रोजच्या व्यापातून घेतलेली एक क्षणभर विश्रांती देखील किती गरजेची व महत्त्वाची असते याचा प्रत्यय मी नुकताच घेतला जेव्हा आमचा सागरेश्वर अभयारण्य बघण्याचा योग आला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात वसलेले हे एक अभयारण्य आहे. धोंडीराम महादेव मोहिते (धो. म. मोहिते) हे सांगली जिल्ह्यातील एक थोर पर्यावरणवादी आणि महाराष्ट्रातील पहिल्या मानवनिर्मित ‘सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे’ जनक म्हणून ओळखले जातात. यांच्या पुढाकाराने व स्थानिक लोकांच्या सहकार्याने उभे केलेले हे अभयारण्य देशातील पहिले “मानवनिर्मित अभयारण्य” म्हणून ओळखले जाते.
खरे तर आम्हाला तिथे पोहोचायला खूपच उशीर झाला होता. आता हे वाक्य दोन्ही अर्थाने बरोबरच आहे. कारण आधी एक दोनदा तिथे जायचे ठरवले होते पण काही ना काही कारणाने जाणे जमले नव्हते. त्यामुळे एक तर इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा गेलो आणि या वेळेस जाता जाता इतके ट्रॅफिक लागले की जणू काही सगळ्या लोकांना अचानक कुठूनतरी आकाशवाणी झाली आहे आणि “चला घराबाहेर पडा” असा आदेश आल्यासारखे सर्वजण गाड्या घेऊन रस्त्यांवर आलेले दिसत होते. त्यातून कसातरी मार्ग काढत उशिरा का होईना पण एकदाचे आम्ही सगळे सागरेश्वरला पोहोचलो.
तिथे पोहोचलो तेव्हा समजले की नुकताच खूप पाऊस पडून गेल्यामुळे पूर्ण गावातील दिवे गेले आहेत. असे असताना तिथे थांबायचे की परत सांगलीला जायचे अशा विचारातच आम्ही अभयारण्यात प्रवेश केला. आत शिरल्या शिरल्या समोरच्या अंधारात काहीतरी चमकताना दिसले. नीट बघितल्यावर लुकलुकणारे डोळे इकडून तिकडे जाताना दिसले आणि आमच्या लक्षात आले की ते हरणांचे डोळे आहेत. आमच्या समोर अगदी काही पावलांवरच हरणांचा एक कळप उभा होता. जणू काही आमच्या स्वागतासाठीच तो तिथे आला होता. खरंतर हे आमच्यासाठी खूपच अनपेक्षित होते. कारण त्या अभयारण्यात खूप हरणे आहेत हे माहिती होते. पण आत पाऊल टाकताचक्षणी त्यांचे दर्शन घडेल हे मात्र माहीत नव्हते. आमची राहण्याची सोय अभयारण्यात असलेल्या गेस्ट हाऊसमध्येच होती. थोड्यावेळानी आम्ही जेवायला तिथून बाहेर पडलो. जेवण करून येईपर्यंत दिव्यांची ये-जा चालूच होती. पहिला अनपेक्षित सुखद धक्का पचवेपर्यंत दुसरा एक सुखद अनुभव आमच्यासाठी तयार होताच.
त्याच गावात राहणारे एक उत्तम कलाकार रवींद्र शिंदे यांना भेटण्याचा आणि त्यांच्या कलाकृती बघण्याचा योग त्या दिवशी आला. आमचे जेवण झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. घरात शिरल्यापासूनच प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या कलेची झलक बघायला मिळत होती. नंतर त्यांनी आम्हाला त्यांचे काम दाखवण्यासाठी बंगल्याच्या वरच्या मजल्यावर नेले. शंख, शिंपल्यांपासून केलेल्या अनेक कलाकृती तिथे मांडलेल्या दिसत होत्या. एके ठिकाणी शंख शिंपल्यांनी पक्ष्यांचे आकार घेतले होते, तर दुसरीकडे गणपतीची मूर्ती साकारली गेली होती. कुठे एका कोपऱ्यात बनवलेला उंट लक्ष वेधून घेत होता तर अजून एके ठिकाणी कमरेवर हात ठेवून विठ्ठल शांत उभा होता. विठ्ठलाच्या पायाखालील दगड देखील त्यांना चंद्रभागेच्या तीरी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या विठ्ठलाच्या मूर्तीवरून नजर हटवणे देखील कठीण जात होते. तिथली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आकार व त्यातील बारकावे बघून आम्ही मात्र थक्क होत होतो. शंख शिंपल्यांपासून हे असेही काहीतरी होऊ शकते असा विचारच यापूर्वी कधी केला नव्हता. सर्वत्र फक्त निरनिराळ्या प्रकारातील कलाकृतीच दिसत होत्या. त्यांची नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती, मेहनत, भक्ती आणि कलेविषयीचे प्रेम या सगळ्यांचा अमाप संगम प्रत्येक कलाकृतीतून परावर्तित होत होता आणि बघणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचत होता. त्या खोलीतील मागच्या भिंती अनेक प्रकारच्या चित्रांनी सजल्या होत्या. समुद्रकिनारा या विषयावरील अनेक चित्रे आम्ही बघितली. किनार्यावरून एक बोट ढकलत ढकलत समुद्रात नेतानाचे रेखाटलेले चित्र इतके सुंदर होते ती जणू काही चित्रातील माणसे जिवंत होऊन खरेच ती बोट ढकलायला सुरुवात करत आहेत की काय अशी शंका मनात येईल. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा जवळजवळ रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते पण तरी देखील उत्साहात त्यांनी आमचे स्वागत करून सर्व कलाकृती दाखवल्या व त्या त्या विषयीची छान माहिती आम्हाला त्यांनी पुरवली. आता हा योगायोग म्हणावा का काय मला माहित नाही पण या अभयारण्याजवळ आसपास कुठेही समुद्राचा लवलेशही नाही त्या भागाचे नाव आहे सागरेश्वर! आणि त्याच गावातील एक कलाकार सागरातील शंख शिंपल्यापासून कलाकृती बनवून इतरांना अचंबित करतो. हा निव्वळ योगायोग असू शकेल? की अजून काही???

दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा नुकतेच उजाडायला लागले होते. आम्ही जिथे राहिलो होतो त्याच्या चहूबाजूंनी अनेक पक्ष्यांचे, मोरांचे, माकडांचे आवाज कानावर येत होते. अशा एका प्रसन्न सकाळी जंगलातून एक फेरफटका मारायला आम्ही निघालो. सर्वप्रथम उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन घेतले व आम्ही आमचा फेरफटका मारायला पुढे निघणार तेवढ्यात मागून खूप जोरजोरात आवाज यायला सुरुवात झाली. लांबून येणारा आवाज हळूहळू आमच्या दिशेने येत होता. माकडांची एक खूप मोठ्ठी टोळी पळत पळत येत होती आणि तिथल्या झाडांवर जाऊन बसत होती. खूप अभ्यास करून कंटाळलेल्या लहान मुलांना अचानक खेळायला जा असे सांगितल्यावर सगळी मुलं कशी पळत सुटतील? अगदी त्याच उत्साहात सगळी माकडे पटापटा दिसेल त्या झाडांवर येऊन बसत होती. आम्हाला काही त्रास न देता त्यांच्या त्यांच्यातच मज्जा करत होती. वाटेत अनेक हरणे, सांबर, मोर, माकडे, अनेक प्रकारातील पक्षी दिसत होते. काही हरणे आम्ही आल्याची चाहूल लागतात धूम ठोकत होती तर काही झाडांच्या आडून आमच्याकडे बघत होती. काही मस्त ऐटीत चालत अजिबात न घाबरता तिथेच थांबत होती. ती त्यांच्याच विश्वात गुंग होती. आम्ही तिथे आल्याचा व गेल्याचा त्यांना जणू काही फरकच पडत नव्हता कारण ती सर्व त्यांच्या हक्काच्या घरात होती. मोर लांडोर यांचे देखील असेच होते. इकडे तिकडे फिरत होते, चालत होते, पळत होते. थोड्यावेळाने आमचा फेरफटका मारून झाल्यावर आम्ही एक दीड तासांची open जीप सफारी घेतली. त्या फेरीत आम्ही प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाचा देखील आस्वाद घेतला. वाटेतील किर्लोस्कर पॉइंट, महागुंड पॉइंट (महा – मोठा आणि ‘गुंड’ -दगड/कडा अशा अर्थाने या ठिकाणाला हे नाव मिळाले आहे.) हे सर्व बघत आम्ही चाललो होतो.
लहान असताना आपण ऐकलेल्या गोष्टींमध्ये कसे गोष्टीच्या सुरुवातीला एक “आटपाट नगर” असायचे, हिरव्यागार वनराईने, आखीव रेखीव शेतांनी ते नगर नटलेले असायच. गावातून एक नदी व्हायची, मधूनच एक रेल्वे धगधगत जायची. अगदी तशाच प्रकारचे एक गाव मी बघितले, छोटेसे पण सुंदर!!!
त्यानंतर तिथे असणारे लिंगेश्वर मंदिर, राम मंदिर हे देखील बघितले. आजूबाजूच्या शांततेमुळे मंदिराच्या परिसरात खूप छान प्रसन्न वाटत होते. त्या परिसरात सुमारे ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. ही मंदिरे १० व्या ते ११ व्या शतकातील (यादवकालीन) मानली जातात. या मंदिरांची बांधणी प्रामुख्याने पाषाणात केलेली असून ती अतिशय सुंदर आहेत. अभयारण्याच्या परिसरात ‘सागरेश्वर’ नावाचे भगवान शंकराचे अतिशय जुने मंदिर आहे. या मंदिरामुळेच अभयारण्याला ‘सागरेश्वर’ असे नाव मिळाले. एका मंदिराजवळ एक मोठे वडाचे झाड होते. त्याच्या पारंब्या अगदी जमिनीवर येऊन टेकत होत्या. वर्षानुवर्षे साथ देणारे ते झाड म्हणजे कितीतरी पक्षांचे, जीवांचे हक्काचे घर असेल नाही? हे सर्व सृष्टी सौंदर्य असेच वर्षानुवर्षे राहिले पाहिजे हाच विचार माझ्या मनात आला. ऊन जरी तापलेले होते तरी झाडाच्या सावलीत छान गार वाटत होते.
हा असा सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरेतर या ट्रिपचे संपूर्ण श्रेय मी संस्कार भारतीचे प्रांत सहमहामंत्री आणि आमच्या घरातील एक सदस्य, श्री. अमित मराठे आणि त्यांचे स्नेही श्री. मंदार वर्तक यांनाच देईन. कारण अमित दादांच्या पुढाकाराने आणि मंदार वर्तक यांच्या सहकार्याने इतके छान अनुभव आम्हाला मिळाले. मंदार वर्तक यांनी प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर येऊन त्या त्या ठिकाणाविषयी माहिती आम्हाला दिली. ही आमची ट्रिप अचानकपणे ठरली होती आणि त्यात योगायोगाने अनपेक्षितपणे एक एक गोष्टी वाढत गेल्या आणि खूप छान आठवणी तयार झाल्या. त्या एका दिवसात खूप छान शांतता, सकारात्मकता मी अनुभवली. साधेपणात देखील एक प्रकारचे सौंदर्य दडलेले होते आणि ते मला जवळून बघता आले.
अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
एप्रिल 2026.
(आठवणींचा खजिना)


































