घर घर की बात…

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती…

     लहानपणी शाळेच्या फलकावर घराविषयी लिहिलेल्या या कवितेच्या काही ओळी वाचल्यावर माझे माझ्या घराविषयी असलेले प्रेम अधिकच वाढले होते. तसे बघायला गेले तर “घर” हा सर्वांचाच अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. असे म्हणतात, आपल्या माणसांनी, पाहुण्या-रावळ्यांनी घर जेवढे भरलेले असेल तितके ते घर श्रीमंत असते, सुखाने भरलेले असते. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच तर तीन मुलभूत गरजा असतात हे शाळेत आपण सर्वच शिकतो आणि ते मिळवण्यासाठीच पुढे मोठे झाल्यावर सर्व संघर्ष चालू होतो. काहींच्या नशिबी आयुष्यभर एकाच घरात राहण्याचा योग असतो तर काहींना एकाच आयुष्यात अनेक घरामध्ये राहण्याचा योग असतो. 

     माझ्या जन्मापासून ते माझे लग्न होईपर्यंत एकाच घरात राहिलेली, वाढलेली मी लग्न होताचक्षणी जणू काही “विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर” असल्यासारखे जगू लागले. कधी कधी एकाच गावात, कधी महाराष्ट्राबाहेर तर कधी भारताबाहेर देखील आमचा प्रवास चालू झाला आणि तो प्रवास अजूनही चालूच आहे. 

     प्रत्येक नवीन ठिकाणी राहायला गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस एका अनोळखी जागेचे आपल्या घरात रूपांतर होईपर्यंतचा प्रवास देखील खूप काही शिकवून जातो असेच मला वाटते. प्रत्येक घराचा, प्रत्येक गावचा अनुभव वेगळा. कधी हे अनुभव चांगले असतात तर कधी इतके वाईट अनुभव येतात की त्या आठवणी देखील नकोशा वाटतात. प्रत्येक वेळी आमचा फिरता संसार घेऊन नवीन घरात पाऊल टाकल्यावर पहिले काही दिवस त्या घराचे रूप अक्षरशः विस्कटल्यासारखे दिसते. मग एकेक करत सर्व वस्तू त्या त्या जागी लागल्या की खऱ्या अर्थी घराला घरपण आले आहे असे वाटते. बरं! नवीन शहराची, तिथल्या हवेची, आजूबाजूच्या लोकांची, सर्व पद्धतीची सवय होईपर्यंत काही काळ जावा लागतो. जसे जसे दिवस सरू लागतात तसे तसे सर्व सवयीचे होऊ लागते, आवडू लागते. प्रत्येक घरामध्ये मग किमान एकतरी आवडीची, लाडकी जागा तयार होते. कधी दमलेली असताना त्या जागेवर बसून एखादे आवडीचे गाणे ऐकले की खूप उत्साही वाटू लागते. कधीतरी तिथे बसून पटकन पुस्तकाचे एक पान वाचावेसे वाटते, तर कधी हातात मस्त गरमागरम कॉफीचा मग घेऊन बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघत बसावासा वाटतो. कधीतरी कुठूनतरी अचानक एक लहानसा पक्षी खिडकीत येऊन डोकावून जातो. पहिल्या पावसाचे थेंब मातीत पडल्यावर मातीचा येणारा सुगंध मनात साठवून ठेवावासा वाटतो. असे कितीतरी आनंदाचे क्षण रोज आपल्या आयुष्यात येत असतात पण इतक्या लहान लहान गोष्टींनी, त्यातून मिळणाऱ्या आनंदानी हल्ली आपण समाधानी होतो का??? खरेतर आनंद आपल्यामध्येच असतो पण बऱ्याचदा आपण तो शोधायलाच विसरतो.   

जसा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो तसेच प्रत्येकाचे आयुष्य देखील वेगळे. कोणाला कामानिमित्त, काहींना तडजोड म्हणून तर कोणाला गरज म्हणून अनेक घरे बदलावी लागतात. एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या घरात हलावे लागते. जरा कुठे आत्ता त्या घराची सवय होत होती म्हणेपर्यंत परत ते घर बदलायची वेळ येते. तेव्हा परत तोच उरला सुरलेला उत्साह जमवून, काहीसा उसना आणून तीच सर्व कामे करावी लागतात. आनंदाने, उत्साहाने लावलेले सामान गोळा करून एक दिवस परत एका वेगळ्या जागेत जावे लागते आणि त्या जागेला आपले घर म्हणावे लागते. तेव्हा येत असतीलच ना त्यांना देखील जुन्या घराच्या बऱ्याच आठवणी! “आत्ता आहे त्यापेक्षा पहिलेच जास्ती छान होते” असे पण सारखे मनात येत असेल पण शेवटी भूतकाळात खूप न रमता वर्तमान स्वीकारून न थांबता चालत राहणे हेच तर आनंदाचे खरे गुपित असते. 

     असे म्हणतात की “बदल” ही एकच अशी गोष्ट आहे की जी शाश्वत आहे. तो बदल स्वीकारून पुढे चालत राहणे हे त्यावेळी महत्त्वाचे असते. आपला सर्व संसार असा आवरून परत नवीन जागेवरती लावायचा तसे करताना प्रत्येक वेळी मला लहानपणी केलेल्या पत्त्याच्या बंगल्याची आठवण येते. चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने एक छानसा बंगला उभा करायला घ्यावा, तो पूर्ण होत आहे असे वाटत असतानाच तो बंगला सोडून दुसऱ्या ठिकाणी परत शून्यापासून सुरुवात करत अजून एक नवीन बंगला बांधायला घ्यावा. आता इतकी वर्ष झाली या बदलाचीच मला सवय झाली आहे असे वाटते. नाण्याला कशा दोन बाजू असतात तसेच ह्याला देखील दोन्ही बाजू असतात. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राहून अनेक नवीन नवीन जागा समजतात व असे जगत असताना अनेक नवीन, सकारात्मक गोष्टी देखील तुमच्या आयुष्यात येतात. पण तरी दरवेळेस राहून राहून एकच प्रश्न माझ्या मनात येतो, “शून्यापासून सुरुवात करणे खरेच सोपे असते का???” तुम्हाला काय वाटते?

(तळटीप – 2012 पासून आत्तापर्यंत आम्ही 13 घरे बदलली आहेत.)

-अनुराधा अमरेंद्र उकिडवे. 

   एप्रिल 2026.

3

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links