सफर Geiranger, Åndalsnes आणि Ålesund ची…

नुकताच गुड फ्रायडे व त्यापाठोपाठ येणारा ईस्टर संडे झाला व अचानक मागच्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये केलेल्या आमच्या Geiranger (गैरांगर) ट्रिपच्या आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या. निसर्ग देवतेने सढळ हस्ताने रेखाटलेले सौंदर्य जिथे आम्ही अनुभवले त्या जागेविषयी लिहायचे राहून गेले होते ही खंत गेले वर्षभर माझ्या मनात होती. असे म्हणतात ना, जसे देवाचे बोलावणे आल्याशिवाय यात्रा किंवा देवदर्शन घडत नाही. त्याप्रमाणे इतके दिवस कदाचित तिथल्या निसर्ग देवतेने माझ्यातल्या लेखिकेला हाकारले नव्हते. त्यामुळे माझ्याकडून या विषयावर लेख लिहला गेला नव्हता असेच म्हणावे लागेल. पण गमतीचा भाग सोडला तर इतक्या सुंदर जागेविषयी वर्णन करण्यासाठी, माझे शब्दभांडार वाढवण्यासाठी कदाचित तेवढा काळ जाणे गरजेचे होते. त्या जागेला योग्य न्याय देण्यासाठी हे थांबणे मला भाग होते. Geiranger बघितल्याशिवाय Norway बघितले असे वाटूच शकत नाही. त्यामुळे Norway सोडायच्या आत आम्ही तिथे जाऊन आलो याचा मनात आनंद आहेच. 

     Oslo हून रेल्वेनी आम्ही निघालो. कधी कधी मला विमान प्रवासापेक्षा बस किंवा रेल्वेचा प्रवास जास्त आवडतो. भले मग तो प्रवास पूर्ण दिवसाचा का असेना पण मध्ये मध्ये उठण्याबसण्यात वेळ कसा जातो हे कळतच नाही. सकाळी आठ वाजता आमची रेल्वे निघाली. हा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होता. पहिला टप्पा बारा वाजता Dombås (डोम्बॉस)मध्ये संपला. तिथूनच पुढची Dombås ते Åndalsnes (ओन्दाल्स्नेस) साठी Rauma Line ही रेल्वे होती. हा प्रवास युरोपमधील सर्वात सुंदर रेल्वे मार्गांपैकी एक मानला जातो. त्यानंतर Åndalsnes ते Ålesund असा शेवटचा टप्पा बस मधून होता. प्रवास जरी मोठा असला तरी तो कुठेही कंटाळवाणा होऊन न देण्याची जबाबदारी जणू काही इथल्या निसर्गाने घेतली असल्याप्रमाणे पूर्ण प्रवासात एकामागून एक चित्र उलगडत जावी तसे निसर्गाचे आविष्कार आम्ही बघितले. 

     एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, जर तुम्ही इथे नवीन असाल किंवा फक्त फिरायला म्हणून आला असाल तर प्रत्येक प्रवासाआधी त्या त्या ठिकाणाबद्दल थोडीफार तरी माहिती गोळा करून ठेवा किंवा तिथे राहणाऱ्या तुमच्या ओळखीच्या स्थानिक लोकांची मदत घ्या. कारण सुट्टीचा काळ चालू असेल तर काही काही ठिकाणी सर्व दुकाने बंद असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला चालणारे, आवडणारे खाण्याचे थोडे तरी समान तुमच्याबरोबर असणे  गरजेचे असते. हे लक्षात ठेवणे किती महत्त्वाचे असते याचा प्रत्यय आम्हाला नेहमीप्रमाणेच या प्रवासात देखील आला. सकाळच्या पहिल्या रेल्वेमध्ये कॅन्टीन होते. तिथे आम्ही खाऊन घेतले होते आणि आमच्याजवळ पण खाण्याचे थोडेफार सामान होते. त्याचा उपयोग आम्हाला त्या दिवशी झाला कारण प्रवासाचे दोन्ही टप्पे इतके पाठोपाठ होते की मध्ये कुठे थांबून खायला वेळच नव्हता. मग बस मध्ये बसल्यावरच घरून आणलेला डबा आम्ही खाल्ला. असे करत रमत गमत आम्ही Ålesund ला पोहोचलो. 

     एकेकाळी नॉर्वे मधील पारंपारिक लाकडी शहर अशी ओळख असलेले Ålesund हे उत्तम जहाज बांधणीसाठी व जागतिक मासेमारी व्यापारासाठी प्रसिद्ध होते. तेथील हवामान मासे सुकवण्यासाठी पूरक असल्याने समुद्राच्या खडकांवर मासे पसरून सुकवले जात. 23 जानेवारी 1904 मध्ये लागलेल्या भीषण आगीत सर्व शहर होरपळून निघाले. या घटनेनंतर तीन वर्षातच या शहराचा पुनर्जन्म झाला आणि Art Nouveau (आर्ट नूवो) शैलीमध्ये संपूर्ण शहर जगासमोर आले. Art Nouveau ही १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस युरोप आणि अमेरिकेत लोकप्रिय झालेली एक आंतरराष्ट्रीय कला आणि वास्तुकला शैली आहे. ‘Art Nouveau’ म्हणजे “नवीन कला”.  ही शैली जुन्या ऐतिहासिक परंपरांना सोडून निसर्गाच्या सौंदर्याला आधुनिक पद्धतीने मांडते.

     आम्ही तिथे पोहोचल्यावर संध्याकाळी Aksla या डोंगरावर गेलो. त्या डोंगरावर जाण्यासाठी असलेल्या 418 पायऱ्या चढून आम्ही जाऊ लागलो. दर थोड्या थोड्या टप्प्यांनी थांबून खाली पसरलेली लहान मोठी घरे बघू लागलो. लाल, पिवळा, निळा, गुलाबी, पांढरा असे रंग जरी वेगवेगळे असले तरी सर्व इमारतींची रचना सर्वसाधारण सारखीच होती. सर्व घरे एकमेकांच्या शेजारी दाटीवाटीने उभी असल्यासारखी पण एकमेकांची हक्काची साथ करत उभी असल्यासारखी भासत होती. दुर्दैवाने इतिहासात एका भयानक घटनेचे साक्षीदार असलेले संपूर्ण शहर एका वेगळ्याच आत्मविश्वासाने व अधिक भक्कमपणे उभे आहे असे मला वाटले. Fjellstua (फियेलस्टुआ) या तिथल्या view point वरून खाली दिसणारी सर्व घरे व त्यामागे असलेले Sunnmøre Alps (सुन्मोर आल्प्स) पर्वतरांगा असा सर्व देखावा बघत आम्ही बराच वेळ थांबलो होतो. येथील टोकदार व खडकाळ पर्वतरांगा थेट fjord मधून वर आलेल्या आहेत. डोंगरावर काही ठिकाणी पांढरा शुभ्र बर्फ दिसत होता. आकाशातील रंग जसे जसे बदलत होते तसे तसे संपूर्ण शहर देखील वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघत होते. तिथे काही ठिकाणी तोफा व जुने बंकर्स देखील दिसले. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने या डोंगराचा वापर संरक्षणासाठी केला होता. त्याच्याच खुणा अजूनही दिसतात. फोटो काढून निघेपर्यंत संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथूनच निघणाऱ्या एका फेरीबोटीने आम्ही आमचे मुख्य आकर्षण असलेल्या Geiranger कडे निघालो. 

     इथल्या फेरीबोटीचे प्रवास देखील लक्षात राहण्यासारखे असतात. त्या प्रवासात ऑडिओ गाईडची देखील सोय होती. Geiranger मध्ये एक दिवसाचा मुक्काम करून परत त्याच मार्गाने Ålesund ला परत जायचे होते. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणे दिसली.  प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे महत्त्व होते. तिथला इतिहास, संस्कृती, परंपरा याबद्दल जवळून जाणून घेता आले. एक तर इकडे लोकसंख्या आधीच कमी आणि त्यात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये जवळजवळ आठ लाखाहून अधिक लोकांनी नॉर्वे सोडून स्वप्नांच्या मागे नॉर्थ अमेरिकेकडे कूच केली होती. हा अमेरिकेकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला खरा पण तोही वाटतो तितका सोप्पा नक्कीच नव्हता. कित्येक आठवडे हा प्रवास चालूच होता. तिकडे जाऊन स्थायिक झाल्यावर काही जणांची स्वप्न पूर्ण झाली, काहींना काही नवीन मार्ग मिळाले, काही परत आले तर काही तिथेच चाचपडत राहिले. 

     इथल्या लोकांचे सर्व आयुष्य पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. थंडीमध्ये इथल्या लोकांचे आयुष्य देखील खूप बदलते. कित्येक जण थंडीमध्ये देखील दुसरीकडे स्थलांतरित न होता वयस्कर व गरजू लोकांना मदत करण्यासाठी तिथेच थांबतात हे जाणून तिथल्या लोकांविषयी माझा आदर अधिकच वाढला. प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असते. निसर्गाने बहाल केलेल्या सौंदर्याचे जतन व संगोपन करणे, निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा मार्ग स्वीकारत आनंदाने जगणे हे इथल्या लोकांनी स्वीकारले आहे.

     वाटेत दिसलेल्या प्रत्येक ठिकाणचे काही ना काही महत्त्व होतेच. तिथल्या भागातील सर्वात मोठे असलेले गाव म्हणजे Stranda (स्ट्रँडा) जिथे स्की प्रशिक्षण दिले जाते व देशातील उत्कृष्ट स्की रिसॉर्ट देखील तिथे आहे. तर या उलट फक्त दोन-तीन घरे असलेले Matvika हे तिथल्या डोंगरावरील जुन्या पद्धतीच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. वीज पुरवठा यायच्या आधी इथल्या लोकांचे आयुष्य किती खडतर होते हे देखील त्या दरम्यान समजले. पूर्वी गावात जेव्हा वीज पुरवठा नव्हता तेव्हा पलीकडच्या काठावरील लोकांची मदत हाच एक मदतीचा मार्ग होता. उन्हाळ्यामध्ये घराच्या छतावर पांढरे कापड व थंडीमध्ये बर्फावर काळे कापड पसरून आणि खिडकीमध्ये मेणबत्ती पेटवून आणि विझवून मदतीसाठी लोकांना बोलावत असत. खरंच, इथल्या लोकांचे आयुष्य किती खडतर होते त्यातून वाटचाल करत इथपर्यंत आले आहेत हे दिसते.  आणि म्हणूनच आज एवढे यश मिळाले तरी फारसे हुरळून न जाता इथल्या सगळ्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात.

     त्या मार्गावरील महत्त्वाचे असे तीन धबधबे देखील आम्ही बघितले. त्यातील एक म्हणजे “Seven Sisters” व त्या समोर वाहणारा “The suitor”!  Seven sisters धबधब्याचे एकापाठोपाठ एक वाहणारे 7 प्रवाह खूपच सुंदर दिसतात. धबधब्याला ‘सात बहिणी’ हे नाव एका जुन्या लोककथेवरून पडले आहे. कथेनुसार, या सात बहिणी अविवाहित होत्या. असे म्हटले जाते की, या सात बहिणींना मागणी घालण्यात अपयशी ठरल्यानंतर तो suitor(पुरुष) नैराश्यात दारूच्या बाटलीच्या आकाराचा झाला आहे. त्याचप्रमाणे अजून एक म्हणजे The Bridal Veil (ब्राइडल व्हेल) हा तिसरा सर्वात महत्त्वाचा धबधबा आहे. असे म्हटले जाते की, त्या सात बहिणींपैकी एकीला नंतर आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला किंवा काही कथांनुसार, ती लग्नासाठी तयार झाली होती पण ते घडू शकले नाही. तिने लग्नासाठी जी पांढरी शुभ्र ओढणी (Bridal Veil) तयार केली होती, ती तिने डोंगरावरून खाली सोडून दिली.

     सृष्टी सौंदर्याने नटलेल्या ह्या गावाची एक व्यथा देखील आहे. इथे एका नैसर्गिक आपत्तीची भीती आहे. Geirangerfjord जवळ Åkerneset (ओकनेससेट) नावाचा एक विशाल पर्वत आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या पर्वताला एक मोठी भेग पडली आहे आणि हा डोंगराचा भाग हळूहळू सरकत आहे. डोंगराचा एक प्रचंड मोठा भाग थेट फ्योर्डच्या खोल पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. जेव्हा इतका मोठा भाग पाण्यात पडेल, तेव्हा त्सुनामी येईल. नॉर्वे सरकारने या पर्वतावर अत्यंत आधुनिक सेन्सर्स बसवले आहेत. पर्वताची हालचाल २४ तास मोजली जाते. जर डोंगर कोसळण्याची थोडीही शक्यता दिसली, तर संपूर्ण गाव रिकामे केले जाईल. याच कथेवर आधारित ‘The Wave’ (Norwegian: Bølgen) नावाचा एक अतिशय प्रसिद्ध नॉर्वेजियन चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो आम्ही बघितला आहे. 

         ही सर्व माहिती जाणून घेत असताना आम्ही Geiranger मधे कधी पोहोचलो हे समजलेच नाही. आयुष्यामध्ये जिद्द, चिकाटी किती महत्त्वाची असते हे इथल्या लोकांकडे बघून शिकावे. पूर्वी या गावातील लोक फक्त मासेमारी व शेळ्या, मेंढ्या पाळून उदरनिर्वाह करत किंवा उंचच्या उंच डोंगरकड्यांवर शेती करत. त्या खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्तादेखील नव्हता. 1858 मध्ये वाफेची पहिली बोट इथे पोहोचली व त्यानंतर प्रवासांची ये- जा चालू झाली. नंतर आपल्या सृष्टी सौंदर्याने अनेकांना आकर्षित करणारे Geiranger 2005 मध्ये UNESCO मध्ये समाविष्ट झाले. आज हे ठिकाण सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असे मानले जाते. हा एवढा मोठा बदल घडवण्यासाठी, तिथला निसर्ग जपण्यासाठी गावातल्या लोकांनी केलेली मेहनत पावलोपावली दिसून येते.  

     सुरुवातीला तिथे पोहोचल्यावर आम्ही आमच्या हॉटेलकडे धाव घेतली. नशिबाने आमच्या हॉटेलची Taxi shuttle service होती. नाहीतर परत चालत आम्हाला हॉटेलपर्यंत जावे लागले असते. आमचे हॉटेल इथल्या प्रसिद्ध Eagle Road वर होते. या रस्त्यावर 11 तीव्र नागमोडी वळणे आहेत. येथील सर्वात वरच्या म्हणजे 11 व्या वळणावरून गरुडे दिसतात म्हणून त्याला ईगल रोड असे म्हणतात. त्यातील एका वळणावर आमचे हॉटेल होते. आमच्या खोलीला गॅलरी होती. खोलीत गेल्या गेल्या गॅलरीमध्ये जाऊन उभे राहण्याचा मोह आवरता आला नाही. समोर उभा ठाकलेला महाकाय डोंगर होता. त्यावर पडलेला व अजूनही न वितळलेला बर्फ उन्हात चमकत होता. मधूनच दिसणारी हिरवीगार कुरणे सौंदर्यात भर घालत होती. संपूर्ण आसमंतात फक्त आणि फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज सर्वदूर पसरला होता. लहान लहान धबधबे खाली वाहत येऊन पाण्याला स्पर्श करून fjord मध्ये एकरूप होत होते. या सगळ्या गोष्टींमुळे तिथे जो काही माहोल तयार झाला होता आणि तो प्रत्यक्ष बघण्याचा जो काही अनुभव होता त्याबद्दल देवाचे किती आभार मानले तरी ते कमीच होते. तो अनुभव खरेतर शब्दात सांगणे कठीण आहे. तरी देखील माझा एक लहानसा प्रयत्न म्हणून या लेखाकडे नक्कीच बघता येईल. 

     थोड्या वेळाने जेवण करून आम्ही तेथील एक लहान ट्रेक करण्यासाठी निघालो. परत शटल टॅक्सीमध्ये बसून निघालो. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला तिथल्या प्रसिद्ध युनियन हॉटेलपर्यंत सोडले. तिथून आम्ही चालण्यास सुरुवात केली. कधी सपाट, कधी पायऱ्या पायऱ्यांचा, कधी चढ उताराचा, तर कधी वळणे वळणे असलेल्या रस्त्यावरून आम्ही दोघे चालत होतो. म्हणून मधून   एखाददुसरी गाडी आमच्या समोरून जात होती. आजूबाजूच्या शांत वातावरणात मनातून देखील खूप शांत वाटत होते. खूप काहीतरी मिळवल्याचे समाधान व आनंद वाटत होता. काही वेळानंतर तिथल्याच एका कुरणात मनसोक्त चरणाऱ्या शेळ्या-मेंढ्या दिसल्या. आम्ही त्यांच्याकडे बघण्यापेक्षा त्याच आश्चर्याने आमच्याकडे बघू लागल्या. “आता आज कोण नवीन पाहुणे आले आहेत?” याच नजरेने जणू त्या आमच्याकडे बघत होत्या. त्यांच्या खाण्यात फार व्यत्यय न आणता आम्ही त्यांचे फोटो काढले व पुढे निघालो. आमच्यासमोर असलेल्या डोंगरावर मगाशी सांगितलेला ईगल रोड स्पष्ट दिसत होता. जसा जसा रस्ता टप्प्याटप्प्याने वर जात होता तसे तसे तिथल्या गवताचा देखील रंग बदलताना दिसत होता. हिरव्या पिवळ्या पुंजक्यांपासून सुरू होत गर्द हिरव्या कुरणांपर्यंत त्याचे रूपांतर झाले होते. काही तुरळक घरे त्यांच्या सोबतीला होती. आम्ही उभ्या असल्या डोंगरावर देखील असाच काहीसा नजारा होता. एक जुना दगडी फुल दिसला. त्या खालून एक पांढराशुभ्र झरा वाहत होता. तर दुसरीकडे कशाचीही पर्वा न करता बेधडकपणे डोंगरावरून वाहत येणारा धबधबा दिसला. त्याच्या वाटेतील झुडुपे, दगड, गोटे यांनादेखील स्वतःमध्ये सामावून घेत होता. आम्ही जिथून चालायला सुरुवात केली होती तिथेच एका मोकळ्या जागेत ओळीने नॉर्वेजियन झेंडे उभे केले होते. सर्व निसर्ग सौंदर्याच्या बरोबर ते झेंडे देखील खूप सुंदर दिसत होते. माझ्या दृष्टीने “नॉर्वे म्हणजे निसर्ग!” आणि “निसर्ग म्हणजेच नॉर्वे!”… निसर्गाशी एकरूप होण्याचा इथल्या लोकांचा वर्षानुवर्षे चाललेला प्रयत्न आज एका वेगळ्याच उंचीवर दिसतो. हे झेंडे जणू काही त्याचेच प्रतीक असेल नाही का?

     उशीर होत असल्यामुळे काही वेळानंतर आम्ही तिथून निघालो. हॉटेलवर येऊन तिथे जवळ एक फेरफटका मारला व आराम केला. त्यानंतरच्या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून परत हॉटेलच्या आसपासचा परिसर फिरण्यासाठी निघालो. आदल्या दिवशी एकदा बघून देखील आमचे दोघांचेही समाधान काही झाले नव्हते. त्यामुळे आम्ही तिथे परत गेलो. आधीच सर्व ठिकाणी शुद्ध हवा व त्यात सकाळी लवकर आल्यामुळे खूप उत्साही वाटत होते. एका मागून एक डोंगर डोकवत होते. पाण्यात उठणाऱ्या लहरींमुळे समोरच्या काठावरील घरांचे, झाडांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नव्हते. पण पाण्यावर कोणीतरी हिरव्या, पिवळ्या रंगाने उभ्या आडव्या रेघोट्या मारल्या आहेत असेच दिसत होते. रोज नव्याने एक सर्वोत्तम चित्रच जणू तिथे रेखाटले जात असावे त्याप्रमाणे सर्व परिसर दिसत होता. हे सगळे मनसोक्त बघून, फोटो काढून आम्ही आमचे हॉटेल सोडले. त्या दिवशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे, तिथले सगळे सौंदर्य बघताना मनाची चलबिचल व्हायला सुरुवात झाली होती. कारण तेव्हा जाणवायला लागले होते की आता हे सर्व सोडून देण्याचे आणि मायदेशी परत जाण्याचे दिवस जवळ येत आहेत. अर्थात त्याचा एका बाजूला आनंद तर होताच पण काहीतरी आयुष्यातून निसटणार होते हे देखील तितकेच खरे होते. 

     नंतर आम्ही मुख्य पोर्टपाशी आलो. तिथे आम्ही एक लहान बस टूर बुक केली होती. एक मिनी बस आमच्यासारख्या अजून आठ-दहा जणांना घेऊन वळणावळणाच्या रस्त्यावरून निघाली. बसमधील ड्रायव्हर इतर लोकांशी गप्पा मारून, मधून त्यांना काहीतरी माहिती सांगून सर्वांबरोबर स्वतःचे देखील मनोरंजन करून घेत होता. एका view point वर बस थांबली. इतका वेळ खाली उभे राहून सर्व परिसर बघितला होता. तोच आता एका वेगळ्या बाजूने बघताना मज्जा वाटत होती. ‘S’ आकारात वळलेले फीऑर्ड, डोंगर रांगा व समोरील धबधबा सगळे अजूनच भव्यदिव्य वाटत होते. पाण्याच्या गडद निळ्या रंगामध्येच पांढरा रंग मिसळला होता. आकाशातील पांढरे ढग डोंगरावर येऊन काही काळ स्थिरावले होते. सगळा देखावा जरी सारखा तोच असला तरी परत परत बघत बसावा असाच होता. इथे फार वेळ न घालवता परत त्याच बस मध्ये बसून आम्ही खाली आलो. 

     आता फेरीबोटीने परत Ålesund ला जाण्याची वेळ आली होती. पोहोचल्यावर तिथे फिरायला एक संध्याकाळ आमच्या हातात होती. म्हणून परत एकदा त्याच पहिल्या दिवशी बघितलेल्या डोंगरावर जाऊन शांतपणे बसायचे असे आम्ही ठरवले. सतत एकामागून एक ठिकाणे बघताना मध्येच कधीतरी असे शांत बसणे मला आवडते. त्या वेळात काही न करता, कोणताही विचार न करता बसून राहणे व जे काही समोर येईल ते बघत राहणे हेच योग्य असते. आमच्यासमोर अनेक जण येत-जात होते. जणू काही आमच्यासमोर पडदा उघडलाय आणि नाटकाचा एक अंक सादर होत आहे असेच वाटत होते. अर्थात या नाटकातील मुख्य कलाकार होता “निसर्ग”! बाकी सहकलाकाराच्या भूमिकेत असलेली झाडे, आकाश, पक्षी हे देखील नाटकात तितकेच महत्त्वाचे होते व त्या त्या जागी चपखल होते. हे नाटक बघून झाल्यावर काही वेळानंतर आम्ही परत खाली आलो जेवण केले व आराम केला. आमचे शेवटचे ठिकाण होते Åndalsnes. 

     नॉर्वेच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या  Romsdalsfjord च्या काठावर हे शहर वसले आहे. यालाच “नॉर्वेची गिर्यारोहण राजधानी” असे देखील म्हणतात. तिथे असलेल्या Romsdalsgondola घेऊन जरा घाबरत डोंगरावर जायला निघालो कारण एक तर निघायला आम्हाला उशीर झाला होता व परतीच्या शेवटच्या काही फेऱ्याच शिल्लक होत्या. जायचे की नाही अशा द्विधा मनस्थितीतच आम्ही निघालो. अगदी थोड्या वेळातच असलेली शेवटची परतीची फेरी आम्हाला घेणे भाग होते नाहीतर पूर्ण डोंगर उतरून खाली यावे लागले असते. मग काय वर पोहोचल्या पोहोचल्या पटापट सर्व बघण्यास सुरुवात केली. वरून Romsdalsfjord आणि Isfjorden चे खूप छान दर्शन होत होते. थोड्या वेळ तिथे फिरल्यावर मग मात्र मी एक ठिकाणी बसले व अमरेंद्रने एकट्याने जाऊन थोड्या अंतरावर असलेल्या एका view point प्लॅटफॉर्मवर जाऊन फोटो काढून आणले. तो आल्यावर आम्ही लगेचच निघालो व शेवटची गोंडोला राईड घेण्यात यशस्वी झालो. जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा काहीजण त्यांच्या मुलाबाळांसकट नाईट कॅम्पिंग करायला जाताना आम्हाला दिसले. 

     शेवटच्या दिवशीचा आमचा अनुभव जरा गमतीशीरच होता. एकतर सार्वजनिक सुट्टी असल्याने तिथे सर्व काही बंद होते. हॉटेलमधून आम्ही चेकआउट करून निघालो तेव्हा बॅगा घेऊनच बाहेर पडलो कारण तिथल्या रेल्वे स्टेशन मधील लॉकरमध्ये बॅगा ठेवूया आणि गावात एक फेरफटका मारूया असे आम्ही ठरवले खरे पण रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर समजले की लॉकर वापरण्यासाठी card payment स्वीकारले जातच नाही. खरेतर हा आमच्यासाठी पहिला आश्चर्याचा धक्का होता. कारण आम्ही गेली तीन वर्षे नॉर्वे मध्ये राहत होतो आणि इथे राहत असताना आलेल्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत कुठेही Cash वापरायची वेळ आमच्यावर आली नव्हती. फक्त आणि फक्त ऑनलाईन अथवा कार्ड पेमेंट वरच आम्ही इथे जगत होतो आणि आता त्याच नॉर्वे मध्ये एका शहरात कार्ड पेमेंट स्वीकारणार नाहीत हे समजल्यावर कोणालाही धक्काच बसले नाही का? तिथला एटीएम मधून पैसे काढले त्यालादेखील आगाऊ रक्कम जास्त द्यावी लागली होती. Cash घेऊन जेव्हा लॉकरपाशी आलो तेव्हा समजले की फक्त आणि फक्त Coins स्वीकारले जात होते. मग आता कोणाची तरी मदत घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याहून पुढची मज्जा म्हणजे पूर्ण स्टेशनवर आणि आजूबाजूच्या पूर्ण परिसरात एकही माणूस तिथे दिसत नव्हता. थोड्यावेळ वाट बघून आम्ही बॅगेसकट तिथून बाहेर पडलो व माणसांच्या शोधात फिरू लागलो. एक दोन बंद दुकानांमध्ये जरा हालचाल जाणवली म्हणून दुकानाजवळ जाऊन काही मदत मिळते का याचा अंदाज घेत असतानाच आतल्या माणसांनी आम्हाला दुकान बंद असल्याची खूण केली. मग आम्हाला काय हवे आहे ते त्यांना सांगण्यात देखील काहीच अर्थ नव्हता. कुठूनतरी लांबून एक माणूस चालत येताना दिसला. आता तोच आमच्यासाठी आशेचा किरण होता म्हणून आम्ही उत्साहाच्या भरात त्याच्या बाजूने भरभर चालायला लागलो. तर आम्हाला बघून तो आमच्यापेक्षा दुप्पट गतीने चालत जवळ असलेल्या त्याच्या गाडीत बसला आणि निघून गेला. आम्ही अवाक होऊन त्या जाणाऱ्या गाडीकडे बघत बसलो. तिथेच पुढे एक कॅफे होते. त्यामध्ये काही माणसे काम करत होती. मग तिथे जाऊन विचारले पण त्यांच्याजवळ देखील कॅश नव्हती. पण दुपारी ते कॅफे चालू ठेवणार असल्याचे समजले. Cash नाही निदान पोटापाण्याची तरी थोडी सोय होईल या विचाराने जरा बरे वाटले. एक पर्याय आमच्याकडे होता की, परत रूमवर जाऊन तिथल्या owner ला काही वेळ बॅगा ठेवण्याची विनंती करायची. पण तेवढ्यासाठी परत तिथपर्यंत जाण्याचा देखील कंटाळा आला होता. मग आम्ही तिथेच बाकावर बसून वेळ घालवण्याचे ठरवले. अचानक रेल्वे स्टेशनवर एक टॅक्सीवाला येऊन उभा राहिला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला विचारूया असे ठरवले. त्याला विचारले तर आनंदाने त्यांनी आम्हाला कॉइन देऊ केले तेव्हा एक सुखद धक्का आम्हाला मिळाला. मग सर्व सामान पटपट लॉकरमध्ये ठेवून आम्ही निघालो. थोडावेळ फिरल्यावर जेवलो आणि Oslo ला निघालो. 

     या सर्व ठिकाणांमध्ये खास करून Geiranger मध्ये असे काहीतरी होते की जे मनाला सतत मोहिनी घालत होते आणि राहून राहून त्या जागेची आठवण करून देत होते. काहीतरी खूप सुंदर, खूप निखळ असे त्या प्रवासात मिळाले होते. जे मिळाले होते, जे बघितले होते ते परत बघण्याचा योग नशिबात असेल का? की हीच आपली आणि त्या जागेची पहिली आणि शेवटची भेट असेल? या विचारातच मी Oslo मधील माझ्या घरामध्ये पाऊल टाकले. 

-अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

  एप्रिल 2026

  (आठवणींचा खजिना)

6

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links