तिच्याबद्दल बोलू काही…

एक कळी जन्माला येते. ज्या क्षणी “तिचा” जन्म होतो त्याचक्षणी जणू काही आयुष्याच्या  रंगमंचावर ती प्रवेश करते. हळू हळू कळीचे सुंदर, गोंडस फूल होते. त्याच रंगमंचावर मग “ती” कोवळी पावले टाकत आपली छाप पाडत वावरायला लागते. 

कालांतराने कोवळेपणा संपून आयुष्यात एक वेगळे वळण येते. त्या वळणावरून जाताना अनेक पूर्वानुभव पाठीशी घेऊन नवीन अनुभव गोळा करत पुढे पुढे जात राहते. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मुले असे अनेक टप्पे सांभाळत असताना देखील अनेक कलागुणांना वाव देत आपले तसेच आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक जणांचे आयुष्य देखील “ती” आनंदी करते. 

पूर्वी फक्त चूल आणि मूल हेच आयुष्य असलेल्या “तिने” हळू हळू पायातील बेड्या बाजूला सारून आता तर मर्यादेपलीकडे आयुष्य जगण्याची स्वप्न बघेपर्यंत वाटचाल केली आहे. आता तर जणू काही तिने आकाशालाच गवसणी घातली आहे. 

 ही सर्व तारेवरची कसरत करताना येतात ना “तिला”देखील अनेक चांगले, वाईट अनुभव!!! पण तरीही न खचता, न डगमगता पुढे जाणे हेच जीवनाचे सूत्र मानून कधी एकटी तर कधी जोडीने ध्येय गाठताना देखील रंगमंचावरची “ती” प्रत्येक वेळेस स्वतः ला बदलवते.

रंगमंचावरची पण “तीच” आणि स्वतः बाजूला उभे राहून दुसऱ्या “तिला” रंगमंचावर वावरताना बघणारी पण “तीच”!!! फरक आहे तो फक्त वयाचा आणि अनुभवांचा. जितके अनुभव तितकी “ती” अनुभव संपन्न! 

“ती”कधी चुकते, कधी ठेचकाळते पण अशा चुकलेल्या एखादीला प्रेमाने, कधी रागाने, कधी आपलेपणाने हात धरून पुढे नेण्यासाठी मदत करणारी दुसरी असतेच…

माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात देखील अशा अनेक जणी आल्या, काहींकडे बघून कसे वागावे हे शिकले तर काहींकडे बघून कसे वागू नये हे ही मी शिकले. काहींची साथ मधेच सुटली तर काहींशी जुळलेले ऋणानुबंध आजही कायम आहेत. 

आज ह्या लेखाच्या निमित्ताने अनेकजणी आठवल्या ज्यांनी मला शिकवले, घडवले, योग्य रस्ता शोधण्यास शिकवले…

अशा प्रत्येक “ती”ला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

अनुराधा अमरेंद्र उकिडवे. 

8 मार्च 2026.

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links