काही ठिकाणे अशी असतात की एकदाच काय पण कितीही वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळी तितकीच सुंदर भासतात. अशा ठिकाणांचे वर्णन करणे जरा कठीण जाते. त्याबद्दल लिहिताना काय व कुठून सुरू करू हे समजत नाही. असाच एक देश आहे Croatia!!!
Croatia ला जाताना मनात खूपच उत्सुकता होती कारण खूप जणांकडून या देशाबद्दल ऐकले होते, काही फोटो, व्हिडिओ पाहिले होते. शिवाय नॉर्वेतील थंडीपासून दूर आता छान उन्हात जायला मिळणार या कल्पनेने देखील आम्हाला छान वाटत होते. Oslo ते Amsterdam व Amsterdam ते Zagreb असा आमचा प्रवास होता. Amserdam ला उतरताना ट्यूलिपची फुले दिसतात का ते मी बघू लागले पण नुकताच हिवाळा संपल्याने फुले काही दिसली नाहीत. एक वर्षांपूर्वी Easter च्या सुट्टीत आम्ही Amsterdam ला गेलो होतो त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. (Amsterdam बद्दल लिहलेल्या लेखांची लिंक हा लेख संपल्यावर खाली देते.) Adriatic समुद्राच्या काठावर वसलेला Croatia हा एक सुंदर देश आहे. Slovenia, Bosnia and Herzegovina, Hungary, Serbia यांनी वेढलेला हा देश आहे. येथील खाद्य संस्कृती मध्ये देखील विविधता दिसून येते. कला, इमारतींची रचना यामध्ये आजूबाजूच्या देशांचा प्रभाव दिसून येतो.
Oslo पासून साधारण पाच-सहा तासाचा प्रवास व मधला वेळ पकडून आम्ही रात्री उशिरा Zagreb ला पोहोचलो. Zagreb ही Croatia ची राजधानी आहे. Sava नदीच्या काठी वसलेले हे Croatia मधील सगळ्यात मोठे शहर आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून आम्ही निघण्यासाठी तयार झालो. आम्ही राहात होतो त्या घराच्या मागच्या बाजूला एक छान छोटीशी बाग होती. तेथील झाडाला आलेली गुलाबी रंगाची फुले खूपच सुंदर दिसत होती. तेवढ्यात आमची टॅक्सी आली मग आम्ही निघालो. हवेत थोडा गारवा जाणवत होता. मधून मधून ढग दिसत होते त्यावरून कुठेतरी पाऊस सुरू झाला असावा असा आम्ही अंदाज बांधला. तिथून निघाल्यावर साधारण एक-दीड तासानंतर वाटेतच Rastoke नावाचे एक गाव लागले. रस्त्याला लागूनच असलेल्या पायऱ्या उतरून आम्ही जात असतानाच एकंदरीत तिथल्या सौंदर्याचा अंदाज आम्हाला आला. एका बाजूला असलेली पायवाट, मधून वाहणारी नदी व पलीकडच्या बाजूला अनेक लहान लहान धबधबे, नदीच्या काठावरील झाडे, लहान मोठी कौलारू घरे बघतच अक्षरशः या जागेच्या आम्ही प्रेमातच पडलो. ट्रिपच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीची छान जागा बघितल्यावर पुढे दिसणाऱ्या जागा तर वर्णनापलीकडीलच असतील असे वाटून गेले.
Slunj या शहरात वसलेले हे एक गाव आहे त्यामुळे तिथल्या नदीला Slunjčica असे नाव पडले. येथील घरे व घराखालून वाहणारे धबधबे हे इथले वेगळेपण म्हणावे लागेल. पुढे एक जुना लाकडी पूल होता. त्यावरून पलीकडे जाण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. खरे तर ही जागा बघण्यासाठी आमच्याकडे खूप कमी वेळ होता, पण गडबडीत का होईना जितके शक्य आहे तितके नजरेत भरून घेत आम्ही पुढे निघालो. येथील घरांच्या खाली पाणचक्क्या होत्या. घरांची रचना देखील अशा पद्धतीची होती ज्यामुळे घराखालून धबधबा वाहत असूनही घरात पाणी शिरणार नाही. पूर्वी या पाणचक्क्यांचा वापर विद्युत निर्मितीसाठी, गिरणीसाठी करत असत. मका, बाजरी यांसारखे धान्य दळण्यासाठी इथल्या गिरणीचा वापर होई. हे सर्व बघत असताना अचानक वेळेची जाणीव झाली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. आता आमचे पुढचे ठिकाण होते Plitvice…
Plitvice हे Croatia मधील सगळ्यात जुने व सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. 8 एप्रिल 1949 ला Croatia मधील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून नावाजले गेले. 26 ऑक्टोबर 1979 मध्ये UNESCO च्या जागतिक वारसा यादीत याचा समावेश झाला. अजून महत्त्वाचे म्हणजे जगातील सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे आणि ते आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले ही तर आमच्यासाठी पर्वणीच होती. हे उद्यान बघण्यासाठी इथे सात निरनिराळे मार्ग व चार trekking चे मार्ग आहेत. यापैकी एक पर्याय निवडून संपूर्ण उद्यान फिरायचे असते. आम्ही देखील त्यातील एक पर्याय ‘C’ निवडला व फिरायला सुरुवात केली. सुरुवातीला पाऊस नव्हता पण वारा मात्र प्रचंड जाणवत होता. आम्ही जिथे उभे होतो त्या समोरील एका डोंगर रांगेतून वाहत येणारा धबधबा सर्वप्रथम दृष्टीस पडला. पांढऱ्या खडकाळ डोंगरातून वाहत येणाऱ्या धबधब्याचे पाणी खाली असणाऱ्या तलावात पडत असतानाचे दृश्य खिळवून ठेवणारे होते. डोंगरावर रांगेने असलेली झाडे, त्यात मध्येच डोकावणारी विविधरंगी फुले, वाऱ्याने डोलणारी झाडे असे सर्व आम्ही पाहत होतो. वाऱ्याचा प्रचंड आवाज असून देखील येणारा खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कानात भरून राहत होता. पहिल्याच दृश्याने आम्ही हरखून गेलो. येथील तलावाचे रंग देखील दरवेळेला वेगवेगळे दिसतात. म्हणजे कधी हिरवे, कधी निळे, कधी राखाडी अशा रंगात सर्वांना मोहवून टाकतात. आम्ही देखील याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला कारण जेव्हा हे उद्यान बघायला सुरुवात केली त्यावेळी हिरवी-निळी रंगसंगती दिसली. मधूनच ढग येऊन हलकेच पावसाला सुरुवात झाली तेव्हा पाण्याचा रंग राखाडी किंवा पांढरा झाला. परत पाऊस जाऊन ऊन आले की परत पूर्ववत निळा रंग दिसला. पाण्याच्या अगदी जवळ जाऊन बघितल्यावर पाण्याचा स्वच्छ तळ दिसे आणि रंगहीन पाण्यात कधी निळा रंग दिसू लागे व कधी त्याजागी हिरवा रंग येई हेच कळायचे नाही. अशी ऊन सावलीच्या खेळात चालू असलेली रंगांची उधळण बघत आम्ही फिरत होतो. एक मात्र नक्की पाण्याचा रंग कोणताही असला तरी बघताना छानच वाटत होते.
इथे फिरताना चालायची खूप तयारी ठेवली पाहिजे. कारण आम्ही गेलो तेव्हा खराब हवेमुळे व भरपूर वाऱ्यामुळे आत असलेल्या फेरीबोटी काही वेळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण उद्यानाची फेरी पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त चालावेच लागणार होते. फक्त एका लहान पट्ट्यातील बोटी चालू असतील असे आम्हाला सांगितले गेले. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसे तसे इथले सौंदर्य अधिकाधिक खुलत होते. नजर जाईल तेथे दिसणारे असंख्य धबधबे, अनेक लहान-मोठे तलाव हे सोबतीला होतेच. काही ठिकाणी तर निरनिराळ्या थरांमधून वाहणारे धबधबे देखील दिसले. असे तीन चार तास चालून आम्ही जरा दमलो. वाटेत एक रेस्टॉरंट दिसले. तेथे काहीतरी खाऊ म्हणून आम्ही ठरवले. कारण आता पाऊस तसा वाढला होता आणि भरपूर वाऱ्यामुळे थंडी देखील वाजायला लागली होती. मग आमचे खाणे होईपर्यंत पाऊस जरा कमी झाला होता. शिवाय खाऊन देखील ताजतवाने वाटत होते. तेथून परत निघालो तेव्हा अचानक एक फेरीबोट आम्हाला समोर दिसली. त्यात बसून पलीकडच्या काठावर आम्ही पोहोचलो. बोटीतून जायला मिळाल्यामुळे आमचे बरेचसे चालणे देखील वाचले. आता पाऊस पूर्णपणे थांबून परत छान ऊन आले होते व आता आम्हाला उद्यानाच्या अजून वरच्या टप्प्यावरती जायचे होते. त्यासाठी असणारे लाकडी पूल, लाकडी पायऱ्या हळूहळू दिसू लागल्या. त्या पायऱ्या चढून जाताना त्या खालून देखील धबधबे वाहत होते. हा खूपच वेगळा अनुभव होता. मधून मधून लहान लहान पक्षी पाण्यात येत होते. येथील तलावांचे lower Lake व Upper Lake असे विभाजन केले आहे. त्या तलावांच्या एका बाजूला असलेले वळणदार लाकडी पूल बघून व त्यावरून जाताना आपण खरंच एका स्वप्नमय जगातच प्रवेश करत आहे असे सतत वाटत होते.
सकाळपासून बघायला सुरू केलेले हे उद्यान बघताना कसा दिवस संपत आला हे समजलेच नाही. आता एका ठिकाणी बस दिसली. पुढचा परतीचा प्रवास बस मधून होता. मग एके ठिकाणी बस थांबली. तिथून परत काही अंतर चालत जायचे होते आणि या टूर चा शेवट करायचा होता. Cherry on the top म्हणतात ना अगदी तसेच आमची टूर संपताना अगदी वरच्या उंचीवरून आता आम्हाला खालील अनेक सुंदर धबधबे एकत्र बघायला मिळाले.
निसर्ग किती सुंदर असू शकतो याचा प्रत्यय आम्ही त्या दिवशी घेतला व स्वर्ग याहून काय वेगळा असू शकतो? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला हे मात्र नक्की. शेवटी आमची फेरी पूर्ण झाली त्यावेळेस सर्वजण खूप दमलो होतो पण तिथून पाय निघतच नव्हता व स्वर्गसुख अनुभवल्याचाचा आनंद मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
15.4. 2024
नेदरलँडस-बेल्जियम – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
2 responses to “Croatia- Rastoke आणि Plitvice”
खूप छान लिहिले आहेस अनु. सारे क्रोएशियाच्या गार्डन चे दृश्य डोल्यासमोर उभे राहिले.
धन्यवाद.