यापारी होता आणि बुक कलेक्टर होता. त्यांनी सहा हजार हून अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता. त्यांच्या पुढाकाराने 12 जानेवारी 1785 मध्ये वाचनालय सुरू झाले आणि त्यानंतर शंभर वर्षांनी त्याला सार्वजनिक रूप आले. आजही या मुख्य वाचनालयामध्ये Carl Deichman यांची मूळ ग्रंथसंपदा जपून ठेवली आहे. या मुख्य वाचनालयाव्यतिरिक्त Oslo मध्ये याच्या 20 पेक्षा अधिक शाखा आहेत. त्यातील एका शाखेमधून आम्ही नेहमीच पुस्तके वाचायला आणतो, पण मूळ शाखेत जाण्याचा योग आता आला.
आम्ही आत गेल्यावर तिथली व्यवस्था आणि आकर्षकता बघून आमचा विश्वासच बसेना की हे सार्वजनिक वाचनालय आहे. आत शिरल्यावर एक मोठा हॉल होता. तिथे आमचे लक्ष वेधून घेतले ते “100 colours theme” ने. त्यात शंभर रंगांच्या विविध रंगछटा असलेले हजारो चौकोनी कागद दोऱ्यांना अडकवले आहेत, ज्यावर दहा हजार अक्षरे कोरली आहेत. आणि मजा म्हणजे त्याकडे बारकाईने पाहिलं तर दोन मुली आणि एक मांजर यांच्या आकृत्या लपलेल्या दिसतात. त्या मोठ्या हॉल मध्ये एका बाजूला संपूर्ण वाचनालयाच्या विभागांची माहिती देणारे फलक ठेवले होते. एके ठिकाणी पुस्तक घेणे आणि परत करण्याचा कक्ष होता. इथली पद्धत ही भारतातल्या पद्धतीपेक्षा खूप वेगळी आहे. तुम्ही वाचनालयाचे सभासदत्व घेतल्यावर पुस्तक घेताना एक मशीन असते त्यावर पुस्तक आपण आपलंच स्कॅन करायचं(म्हणजे नुसते त्या टेबल वर ठेवायचे!) त्यानंतर त्याची रिसीट आपल्याला ऑनलाईन मिळते आणि पुस्तक परत करताना पण पुस्तक स्कॅन करून आपण ते एका मोठ्या पेटीत ठेवायचे असते. महत्वाचं म्हणजे इथे नॉर्वे मध्ये वाचनालय मोफत आहे (अर्थात इथला income tax च खूप जास्ती असतो, ज्यात ह्या “मोफत” सुविधा मिळतात).
नंतर आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. ही 6 मजली इमारत आहे. तिथे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले monitors पाहिले, ज्यामध्ये आपल्याला हवे असलेले पुस्तक या वाचनालयामध्ये आहे की नाही आहे ते आपण पाहू शकतो. तिथे पण निरनिराळे विभाग होते. लहान मुलांसाठी पण खूप छान छान गोष्टी होत्या, म्हणजे बसण्याची व्यवस्था, विविध प्रकारची पुस्तके अगदी लहान मुलांना आकर्षित करेल अशीच होती. एका ठिकाणी एका मोठ्या स्क्रीनवर Talking Plants नावाचा एक व्हिडिओ लावला होता. हा व्हिडिओ खास करून वाचनालयाच्या उद्घाटनासाठी बनवला होता. बारा निवडक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संगीतकारांनी याच्यामध्ये एकत्रित काम केले आहे. Simone Hooymans यांनी हाताने ही चित्रे काढून याचे ॲनिमेशन केलेले आहे. ते ॲनिमेशन इतके सुंदर होते की फक्त लहानांनाच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडेल.(हा लेख संपल्यावर त्या व्हिडिओ ची लिंक मी दिली आहे.) नंतर पुढे एक संगीत कक्ष होता जिथे काही वाद्य ठेवली होती व ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी Online शिकण्याची सुद्धा सोय होती. एक लहान व्यासपीठ होते जिथे कलाकार येऊन सादरीकरण करू शकतील. शिवाय तिथे एक रेकॉर्डिंग रूम सुद्धा होती. नंतर आणखीन पुढे गेल्यावरती एक बुद्धिबळपट ठेवला होता. शिवाय एक-दोन ठिकाणी Video games असलेल्या खोल्या होत्या. एक Mini Cinema Hall होता. वेगवेगळ्या प्रकारच्या Study Rooms, Meeting Rooms पण होत्या. आणि खास करून सांगावेसे वाटते की खूप लोक या सर्व सोयींचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत होते ते आम्ही पहिले. नंतर एके ठिकाणी Panorama View नावाचा कक्ष होता जिथून बाहेरील आजूबाजूचा परिसर पाहता येत होता. शेजारी असलेले Opera house, मुख्य रस्ता, fjord हे सर्व खूप छान दिसत होते त्यामुळे तिथून फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही. पुढे एक वेगळाच प्रकारचा कक्षा मला दिसला त्यामध्ये कोरे कागद, कोरी पाने असलेली पुस्तके ठेवली होती आणि प्रत्येकाने आपल्या कल्पनाशक्तीने गोष्टी लिहून किंवा चित्रे काढून तिथे ठेवता येण्याची सोय केली होती. ही कल्पना मी प्रथमच पाहिली. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन कल्पना असलेले विभाग इथे आम्ही बघितले. ह्या वाचनालयात एक रेस्टॉरंट आहे आणि एक दुकान पण आहे.
इथे यायच्या आधी आम्ही ठरवले होते की साधारणपणे अर्धा तास बघू आणि मग परत जाऊ. पण अर्ध्या तासाचे दोन तास कसे झाले ते आम्हालाच कळले नाही. ते दोन तास आम्ही एका वेगळ्याच विश्वात जाऊन आलो असे आम्हाला वाटले. तरी अजून खूप गोष्टी बघायच्या राहिल्या. जर सर्व गोष्टी बारकाईने बघायचे ठरवले तर एक दिवस सुद्धा कमी पडेल. म्हणजे फक्त वाचन नाही तर त्याचबरोबर संगीत, खेळ, चित्रपट व इतर अनेक अनेक क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आकर्षित होतील अशी व्यवस्था व सोयी करणे, थोडक्यात एका सार्वजनिक वाचनालयाचे पर्यटन स्थळ बनवणे हे कल्पनेच्या पलीकडचे आहे.
27.09.2022