मूल जन्माला येते तेव्हा खऱ्या अर्थी प्रत्यक्षपणे, डोळसपणे त्याचा जगाशी संबंध येतो. पण त्याआधीपासूनच जगण्यासाठी त्याच्यातील संघर्ष, धडपड जन्माला आलेली असते. पहिला श्वास घेताचक्षणी प्रत्येक श्वासाबरोबर अखंडितपणे साथ असते एका गोष्टीची “जिद्दीची”!!! मग ते कुस बदलून पालथे पडणारे बाळ असो वा पहिल्या टाकलेल्या पावलाच्या आनंदात बेभानपणे घरभर फिरणारे एक लेकरू असो! भले टप्पे जरी बदलले तरी त्यामागे असणारी जिद्द मात्र कायम तीच असते! थोडे मोठे झाल्यावर शाळेत पाहिले पाऊल टाकताना आई-वडिलांचा हात सोडून बाह्य जगाशी समजून उमजून घेताना प्रत्येकालाच लहान मोठ्या प्रमाणात आव्हाने येतात. ती आव्हाने पेलून त्यातून मार्ग काढत पुढे आयुष्याची वाटचाल करताना नकळतपणे दिवसेंदिवस आपण खंबीर बनत जातो. जसे जसे वय वाढते तसे आपण अनुभवलेले कित्येक संघर्ष आपल्यालाच आता लहान भासतात. आयुष्याची मोठी आणि कठीण परीक्षा देताना शाळेच्या परीक्षा कितीतरी सोप्या वाटतात.
आयुष्यात जसे पुढे जातो तसे अनेक चांगले-वाईट प्रसंग येतात. प्रत्येक प्रसंग काही ना काही शिकवत असतात. आपण फक्त कान व डोळे उघडे ठेवून प्रत्येक प्रसंगाकडे बघितले पाहिजे. अनेकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा वाटते आता पूर्णपणे आपण या परिस्थितीत अडकत जात आहोत. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण धडपडत असतो पण अजून आत आत अडकत आहोत की काय असेच आपल्याला वाटते. अशा वेळेस कित्येकांना विसर पडतो आपल्या जुन्या “सखीचा” आपल्यातील “जिद्दीचा”!!!
तिला मनात जिवंत ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून पावले टाकत राहणे हेच त्यावेळेस महत्त्वाचे असते. जिथे सगळे संपले आहे असे वाटते, तिथूनच परत सुरुवात करण्यासाठी ही जिद्द पुरेशी असते. त्यानंतर आपोआप नवीन वाटा सापडत जातात. आलेल्या प्रत्येक नवीन दिवशी मागे वळून न पाहता धीराने, संयमाने वाटचाल करत राहणे हेच फक्त आपल्या हातात असते. वाट जरी अवघड वाटली, वाटेत दिसत असल्या जरी असंख्य अडचणी तरी ती सोप्पी करण्याची ताकद प्रत्येकामध्ये नक्की असते. आपण स्वतः स्वतःला ओळखायला चुकतो. आलेल्या प्रसंगामुळे घाबरून जातो, अक्षरशः कोलमडून जातो. त्यावेळेस प्रकर्षाने गरज असते स्वतःची ताकद ओळखण्याची. एकदा का तिची व आपली नव्याने ओळख पटली की त्या मार्गे टाकलेले प्रत्येक पाऊल प्रवास सुखकरच करते… कारण शेवटी आपली कधीही साथ न सोडणारी आपलीच ती एक “सखी” असते!!!
अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
“आठवणींचा खजिना”













