रोज संध्याकाळी चालायला जाण्याची मला सवय आहे. एक तर त्याने व्यायाम चांगला होतो आणि दुसरे म्हणजे मन देखील उत्साही आणि प्रफुल्लित होते. रस्ता सवयीचा असला तरी देखील रोज त्याच रस्त्यावरून फिरताना देखील तेवढेच उत्साही वाटते. नॉर्वे मध्ये असताना आम्ही तीन वेगवेगळ्या भागांमध्ये राहिलो होतो. सुरुवातीच्या दोन घरांमध्ये राहताना तिथल्या घराजवळचा एखादा रस्ता पकडायचा व वाट दिसेल तिथे चालायला जायचे हा माझा रोज संध्याकाळचा आवडीचा उद्योग होता. ती दोन्ही घरे मुख्य शहरापासून थोडी लांब होती. त्यामुळे तिथले रस्ते फार गजबजलेले किंवा गर्दीचे अजिबात नसायचे. एकतर नॉर्वेमध्ये लोकसंख्या कमी व आम्ही राहत असलेले हे भाग जरा गावाबाहेर होते. म्हणजेच आजूबाजूला बरेचसे बंगले होते पण रस्त्यावरून फिरताना बोटावर मोजण्याइतकीच माणसे नजरेस पडायची. कधी कधी तर संपूर्ण वेळात एकही माणूस चालताना दिसायचा नाही. पण वाटेतील झाडे, झुडपे, पक्षी, फुलपाखरे यांची मला कायम हक्काची साथ ही असायचीच. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कौलारू घरांच्या मागे पुढे असलेल्या मोठमोठ्या बागा, त्यातील झाडे, त्यावर विहार करणारे पक्षी दिसल्यावर खूप छान वाटायचे. जसे ऋतू बदलत तसे अनेक बदल मला देखील जाणवत असत.
कधीकधी ढगांमधून उन्हाची किरणे सर्वत्र पसरल्यावर सर्व परिसर उन्हाने न्हाऊन निघाल्यासारखा वाटे. तर कधी काळे, दाट ढग पसरल्यावर सर्वत्र गंभीर, शांत, गूढ वातावरण पसरले आहे असे वाटायचे. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटताना चैतन्यमय बदलाची नांदी जाणवे. सर्व घराघरांमध्ये देखील एक प्रकारचा उत्साह संचारलेला दिसे. ऑटम बघताना येणाऱ्या हिवाळ्यासाठी सज्ज झालेली घरे दिसत. घराघरांवर चढलेल्या वेलींचे हिरवेपण संपून हळूहळू केशरी, लाल होईपर्यंतचे सर्व बदल मी अनुभवले.
जसे माणसांमाणसांचे निरनिराळे स्वभाव असतात तसेच मी अनुभवलेल्या प्रत्येक रस्त्याचा देखील एक वेगळा स्वभाव आहे असे मला वाटे. एखादा रस्ता मुळातच इतका शांत की घाई गडबडीची, गाड्यांच्या आवाजाची जणू काही त्याला सवयच नसायची. तर काही ठिकाणी गडबड , आवाजच इतके असायचे की तिथे जर कधी शांतता असेल तर ती शांतता देखील अंगावर यायची. बऱ्याचशा रस्त्यांची तर मलाच स्वतःला इतकी सवय झाली होती की वाट वाकडी करून का होईना पण अधून मधून मी तिथे एक फेरफटका मारायचे. खूप दिवसांनी जुन्या एखाद्या रस्त्यावरून फिरले की पूर्वीचे दिवस आठवायचे व ओळखीचे काहीतरी मिळाल्याचे समाधान व्हायचे.
नॉर्वे सोडायची वेळ जशी जशी जवळ यायला लागली होती तशी मनातून एक हुरहुर वाटायला लागली होती, की यापुढे बरेचसे नवीन रस्ते दिसतील, पण आता हे नॉर्वेमधले रस्ते फक्त फोटोंमध्ये किंवा माझ्या आठवणींमध्येच मला बघायला मिळतील असे सतत वाटायचे. आजही हे लिहिताना ते सर्व रस्ते माझ्या डोळ्यासमोर आलेच आणि माझे मलाच खूप छान वाटले.
आत्ता घड्याळात बघितले तर संध्याकाळचे पाच वाजून गेले आहेत. चला आता इथेच थांबते कारण माझ्या घराजवळचा रस्ता माझी वाट बघत आहे.
अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
(आठवणींचा खजिना)
24 फेब्रुवारी 2026.




















