Loppe market…

खरेदी हा तसा खूप जणांचा अगदी आवडीचा विषय. विशेष करून काही महिलांसाठी तर हा अगदी जिव्हाळ्याचाच विषय म्हणावा लागेल. वयोगट कोणताही असो पण एखादी हवीहवीशी गोष्ट मनासारखी मिळाली तर आनंद हा प्रत्येकाला होतोच आणि जर काही आवडीच्या, जुन्या-नव्या अश्या नानाविध वस्तूंचा खजिना जर एकाच ठिकाणी सापडला तर काय सोन्याहून पिवळे नाही का? नॉर्वेमध्ये राहून अशाच प्रकारचे अनुभव “Loppe market” बघताना मी गेले दोन-तीन वर्ष घेत आहे.
दरवर्षी मार्च-एप्रिल महिना आला की हळूहळू “Loppe market” चे वारे वाहू लागतात. तसे बघायला गेले तर वर्षातून दोन वेळा हे मार्केट असते; पण जणू काही मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा हे पहिल्यांदा सुरू होते त्या वेळेस लोकांच्या उत्साहाला उधाण येते. कारण एक तर थंडी संपल्याची जाणीव होऊन मन अगदी आनंदित झालेले असते. त्यामुळे नव्या खेळाडूंचा जसा मैदानात शिरताना उत्साह दिसून येतो त्याच उत्साहाने अनेक लहान-मोठे या Loppe market साठी शाळेकडे धाव घेत असतील असेच मला वाटते. युरोप काय किंवा इतर बऱ्याच ठिकाणी Secondhand market ही कल्पना काही नवीन नाही. Loppe market हे देखील साधारणपणे त्याच वर्गात मोडणारे पण जरासे वेगळे असे म्हणावे लागेल.
वर्षातील दोन ऋतूंमध्ये म्हणजेच Spring आणि Autumn मध्ये Norway मधील निरनिराळ्या भागातील निरनिराळ्या शाळांमध्ये शनिवार आणि रविवार हे मार्केट भरवले जाते. त्या त्या भागात राहणारी माणसे त्यांच्या घरातील ज्या काही जुन्या-नव्या, त्यांना नको असलेल्या अशा सर्व गोष्टी एका ठराविक दिवशी शाळेमध्ये (फुकट) देऊन येतात. मग त्या त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक मिळून याचे सर्व नियोजन बघतात व स्टॉलवर उभे राहतात. अत्यंत किरकोळ किमतीमध्ये हे सर्व सामान विकले जाते. त्यातून जी काही किंमत येईल ती सर्व किंमत शाळेला निधी म्हणून दिली जाते. जो निधी शाळेतील काही उपक्रमांसाठी वापरतात. अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे इथे प्रत्येक जण काम करताना दिसतो. ह्या सगळ्याचा मुख्य हेतू हाच की एखाद्या गरजवंताला कमीतकमी किमतीत चांगल्या वस्तू वापरता याव्या. कारण कितीदातरी असे होते की, ठराविक एक गोष्ट आता आपल्याला नको आहे किंवा घरात ठेवायला आता जागा नाहीये. मग घरात साठवून अडगळ करण्यापेक्षा वेळच्या वेळी एखाद्या गरजू माणसाला वापरता आली तर काय वाईट आहे? बऱ्याचदा काही कोऱ्या करकरीत वस्तूंची पण त्यात भर पडलेली दिसते. या बाबतीत इथल्या लोकांचे मला नेहमीच खूप कौतुक वाटते. कारण कितीतरी सुंदर, आकर्षक, मोहवून टाकणाऱ्या वस्तू पाहिल्या की मला नेहमी प्रश्न पडतो, “आपल्या घरातील अशा वस्तू एका क्षणात कोण्या एका तिऱ्हाईत माणसाला देऊन टाकायच्या? हे इतक्या सहजतेने कसे जमत असेल इथल्या लोकांना?” हे असे करणे सगळ्यांनाच जमते असे नाही. मला इथे खास करून सांगावेसे वाटते की, वस्तू जरी जुन्या किंवा वापरलेल्या असल्या तरी बऱ्यापैकी सर्व वस्तू या चांगल्या स्थितीतील असतात. आणि विशेष म्हणजे कोणताही भेदभाव न करता किंवा कमीपणा न बाळगता सर्व स्तरातील लोकं इथे येऊन खरेदी करतात.
एकदा शाळेत शिरल्यावर अनेक उपयोगी, शोभेच्या वस्तू, फर्निचर, पुस्तके, खेळणी, सायकली अशा नानाविध गोष्टी मांडलेल्या दिसतात. शाळेमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनुसार याची मांडणी केलेली असते. शाळेच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरताना अचानकपणे कधीतरी अनपेक्षित एखादी वस्तू समोर यावी व आवडून जावी असे देखील होते. जर का एखादी वस्तू आवडली तर ती लगेच घेऊन टाकणेच शहाणपणाचे होते. कारण अनेकजण तिथे आलेले असल्यामुळे परत 10 मिनिटांनी येऊन बघितले तर ती वस्तू कदाचित कोणीतरी घेऊन देखील गेलेले असते. मध्येच एका कोपऱ्यातून कॉफीचा किंवा ताज्या ताज्या waffles चा सुवास दरवळत आपल्यापाशी येतो व आपली पावले आपसूकच तिकडे वळतात. (मी गरमागरम कॉफी नाही म्हणणार कारण इथे बऱ्यापैकी सगळ्यांना कोमट कॉफी पिण्याची सवय आहे.) मग मध्येच एक कप कॉफी किंवा त्याजोडीने असलेले चॉकलेट ब्राउनी, केकचा आस्वाद घेण्याचा मोह हा होतोच.
सकाळपासून तुरळक एकेक करून हळूहळू गर्दी दिसू लागते. मग खरेदीला देखील जास्ती मज्जा येते. खरी गंमत तर नंतर येते जेव्हा रविवारी त्या मार्केटची वेळ संपत आल्यावर एक खास सवलत सुरू होते. 50 NOK द्या आणि एक पिशवी खरेदी करा. मग त्या पिशवीमध्ये त्या त्या स्टॉल वरील ज्या काही उरलेल्या वस्तू आहेत त्यातील कोणतीही वस्तू तुम्ही त्या पिशवीमध्ये भरू शकता व पिशवी भरेपर्यंत वस्तू घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असते. मग तर काय बोलायलाच नको सर्वजण तिकडेच धाव घेतात.
इथे जसे वेगवेगळ्या प्रकारानुसार, वेगवेगळ्या आकारानुसार वस्तूंचे गट किंवा वर्गीकरण केले जाते अगदी तसेच आलेला प्रत्येक माणूस हा देखील एका ठराविक गटात मोडेल असेच मला वाटते. म्हणजे बघा हा, मनासारखी खरेदी करून परतताना अनेकांच्या हातात पिशव्या व चेहऱ्यावर समाधान असते तो एक गट!,
जरा अजून लवकर आलो असतो तर “ते” कपाट किंवा “ती” सायकल मला मिळाली असती या विचारात जरासा हिरमोड झालेले पण परत त्याच हट्टाने पुढच्या वेळेस जाण्याचा निश्चय करुन घरी परतणाऱ्यांचा दुसरा गट!,
काहीही खरेदी करायची नाहीये पण तरी नुसते बघण्यासाठी येणाऱ्या लोकांचा तिसरा गट!,
आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे फक्त “50 NOK” ची पिशवी सुरू होण्याच्या वेळेत शाळेत खरेदीसाठी येणारा हा चौथा गट!
असे काहीसे वर्गीकरण नक्कीच करता येईल. अशा सर्व लोकांसाठी Loppe म्हणजे एक पर्वणीच असते. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये पण परत हेच सर्व दृश्य दिसते, घटना त्याच असतात पण आजूबाजूचे वातावरण, निसर्ग हे मात्र बदललेले असते. Spring मधील नव्या कोवळ्या पालवीची जागा आता लाल, पिवळ्या, केशरी पानांनी घेतलेली असते. त्यावेळस येणाऱ्या “Summer” साठी आनंदी झालेले चेहरे आता नको वाटणाऱ्या पण तरीही येऊ घातलेल्या “Winter” मुळे थोडेसे धास्तावलेले वाटतात.
आत्तापर्यंत अशा अनेक शाळा या Loppe मार्केटच्या निमित्ताने मी पालथ्या घातल्या आहेत. दरवेळी काय खरेदी करायचीच असते असे नाही पण एकंदरीत तिथले वातावरण, तिथला “माहोल”, गर्दी अनुभवायला व फिरायला मला खूप आवडते. खूप उत्साह, आनंद, गमती-जमतीने भरलेल्या या Loppe मार्केटची मज्जा दरवेळेस काही औरच असते हे मात्र नक्की!!!

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
13 मार्च 2025.

13

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links