स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3)

स्वित्झर्लंड -जमिनीवरील स्वर्ग (भाग एक) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

स्वित्झर्लंड – खर्याअर्थी श्रीमंत देश(भाग दोन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली आकर्षक घरे, घरांमध्ये केलेली फुलांची सजावट, घराच्या मागे पुढे असलेल्या बागा आणि या मधून जाणारी वाट खूप शोभून दिसत होती. असा प्रवास करत आम्ही Mount Titlis ला पोहोचलो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एका केबल कार मध्ये बसलो आणि थोडे वर गेलो. तिथे एक तलाव होता. त्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला जर चालत वरपर्यंत यायच असेल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता; पण आमच्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे आम्ही तिथे न उतरता दुसऱ्या केबल कार मधून आणखीन वरच्या एका ठिकाणा पर्यंत गेलो. परत काही अंतर वरती गेल्यावर दुसऱ्या केबल कार मधून उतरलो आणि एका मोठ्या केबल कार – Rotair मध्ये चढलो. आता या केबल कार मधून आम्हाला सर्वात वर Mount Titlis पर्यंत जाता येणार होते आणि याची मजा म्हणजे ही केबल कार 360 डिग्री फिरत होती त्याच्यामुळे आम्हाला सर्व बाजूंनी नीट बघता आले. खाली निळेशार पाणी असलेले स्वच्छ सुंदर तलाव, लांबवर दिसत असलेली alpes पर्वत रांग, शेतात चरणाऱ्या गायी आणि विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात असलेल्या घंटेचा (famous Cow bells) आवाज या पूर्ण शांततेत खूप छान वाटत होता. असे बघत आम्ही Mount Titlis ला सर्वात वर पोहोचलो.

सगळीकडे बर्फ होता त्या बर्फातून थोडे अंतर चालल्यानंतर एका मोठ्या पाळण्यामध्ये बसून आम्ही निघालो. आजूबाजूचा सर्व परिसर त्या पाळण्यात बसून बघताना खूप मस्त वाटत होते. आम्ही तिथे थोडे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि नंतर मग एका मोठ्या पुलावरून चालत एका Glacier Cave म्हणजेच बर्फाच्या गुहेमध्ये गेलो. आत गेल्यावरती आकर्षक पद्धतीने दिवे लावलेले होते. वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स बर्फाच्या एका पेटीत ठेवले होते. एक बर्फाची खुर्ची सुद्धा होती आणि त्याच्यावरती बसून फोटो काढता येत होते. त्या खुर्चीवरती बसताना प्रत्येक जण कसरत करत होते कारण बर्फ असल्यामुळे कोणाचे पाय घसरत होते, कोणी पडत होते पण प्रत्येक जण एकमेकाची मदत करत होते आणि फोटो मात्र काढून घेत होते. अगदी सर्वजण आपापले वय विसरून मज्जा करत होते. नंतर आम्ही परत वरती मूळ इमारतीमध्ये गेलो.

तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष होते. एके ठिकाणी तिथला पारंपारिक पोशाख घालून फोटो काढता येत होते. एके ठिकाणी selfie points होते. वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करण्यासाठी कक्ष होते. हे सर्व बघून आम्ही परत खाली आलो. भूक बरीच लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये शिरलो तर अनपेक्षित पणे मराठी माणसाच्या हॉटेल मध्ये मिळालेल्या वडापाव आणि पावभाजी मुळे या सर्व प्रवासाची मजा अजूनच वाढली. खाऊन झाल्यावर आम्ही परत बस मधून परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत इतके सुंदर दृश्य होते की काय बघू आणि काय नाही असे झाले. संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही परत Zurich ला आलो. आता मनात चलबिचल चालू झाली होती कारण आता आमच्याकडे एकच दिवस होता आणि तशा अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्या होत्या.

शेवटच्या दिवशी आम्ही सकाळी आवरून Rhine falls बघायला गेलो. रेल्वेमधून उतरलो की लगेचच हे ठिकाण आहे. पायऱ्या उतरून खाली आलो तर तिथे सुंदर धबधबा आम्हाला दिसला. तिथे boating करण्यासाठी पण बरेच पर्याय होते. बोटीने आम्ही आधी पलीकडच्या किनाऱ्यावर गेलो. तिथला परिसर आणि दुकाने वगैरे बघितली. परत बोटीतून फिरू लागलो. नंतर आमची बोट धबधब्याच्या इतकी जवळ नेली की धबधब्यातले पाणी आमच्या अंगावरती उडत होते आणि आम्हाला अगदी ताजेतवाने वाटत होते. हे बघून झाल्यावर आम्ही तिथून जवळच असलेली बाजारपेठ बघितली आणि परत Zurich ला आलो. रात्री परत एकदा शहर फिरण्यासाठी आम्ही निघालो. तलाव(Zurich lake) आणि तलावाकाठच्या इमारती हे सर्व रात्रीच्या वेळी अगदी वेगळेच दिसत होते. एके ठिकाणी आम्हाला दोघेजण busking करताना दिसले, ते इतके खूप सुंदर Violin आणि Accordian वाजवत होते की प्रत्येकाची पाऊले तिथे वळत होती. आम्ही तिथल्या ऐतिहासिक इमारती, बाजारपेठ, दुकाने याचा आम्ही आनंद घेत होतो. Switzerland हे इतके सुंदर ठिकाण बघितल्यावर एक प्रकारचा आनंद तर झाला होताच पण मनात कुठेतरी थोडी हुरहूर पण होती कारण इथला निसर्ग, इथले सौंदर्य इथेच सोडून जावे लागणार होते आणि कितीही बघितल तरी समाधान मात्र होत नव्हते.

समाप्त.

6.9.2022

Alpine यात्रा – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

2 responses to “स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3)”

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links