Dubrovnik आणि Game of Thrones…

Croatia ट्रीप होऊन आता अर्धे वर्ष होऊन देखील गेले तरीसुद्धा त्या बद्दल म्हणावे तितके पुरेसे लिहिले गेले नव्हते. त्या ट्रीप मधील पहिला लेख लिहिला तो Plitvice बद्दल. अत्यंत सुंदर अशी ती जागा बघून अक्षरशः स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद मिळाला. (त्याची लिंक हा लेख संपल्यावर देते.) त्यानंतर बघितलेल्या सर्व जागा देखील छानच होत्या. त्यातीलच अजून एक ठिकाण म्हणजे Dubrovnik.


Dubrovnik हे Croatia च्या दक्षिणेकडे वसलेले, तसेच भूमध्य समुद्रातील सर्वात प्रमुख स्थळांपैकी एक शहर आहे. उत्कृष्ट मध्ययुगीन वास्तुकला व तटबंदी हीच या शहराची मुख्य ओळख म्हणावी लागेल. त्याचसाठी 1979 मध्ये हे शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले. तिथे प्रवेश केल्या केल्या कुठल्या एका गोष्टीने आमचे लक्ष वेधून घेतले असेल तर ते या शहराच्या तटबंदीने. सुमारे दोन किलोमीटरची तटबंदी व त्यामध्ये वसलेले छोटेसे शहर अगदी आवर्जून बघण्यासारखेच आहे. याला अगदी सातव्या शतकापासूनचा इतिहास आहे. पूर्वी हे शहर “Ragusa” या नावाने ओळखले जात असे. सागरी व्यापाराची वाढ होत हळूहळू हे शहर समृद्ध होत गेले, प्रसिद्ध होत गेले. एकीकडे व्यापाराची भरभराट होत असताना दुसरीकडे येथील साहित्य देखील समृद्ध होत होते. असे म्हणतात, कवी Ivan Vidalić यांनी या शहराला “Crown of Croatian cities” असे संबोधल्याचा उल्लेख एका पत्रात आढळला आहे. अशी यशस्वी वाटचाल चालू असतानाच अचानकपणे 1667 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये जवळजवळ संपूर्ण शहर उध्वस्त झाले. शिवाय नेपोलियन युध्दादरम्यान फ्रेंच साम्राज्याने ताबा मिळवला. दुसऱ्या महायुद्धात व त्यानंतर झालेल्या क्रोएशियन स्वातंत्र्ययुद्धादरम्यान देखील याचे खूप नुकसान झाले. हळूहळू त्यातून बाहेर येत आता हे संपूर्ण शहर एका वेगळ्याच दिमाखात उभे आहे. एवढेच नाही तर युरोप मधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक देखील आहे.
कधी कधी काय होते, देशाचा काय किंवा एखाद्या ठराविक शहराचा इतिहास, संस्कृती या अश्या काही महत्त्वाच्या गोष्टींव्यतिरिक्त तिथे घडलेल्या एका कलाकृतीमुळे शहराची एक नवीन ओळख निर्माण होते. त्यामुळे हळू हळू हजारो, लाखो लोक त्याकडे आकर्षिले जातात. अगदी तसेच Dubrovnik चे देखील आहे. त्याची अजून एक ओळख म्हणजे 2011 मध्ये आलेल्या “Game of Thrones” या जगप्रसिद्ध TV Series चे काही भाग इथे चित्रित झाले आहेत. त्यातील King’s landing चे चित्रीकरण Old City Dubrovnik येथे झाले आहे.


आम्ही ही ट्रीप group ने केली होती. म्हणजे माझ्या अजून मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंब असे आम्ही सगळे एकत्र गेलो होतो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून आमचे Dubrovnik बघायचे नक्की ठरले तेव्हापासून आमच्या ग्रुप मधील काही जणांनी इथली guided tour घेण्याचा आग्रह धरला. आम्हीदेखील तसे करायला तयार झालो. Tour सुरू होण्याआधी आम्ही City wall वरून चालत जाऊन एक फेरी मारली. तेव्हा जरा गडबडच झाली कारण लगेचच guided tour सुरू होणार होती. ठरलेल्या वेळेत आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. आमचा guide आधीपासूनच तिथे येऊन थांबला होता. City च्या प्रवेशद्वारापासून सुरू करून हळू हळू आत नेत माहिती सांगत होता. काही वेळानंतर त्यानी Game of Thrones बद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. खरे तर आम्ही ही guided tour घेण्यामागे हेच महत्त्वाचे कारण होते. कारण त्या त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या Scenes चे चित्रीकरण झाले होते, त्यासाठी काय काय तयारी केली होती, त्यातील काही अनुभव, महत्त्वाच्या काही गोष्टी, कलाकारांविषयी माहिती, त्यांचे स्वभाव या सर्व गोष्टी आम्हाला समजणार होत्या. खरेतर GOT (Game of Thrones चा short form) या विषयात मी अगदीच नवीन होते कारण त्यातील एकही भाग मी आधी बघितला नव्हता. फक्त खूप जणांना त्याबद्दल भरभरून बोलताना एकले होते. काही प्रतिक्रिया सकारात्मक होत्या तर काही नकारात्मक होत्या. प्रत्येकाचे काही ना काही वेगळे मत होते. त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली होती. की नक्की काय असेल हे GOT? आपण हे बघावे की नाही? बघितले तर आवडेल की नाही? पण आमच्या guide ने अत्यंत उत्साहाने छान माहिती आम्हाला दिली. मध्ये मध्ये हास्यविनोद करत किंवा गप्पा मारत मारत आमची tour छान चालली होती. त्यामुळे कुठेही कंटाळवाणे अजिबात झाले नाही. आमची guided tour सुरू झाली तेव्हापासून माझी उत्सुकता वाढतच गेली आणि ती tour झाल्यावर आता GOT निदान बघायला सुरुवात तरी करू इथपर्यंत माझी गाडी आली होती. घरी परतल्यावर ठरल्याप्रमाणे मी ती Series बघण्याचा श्रीगणेशा केला. खरेतर मला या अश्या प्रकारात मोडणाऱ्या Series, चित्रपट बघण्याची खूप काही आवड नाहीये. जास्तीत जास्त सोप्पे, विनोदी किंवा हलकेफुलके प्रकार बघायला मला जास्त आवडते. त्यामुळे माझ्या नवऱ्याने आणि काही मैत्रिणींनी मला त्यातील Dark Side बद्दल अधिक थोडीफार कल्पना दिली होती. GOT बघण्यासाठी माझ्या मनाची देखील मी हळूहळू तयारी करत होते.
सुरूवातीला त्यातील सर्व पात्रे, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते हे समजायला आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ते सर्व लक्षात ठेवायला काही काळ जावा लागला. हळू हळू जेव्हा हे सर्व समजू लागले तेव्हा कथा इतकी पुढे गेलेली असे की परत काही वेळ थांबून त्याची उजळणी करून बघायला लागे. असे करत करत 1-1 season मी पार करू लागले. त्यातील काही scenes अतिशय चांगले, नात्यातील अनेक पैलू दाखवणारे, तर काही अतिशय विचित्र, अंगावर आल्यासारखे, किळसवाणे अश्या पद्धतीचे वाटले. (इथे मी माझे प्रामाणिक मत मांडले आहे. असे लिहून कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात माझा हेतू नाहीये.)
कथेचा भाग विचारात घेतला तर, यामध्ये सिंहासनासाठी, सत्तेसाठी केलेले राजकारण हेच प्रामुख्याने दाखवले गेले आहे. मग त्यात अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत एक एक करून कसे सगळे त्यात अडकतात हे सतत आपल्याला दिसते. काही जण स्वार्थापोटी तर काही नाईलाज म्हणून त्या राजकारणात पडतात व शेवटपर्यंत त्यांची सुटका त्यातून होत नाही. अनेक काल्पनिक, धक्कादायक वळणे घेत घेत कथा पुढे जाते. जरी त्यातील बराचसा भाग काल्पनिक असला तरी प्रत्येकाच्या कामामुळे आणि अर्थात बऱ्याच तांत्रिकीकरणामुळे ते खरे आहे असेच वाटते.
Arya Stark नावाच्या एका मुलीच्या आयुष्यात अगदी लहान वयात नकळतपणे काही नकारात्मक, धक्कादायक गोष्टी समोर येतात. आपले वडिल कसे एका कपटी राजकारणात ओढले जातात आणि त्यातूनच नंतर त्यांचा जीव गमवून बसतात हे सर्व अगदी जवळून स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर लहान वयात आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर कथेतील मुलगी पोहचते. मग कसे तिचे आणि तिच्या सर्व कुटुंबाचे आयुष्य संपूर्णपणे बदलते. त्यात एका बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड देखील आहे आणि दुसरीकडे वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मनात पेटलेली सुडाची भावना देखील आहे. खरेतर एक बालकलाकार म्हणून हे सर्व पेलणे तसे कठीण आहे. पण त्या मुलीने अतिशय उत्तम काम करून संपूर्ण series एका वेगळ्याच उंचीवर नेली आहे. त्यातील प्रमुख भूमिका कोणती असा विचार केला तर मला वाटते की सगळ्याच भूमिका आपापल्या परीने प्रमुखच म्हणाव्या लागतील. खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडलेली पात्रे देखील एकपेक्षा एकच म्हणावी लागतील.
खरेतर मी ही series बघून पूर्ण केली त्याला देखील बरेच दिवस झाले. आणि फक्त एकदा बघुन त्यातील सर्व गोष्टी समजायला आणि त्याबद्दल काहीतरी लिहायला तसे अवघड जात आहे. GOT चे जगभरात असंख्य चाहते आहेत त्यातील कित्येक जणांनी फक्त एकदाच काय तर कमीत कमी चार ते पाच वेळा तरी ही Series बघून पूर्ण केली असेल. ते सर्व लोक जास्त छान व भरभरून याविषयी सांगू शकतील त्यामध्ये काही वादच नाही. पण मी देखील एक छोटासा प्रयत्न केला आहे.
यातील एक प्रसिद्ध वाक्य आहे, ” Winter is coming”. हा dialog म्हणजे जणू काही GOT ची ओळख आहे असे वाटते. GOT आणि Dubrovnik विषयी लिहायचे खूप डोक्यात होते पण कागदावर मात्र उतरत नव्हते. कदाचित असे तर नसेल की माझा हा लेख देखील जणू काही “Winter” यायची वाट तर बघत नसेल?

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
24.11.2024

Croatia- Rastoke आणि Plitvice – आठवणींचा खजिना

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links