Alpine यात्रा

आज ज्या देशाचे वर्णन करत आहे तो देश बघण्याची माझी दुसरी वेळ! मी जेव्हा पहिल्यांदा हा देश बघितला तेव्हा या देशाचे वर्णन करताना लिहले होते की “त्यावेळी तिथून निघताना मनामध्ये एक हुरहूर होती. कारण 3-4 दिवस फिरून देखील समाधान काही झाले नव्हते.” त्यामुळेच मनामध्ये एक इच्छा होती की परत एकदा तरी संधी मिळावी आणि परत हे सर्व जवळून बघायला मिळावे. तशी संधी यावेळेस मिळाली आणि आम्ही परत एकदा “Switzerland” ला गेलो.

Switzerland म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे बर्फाच्छादित आल्प्सच्या पर्वतरांगा, हिरवीगार कुरणे, त्या कुरणांवर चरणाऱ्या गाई, त्यांच्या गळ्यातील घंटेचा घुमणारा आवाज! विविधतेने नटलेल्या व अनेक “अर्था”ने समृद्ध अश्या या देशात अनेकांच्या अनेक आठवणी मात्र कायम जोडल्या गेल्या आहेत. मला तर वाटते की अगदी थोडक्यात म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर, “अनेकांना स्वप्नपूर्ती चा आनंद देण्यासाठी कायम सज्ज असलेला Switzerland!!!” असेच याचे वर्णन करावे लागेल.
या वेळेस मुद्दाम आम्ही अशा काही जागा निवडल्या जेणेकरून नेहमीपेक्षा वेगळ्या Switzerland चा अनुभव घेता येईल. आम्ही Oslo हून निघून Geneva मध्ये पोहोचलो. पोहचायला रात्र झाली. पहिल्या दिवशी Geneva पासून अगदी वीस मिनिटांवर असलेल्या France मधील Annemasse या शहरात आम्ही मुक्काम केला. Switzerland बरोबरच France चे देखील धावते दर्शन या प्रवासात होणार होते त्यामुळे मी आनंदात होते. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे आजूबाजूचे तसे काही नीट दिसले नाही. सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. शक्य तितक्या लवकर आवरून आम्ही Lauterbrunnen कडे कूच केली. मध्ये मध्ये जिथे छान जागा दिसतील तिथे थांबत थांबत आरामात आमचा प्रवास चालू झाला. काही वेळानी Trient नावाचे लहान गाव दिसले. तिथे एकेठिकाणी थांबलो. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावातील घरे, तेथील Municipal Administration Office ची इमारत सर्वच खूप छान आणि आकर्षक होते. एक उभी दगडी इमारत, त्यातील प्रत्येक मजल्यावर असणाऱ्या दोन खिडक्या आणि प्रत्येक खिडकीवरती सुंदर गुलाबी रंगांच्या फुलांची केलेली आकर्षक सजावट, त्याच्या मध्यभागी लावलेले Switzerland चे झेंडे हे दृश्य बघून अगदी उत्साही वाटत होते.

तिथून निघून नंतर आम्ही Lauterbrunnen ला पोहोचलो. तिथे पार्किंग मध्ये गाडी लावतानाच तेथील धबधबा दिसू लागला. Alps च्या कुशीत वसलेल्या अनेक ठिकाणांपैकी हे अजून एक ठिकाण. 300 मीटर उंचीवरून वाहणारा हा Staubbach धबधबा व त्या जवळील Trümmelbach धबधबा हे येथील प्रसिद्ध आहेत. तसे बघायला गेले तर दोन्हीही धबधबेच पण दोघांची रुपे मात्र वेगवेगळी! एकीकडे Staubbach धबधबा बघताना, पांढऱ्या खडकाळ डोंगरावरून वाहणाऱ्या या धबधब्याचे पाणी खाली येता येताच हवेत विरून जावे असा भास होत होता. त्या जवळून वाहणारी Staubbach नदी देखील अगदी त्याच तोडीचीच म्हणावी लागेल. तर दुसरीकडे डोंगरामध्ये दिसणारा Trümmelbach धबधबा निसर्गाचे अंतरंग दर्शवत होता. वेगवेगळ्या उंचीवरील हिमनद्यांचे धबधबे इथे बघायला मिळतात. हे ठिकाण Europe मधील डोंगराच्या आतील Glacier Waterfall बघण्यासाठी एकमेव आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे भुयारी मार्गातील Lift ने जाऊन किंवा पायऱ्यांवरून वर चढून सर्व धबधबे बघण्याचा आनंद घेता येतो. डोंगराच्या कड्या-कपारी मधून निघणारी वाट, त्या वाटेवरून चालत असताना समोर येणारे अनेक लहान मोठे धबधबे, पाण्याचा अतिशय वेगवान प्रवाह, सर्वत्र भरून राहिलेल्या पाण्याचा आवाज हे अनुभवताना अगदी वेगळेच वाटत होते. कित्येक ठिकाणी अक्षरशः पाण्याचे फवारे देखील अंगावर उडत होते व गार वाटत होते. ही दोन्ही ठिकाणे नक्की पहावी अशीच आहेत, एकापेक्षा एक सरस!!! त्यामुळे नक्की कोणते ठिकाण जास्त छान वाटले हे सांगणे जरा कठीणच जाईल. इथे फिरताना तर मज्जा आलीच पण त्यानंतरच्या कॉफीने एक वेगळीच रंगत आणली. तिथेच मागे जुना गोठा होता बहुतेक त्यामुळे तिथल्या स्थानिक दुधाची उत्तम चव त्या कॉफी मध्ये उतरली होती. एकतर पावसाळी हवा आणि हातात मस्त वाफाळलेली गरमागरम कॉफी हे समीकरणच इतके मस्त जमले होते. त्यामुळे कॉफी पिताना पूर्ण दिवसाची दमणूक तर कुठल्या कुठे पळून गेली. अश्याप्रकारे कॉफी चा छान आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. तिथून निघाल्यावर त्या दिवशीचा मुक्काम आम्ही Interlaken ला केला.


सगळीकडे भरून आले होते. त्या दिवशी संध्याकाळपासून पाऊस सुरू झालाच. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील खूप पाऊस होता. आमच्या खोलीतून बघितले तर समोरच्या पूर्ण डोंगरावरती धुके पसरताना दिसत होते. थोडे थोडे ढग हळूहळू गोळा होत अगदी थोड्या वेळातच समोरचा पूर्ण डोंगर ढगांनी झाकून गेला. त्यानंतर काही वेळानी अचानक ढगांच्या आडून सूर्य देवाचे दर्शन होऊ लागले. आता तोच रस्ता सोनेरी किरणांनी न्हाउन निघाला. तो नजारा खूपच छान होता. आवरून झाल्यावर आम्ही Grindelwald First कडे निघालो. निसर्गसौंदर्य ही तर तेथील महत्त्वाची गोष्ट आहेच पण त्याचबरोबर निरनिराळ्या activity म्हणजेच Zip Line, Mountain Cart, Cliff Walk, Paragliding करण्यासाठी देखील प्रसिद्ध अशी ही जागा आहे. तेथील Base point वरून Gondola मधून एका डोंगरावर गेलो. आम्ही पोहचलो तेव्हा धुके आणि पावसामुळे काही activity तात्पुरत्या बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला काही वेळ वाट पाहावी लागली. जसजसे ढग पुढे सरकत होते तसे सर्व सुरळीत चालू झाले. सुरवातीला आम्ही First Glider करण्यासाठी रांगेमध्ये थांबलो. गर्दी खूप होती. त्यामुळे जवळजवळ दोन तास आम्हाला रांगेत उभे राहावे लागले. पण हे दोन तास देखील तिथल्या सर्व वातावरणामुळे सुखकर गेले. कारण जणू काही निसर्गाचा एक “सोहळाच” त्या दिवशी चालू होता. काही वेळ धुक्यात सर्व परिसर हरवून जाई, त्यानंतर थोडे ऊन येई आणि सर्व ढग एकदम गायब होऊन समोरच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागत. असा हा “सोहळा” बघता बघता आमचा नंबर आला. First Glider करण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे मनात जरा धाकधूक वाटत होती. “Fly Like an Eagle” असे याचे वर्णन केले आहे. अगदी तसाच अनुभव त्या 15 मिनिटात मिळाला. तेथील सर्व परिसर एका वेगळ्या नजरेतून अनुभवायला मिळाला. एका मोठ्या गरुडाच्या आकाराच्या पाळण्यात आपल्या पाठीला हुक लावून आडवे झोपवतात (खरे तर लटकवतात हाच शब्द योग्य आहे). एकदा का आपण व्यवस्थित लटकले गेलो आहे याची खात्री पटल्यावर पाळणा सुरू करतात. सुरवातीला एकदा पाळणा उलट्या दिशेला नेतात. तिथे असलेल्या एका डोंगरावर जाऊन पहिल्यापेक्षा जरा जास्त वेगाने परत आणतात. परत येताना अक्षरशः पक्षी जसे जमिनीवर उतरतात तसेच आपण अगदी अलगद येऊन उतरतो. हे करताना खूपच मज्जा आली. त्यानंतर First Cliff Walk केला. इथे डोंगराला लागून बांधलेल्या एका लांबच्या लांब पुलावरून चालत जाताना परत सगळ्या निसर्गाचे दर्शन घडत होते. जवळ जवळ अर्ध्यापेक्षा जास्त दिवस इथे घालवल्यावर संध्याकाळी Iseltwald ला गेलो.


Brienz Lake च्या दक्षिणेकडे वसलेले हे लहान गाव Interlaken पासून 12-14 किलोमीटरवर वसलेले आहे. पूर्वी तलावातील मासेमारी, शेती, पशुपालन यावर स्थानिक लोक अवलंबून असत पण आता त्याचबरोबर पर्यटन हे देखील इथले महत्त्वाचे उत्पादनाचे स्त्रोत मानले जाते. त्यादिवशी संध्याकाळी तलावाच्या काठावर आरामात बसून संपूर्ण परिसर बघताना मस्त वाटत होते. शांत, आरामदायी वातावरण सर्वत्र पसरले होते. कोणी कुटुंबासमावेत, तर कोणी एकेकटे फिरताना दिसत होते. अनेक Backpackers, Bikers या गावात राहण्यासाठी उतरलेले दिसत होते. “हौसेला व आवडीला मोल नाही” असे म्हणतात ना ते किती खरे आहे याची अगदी प्रकर्षाने जाणीव झाली. इथल्या प्रत्येक घराघरांमधली सजावट व रंगसंगती ही काही वेगळीच होती. एका घरामध्ये लाकडी खेळणी, लाकडी पक्षी अशा सर्व लाकडी वस्तूंची सजावट केली होती. तर दुसरीकडे विविध आकारातील हस्तशिल्पे, मुखवटे यांनी सजवलेले घर दिसत होते. काही घरांमध्ये अगदी लहान आकारापासून ते सगळ्यात मोठ्या आकारापर्यंत ओळीने टांगलेल्या घंटा दिसत होत्या. सगळ्यात मोठी घंटा तर हत्तीच्याच गळ्यात शोभून दिसेल इतकी मोठी होती. त्यातील प्रत्येक घंटेमध्ये देखील फरक होता. प्रत्यकाचे नक्षीकाम वेगळे, रंगसंगती वेगळी. त्यातील काही घंटा मंदिरामध्ये असतात तशा होत्या तर काही गायींच्या गळ्यामधील वाटत होत्या. काही पारंपारिक तर काही नावीन्यपूर्ण! इतक्या छान, शांत गावातून निघावेसे वाटत नव्हते. पण पुढचे ठिकाणं तितकेच महत्त्वाचे होते ते म्हणजे Zermatt!


Zermatt मध्ये पोहोचलो तर तिथे “किलबिल किलबिल पक्षी बोलती…” या कवितेच्या ओळीच आम्ही जगत आहोत की काय असे वाटत होते. पिरॅमिडच्या आकारातील प्रसिद्ध असलेल्या Matterhorn शिखराच्या पायथ्याशी असलेले Zermatt हे गाव. याची अजून एक ओळख म्हणजे, Switzerland चे प्रसिध्द चॉकलेट “Toblerone” त्याच्या packing वर जो डोंगर आहे तोच हा Matterhorn. त्याशिवाय असे देखील म्हणतात की पिरॅमिडच्या आकारामध्ये हे चॉकलेट बनवले ते देखील Matterhorn पासून प्रेरणा घेऊनच. म्हणजे Matterhorn आणि Toblerone यांचे खूप जुने नाते आहे असेच म्हणावे लागेल. तसे बघितले तर Zermatt हे संपूर्ण डोंगरांनी वेढलेले आहे. तिथल्या प्रत्येक दगडाची, प्रत्येक डोंगराची, प्रत्येक नदीची एवढेच नाही तर प्रत्येक घराची देखील काहीतरी एक गोष्ट आहे असेच सतत वाटत होते. असे म्हणतात की माणूस जितका वृध्द होतो तितका अनुभवी आणि परिपूर्ण होतो. अगदी तसेच तेथील काही जुनी घरेदेखील वर्षानुवर्षे ऊन, वारा, बर्फ यांच्या झळा सोसून आणि अनेक वर्षांचा इतिहास जगून अनुभवी आणि परिपूर्ण झाली असतील नाही? असा विचार माझ्या मनात आला.


आता Swiss मध्ये आल्यावर Swiss Fondue खाल्ल्याशिवाय प्रवास अपूर्णच म्हणावा लागेल. खूप फिरून खूप भूक लागली होती. गरमागरम, वाफाळलेल्या स्थानिक पद्धतीने बनवलेल्या चीझ मध्ये ब्रेडचे तुकडे घोळवून खाताना खूपच छान वाटत होते. Terracotta किंवा Cast iron च्या एका पॉट मध्ये Swiss Cheese घालतात. त्या पॉट खाली बर्नर असतो. ज्यामुळे चीझ कायम वितळलेले आणि गरम राहते. त्या बरोबर बटाटे, ब्रेड देतात. हे चीझ मध्ये घोळवून खायचे असते. Cheese Fondue सारखेच Chocolate Fondue, Meat Fondue असे सुद्धा प्रकार असतात असे देखील मी वाचले. पोटभर जेवण झाल्यानंतर परत बाजारपेठेत फेरफटका मारून आम्ही निघालो. आमची ट्रीप आता संपत आली होती. आता फक्त एक दिवस बाकी होता.
France मधील Annacy हे आमच्या प्रवासातील बघण्याचे शेवटचे ठिकाण होते. France ची थोडक्यात एक झलक बघायची असेल तर अश्या लहान लहान गावांना भेट द्यायला पाहिजे. कारण तेथील रस्ते, रस्त्याला लागून असलेले लहान लहान बोळ, बोळातून गेले की लगेच लागणारा दुसरा रस्ता हे दृश्य सतत दिसत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने, वेगवेगळे स्टॉल्स अशी सर्व रेलचेल त्या गावात होती. असे सर्व बघून ट्रीप ची सांगता झाली.

या प्रवासात खूप नवीन नवीन, काही अनपेक्षित तरीदेखील छान अनुभव आले. Oeschinensee lake ला जाताना अनपेक्षितपणे RO-RO रेल्वेमधून आमचा काही वेळ प्रवास घडला. या आधी RO-RO बोटीतून बऱ्याचदा गेले होते पण RO-RO रेल्वे मधून जायची ही पहिलीच वेळ. बरं,त्या lake ला पोहचायला उशीर झाला होता आणि Cable Car नी वर जाऊन काही अंतर चालून lake होता. Cable Car ची वेळ देखील संपत आली होती. तरीदेखील आम्ही अट्टाहासाने lake बघायला गेलोच. धावतपळत का होईना एकदाचा Oeschinensee lake बघून वेळेत परत आलो. France मध्ये एका गावातून दुसऱ्या गावात जाताना तसेच Switzerland ची सीमा ओलांडून France मध्ये शिरताना तेथील घरे, रस्ते, माणसे यामध्ये होणारे लहानसहान बदल दिसले. अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अनेक अनुभवांनी परिपूर्ण असा आमचा प्रवास संपुष्टात आला. मी तर म्हणेन खऱ्या अर्थी Switzerland या देशाचे दर्शन झाले. खऱ्या अर्थी Switzerland जगता आले असे म्हटले तरी त्यात काही गैर नाही.

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
29.8.2024

स्वित्झर्लंड -जमिनीवरील स्वर्ग (भाग एक) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

स्वित्झर्लंड – खर्याअर्थी श्रीमंत देश(भाग दोन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

2

One response to “Alpine यात्रा”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links