Preikestolen

 आज मी ज्याबद्दल लिहिणार आहे ते नॉर्वे मधील एक महत्वाचे आणि सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक शहर आहे. 1969 साली North Sea मध्ये सर्वप्रथम तेलाचा शोध लागला. त्यानंतर पार पडलेल्या अनेक चर्चांमधून North Sea मधील तेल उद्योगासाठी on-shore Center म्हणून या शहराची निवड झाली आणि त्यानंतर या शहराची भरभराट झाली. ही एवढी तोंडओळख करून दिली आहे तर आता बऱ्यापैकी सर्वांना समजलेच असेल की मी Stavanger बद्दल बोलत आहे. 

     ज्या ठिकाणी जाण्याचा जवळ जवळ 2 वर्षे आम्ही विचार करत होतो ते Stavanger बघण्याचा योग अखेरीस या वर्षी आला. आला म्हणजे काय, योग जुळवून आणला असेच म्हणावे लागेल. झाले काय होते, या ट्रिपच्या आधी दहा दिवसांपूर्वीच अजून एक ट्रिप झाली होती. त्यामुळे परत प्रवास करण्याचा थोडा कंटाळा आल्यासारखे वाटत होते. पण हीच एक संधी आमच्याकडे होती. जर का ही संधी आम्ही चुकवली असती तर कदाचित परत इतक्यात Stavanger ला जायला मिळेल की नाही याविषयी खात्री वाटत नव्हती.  मग काय, ही संधी न दवडता बॅग भरली व आम्ही निघालो. या वेळेस रेल्वे मधून प्रवास करायचे ठरवले. रात्री 10.30 वाजता Oslo हून निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 वाजता Stavanger ला पोहचलो. विमानापेक्षा जरी जास्त वेळ लागला तरी रात्री प्रवासात चांगली झोप लागल्यामुळे थकवा फारसा जाणवत नव्हता. 

     Oslo पासून सात ते आठ तासांवर वसलेले हे एक सुंदर शहर. शहराची रचना जितकी सुंदर आणि नीटनेटकी, तितकाच इथला निसर्ग लहरी असेच म्हणावे लागेल. इथल्या लहरी निसर्गाची झलक आम्ही चांगलीच अनुभवली. आपल्याकडे कसे श्रावण महिन्यात असते, आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत पावसाची सर येते. त्यानंतर काही क्षणात परत सगळे लख्ख होते. अगदी तसेच इथे सतत असते. पण Norway मध्ये येऊन निसर्गाचा हाच तर एक महत्वाचा नियम मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. की निसर्गाशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे. एकदा का तुम्हाला ते गणित जमले की तुमच्यासारखे सुखी तुम्हीच!!! असो, तर या वेळेस तिथे जाण्याचे एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे, “Preikestolen”!!!

     Stavanger मध्ये पोहोचलो त्याच दिवशी आम्ही Preikestolen करण्याचे ठरवले. तो निर्णय किती योग्य ठरला ते आम्हाला hike झाल्यावर जाणवले. मुख्य शहरापासून गाडीने निघाल्यावर अंदाजे चाळीस मिनिटांचा प्रवास करून तिथल्या बेस लोकेशनला आम्ही पोहोचलो. तिथे लवकर पोहोचल्यामुळे गर्दी फारशी दिसत नव्हती. पार्किंगसाठी देखील लगेच जागा मिळाल्यामुळे जरा बरे वाटले. हा! एक महत्त्वाचा मुद्दा अशा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी hike करण्यासाठी जाणार असाल तर शक्य तितक्या लवकर चढायला सुरुवात करणे हेच योग्य असते. मे महिन्याच्या सुरुवातीला आम्ही हा प्लॅन केला होता. त्याचा फायदा म्हणजे, एकतर बऱ्याच ठिकाणी बर्फ पूर्ण वितळलेला असतो. शिवाय दिवस मोठा होत असतो त्यामुळे hike पूर्ण करायला जास्त वेळ लागला तरी रात्री अंधार पडायच्या आत आपण खाली पोहचू शकतो. 

     बेसला पोहोचल्यानंतर लगेच आम्ही hike करायला सुरुवात केली. Preikestolen ह्याला  इंग्रजीमध्ये “The Pulpit Rock”, ” Pulpit” असे म्हणतात. हा नॉर्वेतील Rogaland County मधील एक प्रसिद्ध ट्रेक आहे. Lysefjord वर असलेल्या या डोंगराची उंची समुद्रसपाटीपासून 604 मीटर आहे. आमची सुरूवात तर अगदी उत्साहात झाली. पहिल्यांदा सरळ रस्ता होता. त्यानंतर काही वेळानंतर काही कमी, जास्त उंचीचे रस्ते वाटेत दिसू लागले. वाटेत मधे मधे असलेली अवघड चढण चढताना, कड्या कपारीतून जाताना जरी दमायला झाले तरी आजूबाजूचा निसर्ग अनुभवताना खूपच छान वाटत होते. नेपाळमधील शेरपांनी येथे काही अवघड भागात दगडाच्या साहाय्याने रस्ते बांधले आहेत हे वाचून मला आनंद झाला. बरेचसे शेरपा तिथे प्रत्यक्ष काम करताना देखील दिसत होते. त्या दिवशी 1 मे असून देखील त्यांना काम करावे लागत आहे हे बघून त्यांच्यासाठी थोडे वाईट देखील वाटले. किती अवघड काम अगदी चिकाटीने ते करत होते. त्यांच्याच कामाची, कष्टाची फळे आपल्यासारख्या अनेक पर्यटकांना अशा अनेक ट्रेक दरम्यान मिळतात नाही का?

     अशी कितीतरी ठिकाणे वाटेत लागली जिथे थांबून फोटो काढण्याचा मोह झालाच. मला स्वतःला तर एक दोनदा दमून बसावेसे वाटले. पण असे कितीतरी जण मला दिसले की त्यांचे वय जरी जास्त असले तरीदेखील न थांबता, न थकता ते चढत होते. त्या सगळ्यांकडे बघून माझा देखील उत्साह वाढत गेला. दीड ते दोन तासात आम्ही पूर्णपणे वरती पोहचलो. नशिबानी हवेची पण उत्तम साथ आम्हाला त्यादिवशी मिळाली होती. मुख्य म्हणजे पाऊस आणि वारा फार नव्हता. त्यामुळे चालणे सुखाचे होत होते. सगळे अगदी असे छान जुळून आले होते त्यामुळे प्रवास पण उत्तमच पार पडणार नाही का? वरती जेव्हा पोहोचलो तेव्हा मला जरा दमल्यासारखे वाटत होते पण पूर्ण डोंगर चढल्यावर समोर दिसणारे दृश्य बघितल्यानंतर दमणूक कुठल्या कुठे पळून गेली. 

     एक उंचच्याउंच कडा त्याच्या पायथ्याशी लांबवर पसरलेले Lysefjord बघताना डोळ्यांचे पारणे फिटत होते. Fjord मधील पाणी इतके सुंदर दिसत होते की, जणू काही आकाशातील रंग त्यात मिसळले असल्याचा भास होत होता. खूप वेळ शांतपणे बसून बघत बसावा असाच तो सर्व नजारा होता. खूप दमल्यावर शांतपणे बसावे आणि प्रत्येक श्वासाबरोबर तिथली सर्व शांतता, सकारात्मकता, सुंदरता आपल्या शरीरात मुरवण्याचा प्रयत्न करावा असेच वाटत होते. प्रत्येकजण डोळ्यांमध्ये व कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद करण्यासाठी धडपडत होता. आम्ही पण गेल्या जास्त गर्दी व्हायच्या आत फोटो काढून घेतले. तिथल्या मुख्य कड्यावर उभे राहून फोटो काढण्यासाठी तर रांगच लागली होती. आम्ही पण रांगेत उभे राहून आमचा नंबर यायची वाट बघू लागलो. 5 मिनिटात आमचा नंबर लागला. मग पटकन फोटो काढून आम्ही बाजूला झालो. 

     त्यानंतर भूक लागल्यामुळे तिथेच एका बाजूला बसून आम्ही जेवण केले. त्यानंतर वारे सुद्धा वाढले होते. मग मात्र फार वेळ न दवडता आम्ही तिथून निघालो. आता मात्र गर्दी देखील वाढायला लागली होती. आम्ही वेळेतच व कमी गर्दी असताना सर्व शांतपणे बघू शकलो याचा मला आनंद झाला. खूप मनापासून ठरवलेले असे काहीतरी खूप जिद्दीने आणि मेहनतीने पूर्ण करण्याचा आपण सगळेच खूप प्रयत्न करतो आणि मनासारखे सगळे जुळून आणि घडून आल्यावर आपलाच आत्मविश्वास अजूनच वाढतो. तसेच काहीसे माझे झाले होते. त्यामुळे परत येताना देखील आधी बघितलेली तीच सर्व ठिकाणे लागली. पण तरीदेखील या वेळेस निसर्गाची किमया बघताना अधिक आनंद आणि समाधानाची भावना मात्र वाढली होती. 

     खाली आल्यावर मस्त गरम गरम कॉफी घेतली. आता मात्र माझे पाय भरपूर बोलायला लागले होते. या दमण्यात देखील एक मज्जा असते असे मला वाटते. पूर्वी एकदा भारतामध्ये असताना मी असाच एक ट्रेक केल्यानंतर सुद्धा मला असेच वाटले होते की, आता बास. आता यापुढे मी असे कुठलेच डोंगर चढू शकणार नाही. किती त्रासदायक आहे हे. पण एकदा का तुम्हाला ती चटक लागली की त्याचा त्रास देखील हवाहवासा वाटू लागतो असेच माझे देखील झाले. माझ्यासारखेच इतर अनेक जणांचे देखील असेच होत असेल बहुतेक. तुम्हाला देखील असाच अनुभव कधी आला आहे का हे मला कमेंट करून सांगा. खूप दमल्यामुळे कॉफी घेतल्यावर जरा तरतरी आली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी थोडा आराम केला. 

     धावपळत का होईना पण एक ठिकाण पदरात पडले आणि संपूर्ण ट्रिप देखील अविस्मरणीय झाली हेच महत्वाचे नाही का? खरेतर या संपूर्ण ट्रिप चे श्रेय मी दोन व्यक्तींना देईन. ते म्हणजे Petter आणि Monika! अमरेंद्रच्या company मधील मॅनेजर म्हणून माझी आणि Petter ची ओळख झाली. आणि petter ची बायको म्हणून मोनिकाशी! आमची संपूर्ण ट्रिप, Hike ह्याचे नियोजन करण्यापासून ते अगदी पूर्ण करून आम्ही निघेपर्यंत ह्या दोघांनी दाखवलेल्या आपुलकीमुळे आणि केलेल्या मदतीमुळे त्यांनी आमच्या दोघांची मने जिंकली. घरापासून दूर असून देखील घरच्या व्यक्तींबरोबर असल्याची भावना आम्हाला या 4 दिवसात मिळाली. 

    Preikestolen झाल्यावर 2 दिवसानंतर  Stavanger मधीलच “Dalsnuten” नावाची अजून एक लहान Hike आम्ही केली. पाठोपाठ 2 सुंदर hike करता आले त्यांचा आनंद तर होताच. पण सगळ्यात मोठी परीक्षा तर अजून पुढेच होती. त्याच्या तयारीसाठीच केला होता हा सर्व अट्टाहास! त्या मोठ्या परीक्षेचे नाव होते, “Trolltunga”!!! पुढच्या काही दिवसातच या मोठ्या परीक्षेला सामोरे जायचे होते. हे एवढे मोठे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे का नाही ह्याचा खुलासा लवकरच होणार होता. हातात अजून काही दिवस होते आणि माझ्यामते राहिलेली शारीरिक, मानसिक तयारी करण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा होता. 

अनुराधा अमरेंद्र उकिडवे. 

“आठवणींचा खजिना”

12 ऑगस्ट 2025.

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Latest Posts



Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links