मुक्काम पोस्ट Bogstadveien…

“प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे एक वळण येते की ते स्वीकारून तुम्ही पुढे गेलात तर तुमचे आयुष्य जास्त सुखकर आणि सोप्पे होते” असे मी ऐकले होते. पण शाब्दिकरित्या देखील हे तंतोतंत खरे ठरेल हे कधी वाटले नव्हते. पण गेले काही महिने, महिनेच काय पण जवळजवळ दीड वर्षे मी असा अनुभव घेत आहे.
अगदी सुरुवातीला Oslo मध्ये आल्या आल्या एक दिवस अचानक आमच्यासमोर आलेल्या एका वळणावरून चालत जाताना अनेक प्रकारची दुकाने असलेला एक रस्ता लागला. त्या रस्त्यावरून फिरताना तिथली गर्दी, ती सर्व दुकाने, तिथले उत्साही वातावरण खूप आवडले आणि मनात एक विचार आला की या भागात जर आपल्याला राहायला घर मिळाले तर किती छान होईल. कारण त्या काळात मी ज्या भागात राहत होते तिथे लोकं फारशी दिसायची नाहीत. त्यामुळे काय व्हायचे, की कधीतरी अचानक ओळीने पाच-सहा गाड्या एकामागून एक आल्या तरी गर्दी किंवा ट्रॅफिक आहे असे वाटे. मग अश्या वेळेस समोर आलेला एखादा गजबजलेला, गाड्यांनी, माणसांनी भरलेला भाग पाहून तर आधी मला भारताचीच आठवण आली. अक्षरशः मी या भागाच्या प्रेमातच पडले असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे इथे राहायला मिळावे अशी इच्छा मनात झाली. आता तुम्हाला सांगितले तर खोटे वाटेल पण आज हा लेख मी ज्या घरात बसून लिहित आहे व गेली दीड वर्ष मी ज्या घरात राहत आहे तोच हा मला आवडलेला भाग म्हणजे Oslo मधील “Bogstadveien” (बूगस्तावाएन)
जेव्हा आम्ही इथे राहायला येणार होतो तेव्हा काहींनी आम्हाला जरा सावध केले आणि सांगितले की तिथे खूप आवाज असतात, गर्दी असते. पण खरेतर त्याच कारणासाठी आम्ही इथे राहण्याचा निर्णय घेतला होता. ती सर्व गर्दी आम्हाला हवीहवीशी वाटत होती. आता या सर्व आवाजांची इतकी सवय झाली आहे की कधीतरी ट्राम बंद असल्याच तर होणारी शांतता नकोशी वाटते. आता तुम्हाला वाटेल की एखाद्या मोठ्या व्यक्तीची प्रशंसा केल्यासारखी काय या भागाची मी एवढी प्रशंसा करत आहे. त्याचे कारण कदाचित या लेखात तुम्हाला मिळेल. प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक घराची जशी एखादी गोष्ट असते तशीच गोष्ट या “Bogstadveien” ची देखील असेल असे मला वाटते. Oslo मधील मध्यवर्ती असलेल्या Majorstuen(मायूरस्टूएन) भागातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे Bogstadveien. त्याच रस्त्यावरील एका इमारतीत मी राहत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक इमारती, प्रत्येक इमारतीच्या खाली असलेली निरनिराळ्या प्रकारची दुकाने अगदी खाण्यापिण्यापासून, कपडे, सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या व गृहोपयोगी वस्तू अशा विविध प्रकारांनी नटलेली दुकाने हेच इथले वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कारण हा रस्ता म्हणजे Oslo मधील एक प्रसिद्ध “Shopping Street” आहे.
जसा जसा दिवस उजाडतो तसा तसा हळूहळू Bogstadveien देखील जागा होतो. पण ह्याला काही वेळा अपवाद देखील असतो ते पुढे तुम्हाला समजेलच. पक्षांच्या किलबिलाटाबरोबर हळूहळू गाड्यांचे, रस्त्याच्या मधून धावणाऱ्या ट्रामचे आवाज त्याच्यात मिसळतात. दिवसभर मग वेगवेगळ्या टप्प्यातील वेगवेगळी वर्दळ चालू होते. सर्वप्रथम सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांची, शाळेत, कॉलेजला जाणाऱ्यांची गर्दी दिसू लागते. एक प्रकारची घाई सतत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. काही वेळानंतर हळूहळू दुकाने चालू होतात. मग दुकानांमध्ये गडबड, धावपळ चालू होते. साधारणपणे नऊ नंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप रोजच्या ठरलेल्या ठिकाणी दिसू लागतात. मग रस्त्यावरील काही ठराविक कॅफे, बेकरी अशा वेगवेगळ्या ग्रुपने भरून जातात. उन्हाळ्याच्या दिवसात असाच एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आमच्या इमारतीसमोर असलेल्या एका बेकरी मध्ये रोज यायचा. रोज ठरलेल्या वेळेत सात आठ जण यायची. त्यातील काही जण काठी टेकत, काही wheel chair वरून यायचे. बेकरी बाहेर मांडलेल्या खुर्च्यांवर ते सगळेजण बसायचे. मी काही त्यांना ओळखत नव्हते पण रोज बघून चेहरे ओळखीचे झाले होते. त्या सगळ्यांचे वय जरी झालेले असले तरी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज पसरले आहे असे वाटायचे. एखाद्याकडे बघून आपल्याला देखील छान वाटेल असे ते सर्व चेहरे असायचे. सर्वांच्या जागा देखील जणू काही ठरलेल्याच होत्या असे ते सगळे त्या त्या जागेवरच बसलेले दिसायचे. साधारण तास-दीड तास झाल्यावर एक एक जण कमी कमी होत सर्व जण निघून गेलेले दिसायचे. परत दुसऱ्या दिवशी तेच उत्साही चेहरे, त्याच वेळेत, त्याच जागेवर बसलेले दिसायचे. पण आता थंडी चालू झाल्यापासून त्या सर्व जागा रिकाम्या दिसू लागल्या. तेव्हा मलाच जरा चुकल्याचुकल्या सारखे वाटले. कदाचित पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात परत ते सगळे चेहरे दिसतील. कोण असतील ते सगळे? एकटेच राहत असतील का अजून कोणी असेल त्यांच्याबरोबर? कदाचित एकटेपणा जावा यासाठीच रोज तासनतास येऊन वेळ घालवत असतील. असे सर्व प्रश्न माझ्या मनात आले. असे अनेक नवीन, जुने, काही सवयीचे, मुरलेले चेहरे या रस्त्यावरून येताना जाताना दिसतात. कोणी आनंदाने, हसतमुख चेहऱ्याने गाणी गुणगुणताना, तर कोणी थोडेसे दुःखाने आपल्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी आलेले दिसतात. प्रत्येक नवीन दिवशी नवीन स्वप्नं मनात ठेऊन धडाडीने कामावर जाताना काहींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. लहान मुले तर आपल्याच विश्वात इतके सुखी असतात व आनंदाने बागडत असतात की त्यांच्याकडे बघून आपण देखील आनंदी होऊन जाऊ. त्यांना नसते उद्याची चिंता किंवा कसलीच काळजी. खरंच लहान मुलांचा हा गुण आपण सगळ्यांनी घ्यायला हवा असेच त्यांच्याकडे बघून वाटते. या सर्व गर्दीमध्ये अजून एक भर असते ती रोज फिरायला घेऊन येणाऱ्या कुत्र्यांची व त्यांच्या मालकांची! आता त्या प्राण्याचे नावच कुत्रा आहे म्हणून मी तो शब्द वापरला. नाहीतर त्यांचे नाते हे आई-वडील व त्यांची गोड बाळे असेच असते. आणि हे त्यांच्या वागण्यातून देखील अधोरेखित होते. अनेक प्रकारची, अनेक आकारांची कुत्री इथे बघायला मिळतात. प्रत्येक दहा व्यक्तींमागे पाच-सहा जणांकडे तरी कुत्री असतातच असतात व नुसती असतातच असे नाही तर त्यांचे पालन पोषण, लाड, त्यांच्या सवयी या सर्वांकडेच ते खूप लक्ष देतात व त्यांचा छान सांभाळ करतात. कधी एखाद्या दुकानात जायची वेळ आली की त्यांचे मालक किंवा मालकीण कुत्र्याशी काहीतरी बोलतात आणि कुत्र्यांना दुकानाबाहेर बसवून स्वतः दुकानात जातात. कधीतरी त्यांचा गळ्यातला पट्टा खांबाला बांधतात पण कधीतरी मोकळे सोडून जातात. पण खरी मज्जा तर पुढेच आहे. ही कुत्री पण इतकी शांत व समजूतदार असतात की जागची न हालता आपल्या मालकाची प्रतीक्षा करत बसतात. बऱ्याचदा मालकांना दुकानातून यायला वेळ लागतो. मग कुत्री जरा अस्वस्थ होऊन जातात पण तरीही इकडे तिकडे न जाता तिथेच बसून वाट बघत बसतात. मग आपला मालक समोर दिसला की झालेला आनंद त्यांच्या डोळ्यात दिसू लागतो व पुढची दोन-तीन मिनिटे ते प्रेम व आनंद व्यक्त करण्यात जातात. असे हे गोड नाते रोज मला बघायला मिळते. नॉर्वे मधील लहान मुले व पाळीव प्राणी इतके शांत कसे काय हे कोडे मला अजून उलगडलेले नाहिये. अगदी कडेवर असलेले लहान मुल देखील इतके शांत व समजूतदार असते की कुठेही आरडाओरडा, दंगा, रडारड करत नाहीच उलट जे काही समोर दिसत आहे त्याचे निरीक्षण करण्यात ते गुंग असते, आनंदी असते. प्रश्नार्थक चेहऱ्याने जग जाणून घेण्याची चाललेली त्यांची धडपड कायम दिसून येते.
रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्या, बस, ट्राम, सायकल वरून जाणारे याबरोबरच चालायला तसेच पळायला आलेले देखील खूप जण दिसतात. अनेकदा टूरिस्ट बसची देखील ये-जा या रस्त्यांवरून होते. Season असताना तर इथे फिरायला आलेल्या माणसांची गर्दीच दिसू लागते. तेव्हा अतिउत्साही, काही थकलेल्या भागलेल्या चेहऱ्याची देखील यामध्ये भर पडते.
वर्षातून दोन वेळा या रस्त्यावर मोठे Car free मार्केट भरते. एका बाजूला असलेल्या Metro station पासून, दुसऱ्या बाजूला रस्ता जिथे संपतो त्या Slottsparken कडे जाणाऱ्या टोकापर्यंत हे मार्केट असते. Oslo मधील व Oslo च्या जवळपासच्या लहान मोठ्या गावांमधून खास करून ते मार्केट बघायला लोक येतात. सकाळपासून स्टॉल लावण्यापासून ते संध्याकाळी सर्व बंद होईपर्यंत हा रस्ता पादचाऱ्यांनी ओथंबलेला असतो. पण एकदा का तो दिवस संपला की त्यानंतर संध्याकाळी पसरणारी शांतता मात्र कधीकधी नकोशी वाटते. हिवाळ्यामध्ये नाताळच्या आधी हा संपूर्ण रस्ता lighting मुळे लखलखून जातो तेव्हा एक वेगळाच माहोल अनुभवायला मिळतो.
हे सर्व असे असले तरी या गर्दीची दुसरी(नकोशी) बाजू देखील आहे. सुरूवातीला मी सांगितले की दिवस उजाडतो तसा Bogstadveien जागा होतो पण त्याला काही अपवाद असतात. कारण बऱ्याचदा रात्र होऊन आपला दिवस संपला असला तरी स्वतःला अतीहुशार समजणाऱ्या, व्यसनाधीन झालेल्या काही ठराविक व्यक्तींचे दिवस संपता संपत नाहीत आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्यातील विविध कला, गाणी यांचे प्रदर्शन करण्याचा इतका उत्साह आलेला असतो की आजूबाजूला घरे असल्याचा, झालेल्या वेळेचा त्यांना विसर पडतो. आणि मग आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे हे सर्व ऐकून घेण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. पण म्हणतात ना जे चांगले आहे त्याकडे लक्ष द्या आणि पुढे चला. त्याचप्रमाणे काही वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले चांगले. पण खऱ्याअर्थी इतक्या मध्यवर्ती भागात, अनेक सोयी असलेल्या भागात राहण्याचे सुख थंडीमध्ये, अती बर्फवृष्टी झाल्यावर जास्त जाणवते. थंडीमध्ये कितीही लवकर अंधार पडला, बर्फ अगर मुसळधार पाऊस जरी झाला आणि घराबाहेर पडणेही अशक्य झाले तरी खिडकीतून खाली बघितल्यावर थोडीफार वर्दळ आणि अनोळखी का होईना पण थोडीफार माणसे दिसली की एक प्रकारचा दिलासा वाटतो. (या वाक्याचे महत्त्व हे फक्त अश्या वातावरणात राहिलेल्या, राहत असलेल्या किंवा असे अनुभव घेतलेल्या लोकांनाच कळू शकते. नाहीतर काहींना हे नुसते शाब्दिक खेळ वाटू शकतात.) आणि हा असा दिलासा Bogstadveien कित्येकांना वर्षानुवर्षे देत आला आहे आणि देत राहणार आहे. अशी कितीतरी ठिकाणे असतात की जी नवीन आलेल्यांना, अनेक पर्यटकांना पटकन आपलेसे करतात, मोहवून टाकतात, अनेक गोड आठवणी निर्माण करतात. अशी ठिकाणे पटकन विसरता येत नाहीत. माझी देखील अशी अनेक आवडती ठिकाणे आहेत. त्यातील एक ठिकाण म्हणजे Bogstadveien!!! आणि कदाचित हे सर्व वाचून आता तुमचे सर्वांचे देखील. बरोबर ना???

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
4.11.2024

1

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links