17 मे syttende mai

एखाद्या देशाबद्दल जाणून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना समजून घेण्यासाठी, तिथल्या प्रथा, इतिहास हे सर्व जाणण्याकरता महत्वाचे असते ते म्हणजे त्यांचे सण बघणे किंवा अनुभवणे. 2022 मध्ये नॉर्वेला आल्यापासून येथील एक खास सण अनुभवण्याची संधी गेले तीन–चार वर्षे मला मिळाली. आलेल्या प्रत्येक वर्षी ती संधी न दवडता त्याचा पुरेपूर आनंद मी घेतला. तो दिवस म्हणजे “17 मे”! 

मार्च 2022 मध्ये जेव्हा सर्वप्रथम आम्ही नॉर्वेमध्ये आलो तेव्हा  बऱ्याच स्थानिक व इतर लोकांकडून नॉर्वेतील “17मे” बद्दल ऐकले. त्यामुळे आमच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली व आम्ही पण या दिवसाची वाट पाहू लागलो. जसा जसा हा दिवस जवळ येत होता तसा इथल्या लोकांचा उत्साह वाढताना दिसत होता. प्रत्येक घरातील व्यक्ती आपापल्या घरातील स्वच्छता, बागकाम, डागडुजी, रंगकाम असे करताना दिसू लागली. जणू काही आखलेल्या नियमाप्रमाणे 17 तारखेच्या आत आपले घर स्वच्छ करण्याच्या मोहिमेवरच सर्व आहेत असे दिसू लागले. प्रत्येक घरात नोर्वेचा (किमान एक तरी) झेंडा लावला गेला. आणि अखेरीस तो दिवस आला. 

17 मे हा नॉर्वेचा “संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो. 17 मे 1814 रोजी नॉर्वेच्या राज्यघटनेवर Eidsvoll मध्ये स्वाक्षरी झाल्यामुळे 17 मे (syttende mai) साजरा करतात. या दिवशी नॉर्वेजियन राष्ट्रीय सुट्टी असते. प्रसिद्ध नॉर्वेजियन कवी Henrik Wergeland ह्यांच्या पुढाकाराने हा दिवस लहान मुलांचा सहभाग असलेला “उत्सव” म्हणून साजरा करतात. 

या दिवसाची सुरूवात होते Breakfast buffet नी. अनेकांकडे मित्रपरिवार व जवळचे नातेवाईक यांना अश्या breakfast साठी खास आमंत्रण दिले जाते. Scrambled egg, smoked salmon, cured meat, cheese, beef patty अश्या अनेक नानाविध पदार्थांबरोबरच champagne चा देखील आनंद घेतला जातो. त्यानंतर सगळे मिळून मुख्य parade बघण्यासाठी बाहेर जातात. 

शाळेतील विद्यार्थांची parade हे या दिवसाचे खास आकर्षण! या दिवशी अनेक शाळा या parade मध्ये सहभागी होतात.  लहान लहान मुले, मुली देखील यामध्ये मागे नसतात. हवा कशीही असली म्हणजे कितीही वारा, पाऊस काहीही असले तरी सर्वजण उत्साहाने सहभाग घेतातच.  बऱ्याच शाळांबरोबर brass band असतो ज्यावर , “Ja, vi elsker dette landet” हे राष्ट्रगीत वाजवतात. Parade चालू असताना “Hip hip, Hurray” असे ओरडून आनंद व्यक्त केला जातो. सकाळी 10 वाजता Akershus Fortress पासून सुरु झालेल्या parades Rådhusplassen पर्यंत जाऊन दुपारी 1.30 च्या सुमारास संपतात. Oslo Royal Palace वरून सर्व parades जातात. रॉयल पॅलेसच्या बाल्कनी मध्ये उभे राहून शाही कुटुंबातील सदस्य parades चे स्वागत करतात. सलग 3-4 तास न थकता पॅलेसच्या बाल्कनी मधून सर्वांना हात हलवून अभिवादन करतात. सर्व सोहळा अगदी बघण्यासारखा असतो. एकी, देशाभिमान सर्वांच्या बोलण्यातून, देहबोलीतून दिसत असते. 

ब्यूनाड (Bunad) हे नॉर्वेच्या पारंपारिक पोषाखाचे नाव आहे. मूळ लोकरीपासून बनवलेल्या ह्या पोषाखामध्ये चांदीचे नक्षीकाम आणि हाताने केलेली एम्ब्रोईडरी असते. परंपरेनुसार कुटुंबातील सदस्यांनी स्वतःच्या हाताने शिवलेले आणि एम्ब्रोईडरी केलेले हे “Bunad” वारसाहक्काने मिळतात. त्यामुळे प्रत्येक पोषाख हा वेगळा व वैविध्यपूर्ण असतो. एकतर हे अत्यंत महाग असतात आणि ते वापरताना वेगवेगळ्या भागांनुसार किंवा वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळे नियम देखील पाळावे लागतात. जसे की,
१) पारंपारिक Bunad घातल्यावर खूप जास्त makeup नाही करू शकत. 
२) Sunnmøre region येथे अविवाहित स्त्रिया लाल stockings आणि विवाहित स्त्रिया काळे stockings वापरतात.
3) Svalbard मधील पारंपरिक bunad घालण्यासाठी तुम्हाला तिथे चारही ऋतु राहिले पाहिजे. 
म्हणजे, तुम्ही जिथे राहता तिथल्या महत्वाच्या नियमांचे पालन करूनच हे Bunad वापरले पाहिजे अशी परंपरा आहे. पण आत्ताच्या आधुनिक काळात व्यक्तिगणिक वाटणाऱ्या सोयीनुसार, आवडीनुसार काही बदल केले गेले आणि मूळ Bunad चे दुसरे रूप तयार झाले ते म्हणजे “Festdrakt”!!! 
ह्यामध्ये मूळ लोकरीची जागा अन्य कोणत्याही कापडाने घेतली. शिवाय काही कडक नियम वगळून त्याची जागा Fashion आणि आधुनिकतेने घेतली. खास करून 17 मे, लग्नसमारंभ या वेळेस हे Bunad घालतात. आपल्याकडे कसे साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचे रूप वेगळे, अधिक छान भासते. अगदी तसेच हे Bunad घातल्यावर प्रत्येक Norwegian स्त्रीचे रूप देखील अजून खुलून येते असे मला वाटते. 

Norwegian Bunad - AI generated Image
Norwegian Bunad – AI generated Image

काही गोष्टी अश्या असतात की वर्षांनुवर्षे त्या केल्या जातात ज्यामध्ये खंड अजिबात पडत नाही. भले त्या जरा अतरंगी, विचित्र वाटल्या तरी ती एक “परंपरा” मानली जाते. नॉर्वेमध्ये 17 मे आणि “Russ” हे एक समीकरण असेच म्हणावे लागेल. High school च्या Upper Secondary school मधील हे विद्यार्थी “Russ” म्हणून ओळखले जातात. शाळेची 13 वर्षं पूर्ण झाल्याच्या आनंदात ही परंपरा साजरी केली जाते. एप्रिल पासून 17 मे पर्यंत हे सर्व “Russ” एक ठराविक लाल, निळ्या पँट मध्ये दिसतात. काही अतरंगी acitivity, challenges, pranks त्या ठराविक काळात पूर्ण करणे हेच त्यांचे ध्येय असते. त्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये त्यांच्या रंगवलेल्या बसेस मोठ्या आवाजात गाणी लाऊन जाताना देखील मी पहिल्या आहेत.  17 तारखेला असणाऱ्या parades मध्ये देखील Russ सहभागी होतात. 

Russ- AI generated Image

Oslo मधील प्रसिद्ध University Square येथे संध्याकाळी   पारंपारिक नृत्याचे POLS DANCE चे आणि समूह गीतांचे सादरीकरण असते. मोठ्या संख्येने अनेक जण त्यामध्ये सहभागी होतात. राष्ट्रगीतानंतर ते नक्की काय गातात ते मला नाही माहीत पण ते सर्व ऐकायला खूप छान वाटते. अनेक वयस्कर लोकांबरोबर आजची तरुणाई देखील आपल्याला परीने इथली संस्कृती, इतिहास, परंपरा धरून पुढे जाताना बघायला मिळते. 

देश, ठिकाण कोणतेही असो, माणसाचे वय काहीही असो, सर्वांना नक्की अनुभवायला मिळणारी एक गोष्ट म्हणजे,”बदल”!!! मग तो चांगला असो वा वाईट असो. तो सर्वांनाच अनुभवायला लागतो. मग त्याला नॉर्वेतरी अपवाद कसे असेल नाही का? 2022 पासून 2025 पर्यंत मी 4 वेळा हा सण पाहिला आहे. पण या वर्षी मला एक गोष्ट प्रकर्षाने खटकली. एक तर या वर्षी काय तर म्हणे नियमांमध्ये बदल करून दारू सकाळपासूनच विकत होते. त्यामुळे तरुण पिढीला तर जणू काही आकाशच ठेंगणे झाले होते. पण त्याचा परिणाम मात्र अनेक जणांना भोगायला लागत आहे. इतर वेळी इतके शांत असणारे नॉर्वेजियन अश्या काही वेळेस अविचारीपणाने इतके वेगळे कसे काय वागू शकतात ह्याचे कोडे मात्र काही सुटत नाही. बऱ्याच जणांना, खास करून जेष्ठ नागरिकांना देखील या काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. पण काळ बदलत आहे तसे अनेक चांगल्या गोष्टी देखील बदलत आहेत हेच खरे सत्य आहे. 
असो…असे म्हणतात की जे चांगले आहे तेवढे धरून आयुष्यात पुढे जात राहिले पाहिजे. त्यामुळे ह्या अश्या काही न पटणाऱ्या कमीअधिक गोष्टी सोडल्या तर इथे सर्वच खूप सुंदर आहे. “17 मे” असा हा खास दिवस अनुभवण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळाली तेव्हा ती संधी न दवडता सर्व बघून घेतले. ह्या दिवसाचे माझ्या आयुष्यात देखील एक महत्वाचे स्थान आहे. 4 वर्षांपूर्वी माझा पहिला लेख ह्याच दिवशी, ह्याच विषयावर लिहला होता. त्यातच काही बदल करून आज परत एकदा लिहित आहे. जरी परत तोच लेख लिहित असेन तरी तेव्हा झालेला तितकाच आनंद आणि मज्जा मला आत्तादेखील हे सर्व लिहिताना येत आहे. काही जुन्या आठवणी त्या निमित्ताने परत एकदा ताज्या होत आहेत आणि मला सांगायला आनंद होत आहे की, आता त्या जोडीला आपले “You tube channel” देखील आहे. त्याची लिंक खाली देत आहे. जसे जमेल तसे तिथे वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहेच. जसे आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व लेखांना उत्तम प्रतिसाद दिलात तसेच You tube channel ला देखील द्याल अशी आशा करते. 

धन्यवाद

You tube ची लिंक – https://youtu.be/DF50BL7joLI

अनुराधा अमरेंद्र उकिडवे. 

“आठवणींचा खजिना”.

9

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Latest Posts



Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links