भारतात परत येऊन बघता बघता 4 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला. नॉर्वेहून परत येताना मनात एक नक्की केले होते की, माझा लेखनप्रवास चालू ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेन. असे ठरवले खरे पण सुरुवातीला काही ना काही कामाच्या गडबडीत नवीन काहीतरी लिहायला जमतच नव्हते. मनात आलेले मनातच राहिले, कागदावर उतरलेच नाही. जसा नॉर्वे व इतर देश बघितले तसेच आता भारतात देखील फिरायचा शक्य तितका प्रयत्न करायचा. अनेक न बघितलेल्या, सृष्टी सौंदर्याने अचंबित करणाऱ्या जागा अनुभवायच्या हे ठरवले खरे, पण त्यासाठी भारत भ्रमंतीची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करायची हेच ठरवायला जरा जास्त वेळ गेला. मग अनेक आवडत्या जागांमधून अखेरीस एक ठिकाण आम्ही दोघांनी निवडले. हे ठिकाणच असे आहे की ज्याचे सृष्टीसौंदर्य बघून अनेक कवींना देखील त्याचे वर्णन करताना व्यक्त होण्याचा मोह आवरता आला नाही. मग ते अगदी कुसुमाग्रज, वसंत बापट, मंगेश पाडगावकर असोत किंवा आपल्या जन्मभूमीवर असलेले नितांत प्रेम आपल्या लेखणीतून उतरवणारे बा. भ. बोरकर असोत. “माझ्या गोव्याच्या भूमीत” ही त्यांची कविता वाचून तर अनेकांना गोव्याला जाण्याचा मोह आवरणार नाही असेच वाटते. गोवा आहेच तसे मुळी सुंदर, आकर्षक!!! पण बऱ्याचदा काय होते, गोवा म्हटले की पटकन आठवते ते म्हणजे गर्दीने फुलून गेलेले समुद्रकिनारे, बाजारपेठा, कचऱ्याचा ढीग, दिवसा किंवा रात्री बेशिस्तपणे पार्टी करणारे अनेकजण. या सर्व गोंधळामध्ये गोव्याचे शांत निवांत असे मूळ रूपच कुठेतरी झाकले गेले आहे. तर या वेळेस गोव्याचे “ते” रूप शोधायला म्हणजे अगदी तिथल्या स्थानिक भाषेत सांगायचे तर “सुशेगाद” गोवा शोधायला आणि अनुभवायला आम्ही निघालो.
या वेळेस भल्या पहाटे आम्हाला विमान पकडायचे होते. पहाटे पाच वाजून वीस मिनिटानंतरचे विमान पकडण्यासाठी अर्थातच लवकर म्हणजे मध्यरात्री अडीच वाजता घरातून निघालो. पुण्यातील शांतता अनुभवण्यासाठी बहुदा हीच योग्य वेळ असावी. कारण त्या शिवाय पुण्यामध्ये शांत, निवांत रस्ते सापडणे महाकठीणच म्हणावे लागेल. गर्दी नसल्या कारणाने कमीतकमी वेळात विमानतळावर पोहोचलो. रस्ते जरी रिकामे असले तरी विमानतळावर बऱ्यापैकी गर्दी होतीच.
आकाशातील चंद्रकोरीच्या साक्षीने आमचा प्रवास गोव्याच्या दिशेने चालू झाला. 35 ते 40 मिनिटातच आम्ही MOPA विमानतळावर पोहोचलो. पोहोचताच क्षणी विमानतळावर अनेक आकर्षक गोष्टी दिसू लागल्या. गोव्यातील संस्कृती, परंपरेची कास धरत केलेल्या अनेक कलाकृती नजरेस पडल्या. तिथे असताना आमचा टॅक्सी ड्रायव्हर जरा उशीरा येत असल्याचे समजले.
तो येईपर्यंत बाहेर जाऊन बसू असे ठरवून आम्ही बाहेर पाऊल टाकताचक्षणी समोर दिसणाऱ्या दृश्यामुळे आम्ही पार हरखून गेलो. सूर्योदय सोहळा नुकताच चालू झाला होता. लांब क्षितिजावर आकाशातील तुरळक ढगांच्या पुंजक्यांमधून हळूहळू रंग फुटू लागले होते. काही वेळाने खाली केशरी ढगांमधून प्रकाशाचे पांढरे पट्टे फाकू लागले. क्षणाक्षणाला बदलत जाणारा हा सोहळा बघताना कित्येकांची पावले तिथल्या तिथे थांबली होती. आकाशातील त्या सुंदर नाजूक चंद्रकोरीकडे पाहून असे वाटले की जणू काही तिला देखील हा सुंदर सोहळा पाहण्याचा मोह आवरता आला नसावा. एका अर्थी आमचा ड्रायव्हर उशिरा आल्यामुळे मनातल्या मनातच मी ड्रायव्हरचे आभार मानले. कारण तो जर वेळेत आला असता तर एवढा दिमाखदार सोहळा इतक्या शांतपणे आम्हाला बघताच आला नसता. काय गंमत असते नाही, खरे तर तेव्हा राहत असलेल्या घरातून रोजच मला सूर्योदय दिसत होता पण त्या दिवशी काहीतरी खास जाणवत होते. सगळे वातावरण जास्त प्रसन्न, आरामदायी, उत्साही वाटत होते. तेवढ्यात आमची टॅक्सी आली व आम्ही निघालो. पाऊण तासातच आम्ही आमच्या हॉटेलपाशी पोहोचलो.




आमचे हॉटेल म्हणजे एक होमस्टे होता. निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या गेस्ट हाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो. अंजुना बीच पासून हे ठिकाण अगदी जवळ होते. तिथे गेल्यावर दार उघडल्यावर तिथे पाळलेले दोन-तीन कुत्रे आमच्या येण्याच्या चाहुलीने पुढे सरसावले. सुरुवातीला नवीन माणूस बघून नाराजीने त्यांनी विरोध दर्शवला. पण नंतर तोच विरोध मैत्रीत बदलायला फार वेळ लागला नाही. कारण त्यांच्या पाठोपाठ लगेचच त्या बंगल्याची मालकीण आम्हाला बघून आमच्या स्वागताला बाहेर आली. हसून अगत्याने तिने आमचे स्वागत केले. रात्री झोप नीट न झाल्यामुळे आम्ही आधी थोडा आराम करण्याचा ठरवले.
आराम करून झाल्यावर साडेआठ नंतर हॉटेलमध्येच असलेला ब्रेकफास्ट करण्यास आम्ही बाहेर पडलो. घराच्या पुढच्या आवारामध्ये टेबल खुर्ची मांडून सर्वांसाठी बसण्याची सोय केली होती. सकाळचे कोवळे ऊन एका टेबलावर येऊन थडकले होते. आम्ही बसण्यासाठी तेच टेबल निवडले. हिरव्यागार झाडांनी, रंगीबिरंगी फुलांनी भरून गेलेल्या परिसरात, कोवळे ऊन अंगावर घेत काही वेळ शांत बसणे हा अनुभव देखील किती छान आहे नाही का? तिथेच घरामध्ये ब्रेकफास्ट तयार होत होता त्यामुळे त्या सर्व पदार्थांचा एकत्रित वास हवेत मिसळत होता. त्या वासाने छान भूक लागली होती. काही वेळानंतर आमच्यासमोर एका छोट्या बास्केटमध्ये गरमागरम पाव, बटर व जॅम आणि एका काचेच्या बाऊलमध्ये साखरांबा असे सर्व मांडून ठेवण्यात आले. पावाचा पहिला घास घेताच त्यातील एक वेगळेपण जाणवले. मग विचारल्यावर समजले की पावाच्या त्या प्रकाराला Poi म्हणतात. त्या पोईची(Poi) चव नेहमीच्या पावापेक्षा अधिक रुचकर होती. त्यांत गव्हाच्या कोंड्याच्या केलेल्या वापरामुळे इतर पावांपेक्षा तो जास्त खुसखुशीत लागत होता. पारंपारिक पद्धतीने पोई बनवताना यीस्टऐवजी ‘माडी’ वापरत असत. ही Poi आकाराने गोल आणि थोडी चपटी असते. आजही काही ठिकाणी माडीचा वापर केला जातो. तिथले बाकीचे पदार्थ देखील छान होते.
एक स्कूटर भाड्याने घेऊन आम्ही फिरण्यासाठी निघालो. या वेळेस तशी खूप ठिकाणे बघण्याचे काही ठरवले नव्हते. त्यामुळे आरामात रस्ता दिसेल तसे आम्ही जाऊ लागलो. वाटेत एक जुनी बाजारपेठ लागली. लगेचच नाताळ सण असल्याने सर्वत्र आकाशकंदील, लाईटच्या माळा, अनेक शोभेच्या वस्तू या सर्व गोष्टींमुळे सर्व बाजारपेठ भरली होती आणि ते सर्व खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी प्रत्येक दुकानांमध्ये दिसत होती. रस्त्याच्या एका कडेला टोपल्याटोपल्यांमधून निरनिराळ्या रंगाची फुले, गजरे, माळा विकायला काही बायका बसलेल्या दिसत होता. येणाऱ्या प्रत्येकाकडे आशेने बघत कोण आपली फुले खरेदी करेल का याचा अंदाज त्या घेत होत्या. खरेदीसाठी कोणी कुटुंबाबरोबर तर कोणी एकेकटे आल्याचे दिसत होते. त्याच दिवशी संध्याकाळी तिथल्याच एका प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर अशीच एक बाजारपेठ बघितली पण सकाळी बघितलेल्या गर्दीमध्ये आणि आत्ताच्या गर्दीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. सकाळच्या गर्दीमध्ये त्या सर्व चेहऱ्यांमध्ये एक साधेपणा दडला होता. तर संध्याकाळच्या गर्दीमध्ये बऱ्याच प्रमाणात मौज मज्जा दिसत होती. प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या वस्तू बघत होते. कोणी स्वतःचेच फोटो काढण्यात तर कोणी खरेदी केलेल्या वस्तूंचे फोटो काढण्यात गुंग होते.
कधी शांत तर कधी गर्दीने गजबजलेला गोवा या वेळेस आम्ही अनुभवला. शांत, निवांत समुद्रकिनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज कानात आणि मनात भरून घेतला. माझ्यासाठी “समुद्रकिनारा” ही एक अशी जागा आहे की ज्या जागेचा कधीही कंटाळा येत नाही. दरवेळेस काहीनाकाही नाविन्य तिथे जाणवतेच. मग ती समुद्र किनाऱ्याकडे घेऊन जाणारी एक शांत, हिरवीगार वाडी असो किंवा प्रत्येक लाटेबरोबर येणारे व सतत आपल्याच नादात व खूप कामात असल्यासारखे वाटणारे किनाऱ्यावरील लहानसहान जीव असोत. तिथल्या काळ्याभोर दगडांवर येऊन आदळणाऱ्या निळ्याशार लाटा बघत कधी सूर्योदय तर कधी सूर्यास्त बघितला. आकाशातील बदलत्या रंगाचे छायाचित्रच जणू पाण्याखाली रेखाटले गेले आहे असाच भास होत होता. हे सर्व बघताना पूर्वी आम्ही जेव्हा Dauna paula च्या समुद्रकिनाऱ्यावर आलो होतो त्याचीच आठवण मला झाली. तेव्हा पण आम्ही सूर्योदयाची वेळ गाठत आमच्या हॉटेल जवळचा समुद्रकिनाऱ्याचा रस्ता धरला होता. आम्ही दोघे आणि मासे पकडायला आलेला एक माणूस सोडला तर तिथे बाकी कोणीच नव्हते.
सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर सर्वत्र चैतन्यमयी वातावरण पसरत होते. हवेतील गारठा आणि कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ आम्ही तिथे बसलो होतो. आत्तापर्यंत असे कितीतरी सुंदर क्षण अशा कितीतरी समुद्रकिनाऱ्यांवर घालवले आहेत. तरी प्रत्येक वेळेचा अनुभव काहीना काही एक वेगळी गोष्ट घेऊन येतो असेच मला वाटते. गोव्याच्या इतिहासाची, अनेकांच्या बलिदानाची, अनेकांनी सहन केलेल्या अन्यायाची आणि त्यानंतर मिळालेल्या विजयाची साक्ष ठरलेले असे गोव्याचे समुद्रकिनारे, तिथला निसर्ग आणि तिथले किल्ले हे तिथल्या भूतकाळातील दडलेल्या गोष्टी तर सांगत नसतील? गोव्यातील सर्व ठिकाणे बघताना हाच विचार माझ्या मनात येतो. योगायोगाने आम्ही जे 4 दिवस गोव्यामध्ये होतो त्यापैकी एक दिवस होता “19 डिसेंबर” ज्या दिवशी गोव्यातील 450 हून अधिक वर्षांची पोर्तुगीज राजवट संपुष्टात आली होती. पण काही जुन्या परंपरा तिथे आजही टिकून आहेत.
तिथल्या इतिहासाबरोबरच तिथली खाद्यसंस्कृती देखील विशेष आहे. जिथे निसर्ग आणि खाद्यसंस्कृती हातात हात घालून एकमेकांचे वेगळेपण जपत आहेत अशा गोव्यामध्ये अनेक विविध पदार्थ चाखायला आम्ही अनेक ठिकाणी फिरलो.
‘गोव्याच्या मिठाईची राणी’ म्हणून ज्याची ओळख आहे तो पदार्थ म्हणजे, “बेबिंका”!!! नारळाचे दूध, अंडी, मैदा या बरोबर साखर, तूप,मीठ या पासून हे बनवतात. त्याशिवाय कंडेन्स्ड मिल्क, व्हिप्ड क्रीम आणि बिस्किटांचा चुरा वापरून बनवलेले “सेरादुरा (Serradura)”
याची अप्रतिम चव आजही माझ्या जीभेवर रेंगाळत आहे. या दोन्हीमध्ये मला स्वतःला “सेरादुरा” जास्त आवडले. गोडाबरोबरच तिखट पदार्थांमध्येही गोवा मागे नाही. माशांचे अनेक प्रकार आणि नारळाच्या दुधातील रस्सा! फक्त आणि फक्त हे खाण्यासाठी गोव्याला येणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा उल्लेख ‘पावा’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पोर्तुगीज काळात सुरू झालेली ही पावाची परंपरा आजही गोव्याच्या घराघरात जिवंत आहे. गोव्यातील ‘पोडेर’ (Poder – स्थानिक पावे विकणारे) आजही सायकलवर येऊन ताजे पाव विकतात. निरनिराळे पावाचे प्रकार वेगवेगळ्या पदार्थांबरोबर खाण्याची जणू काही तिथली परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. आम्ही देखील या वेळेस अशा काही पदार्थांचा आस्वाद घेतला.
शेवटच्या दिवशी पणजीला गेलो. तिथे मात्र आत्तापर्यंत अनुभवलेल्यापेक्षा अगदी विरुद्ध चित्र होते. सगळीकडे गर्दी, वाहनांचे आवाज होतेच. तिथे अर्धा दिवस घालवताना देखील गर्दीमुळे सगळे नकोसे वाटत होते. येताना ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशिरा आमचे विमान सुटणार असल्याने परतीचा प्रवास जरा कंटाळवाणा झाला खरा पण 4 दिवस खूप आनंदात, उत्साहात गेल्याचा आनंद त्यामध्ये अधिक होता.
प्रत्येक ठिकाण बघितल्यावर त्या त्या ठिकाणातील एक चांगली गोष्ट शिकावी, जगून बघावी असेच वाटते. गोव्यातील सुशेगाद आयुष्य जगण्याची तिथल्या लोकांची वृत्ती पाहून एकच वाटले, खरच प्रत्येकानेच सततच्या कामातून स्वतः ला बाजूला सारून थोड्यावेळासाठीतरी असे जगून बघितले पाहिजे. पुढे जाण्याआधी एक क्षण तरी थांबले पाहिजे. काय माहिती, कदाचित तुम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देखील त्या क्षणात दडलेली असतील??? तुम्हाला काय वाटते???
अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
(आठवणींचा खजिना)




















5 responses to “एक “सुशेगाद” अनुभव…”
Khup chan Anuradha Nakki ch parat Goa trip karu
सुंदर वर्णन
Thank You
Khup chan Anuradha Nakki ch parat Goa trip karu
Thank You