“Switzerland” या नावातच खूप गोष्टी समावल्या आहेत असे मला वाटते. म्हणजे त्यामध्ये सुंदरता, प्रशस्तपणा, वेगळेपणा या गोष्टी आहेत. त्यामुळे Norway मधे आल्यावर मी या संधीसाठी आणि तिथला वेगळेपणा अनुभवण्यासाठी उत्सुक होते. ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो अखेर तो दिवस आला. आम्ही रेल्वेमधून विमानतळावर गेलो. ही रेल्वे पण इतर रेल्वे पेक्षा थोडी वेगळी होती आणि थोडी मोठी होती. खास करून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या बॅगा ठेवायला वेगळी जागा होती. त्यामध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ असलेले एक Vending machine होते. विमानतळ आणि रेल्वे स्टेशन हे दोन्ही एकमेकांना जोडले आहे. त्यामुळे रेल्वेमधून उतरले की लगेच एक जिना चढल्यावर आपण विमानतळावर पोहोचतो. विमानाने अडीच तासाचा प्रवास करून आम्ही Zurich ला पोहोचलो. Zurich विमानतळ खूप मोठे सुंदर आहे.
नंतर आम्ही संध्याकाळी Zurich जवळच्या Baden या ठिकाणी गेलो. ते Zurich पासून रेल्वे ने साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटांवर आहे. Limmat नदीकिनारी वसलेले एक सुंदर लहान गाव आहे. येथे एक जुना लाकडी पूल देखील आहे.
Baden म्हणजे आंघोळ करणे (To bath)! यामागे एक दंतकथा आहे ती अशी, एक गरीब जोडपं काही हजार वर्षांपूर्वी लहान झोपडीत एका नदीकिनारी रहात होते. त्या जोडप्या मधील बाईला कळले की ती आजारी आहे व लवकरच मरणार आहे. तिच्या नवऱ्याला सांगण्यासाठी तिने एक कोमेजलेले गुलाबाचे फुल उचलले आणि सांगितले की मी या फुलाप्रमाणे आहे, जे लवकरच कोमेजून जाईल व नष्ट होईल. दुःखाने व्याकुळ झालेल्या नवऱ्याने ते फुल रागाने त्या नदीमधील पाण्यामध्ये फेकून दिले. पाहता पाहता ते कोमजलेले फुल परत टवटवीत झाले आणि मग त्याच्या लक्षात आले की या नदीच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. म्हणून त्याने त्याच्या बायकोला रोज त्या पाण्याने अंघोळ घातली व ती बाई परत एकदा तरुण व निरोगी झाली. ते ठिकाण म्हणजेच आत्ताचे Baden शहर आणि ती नदी म्हणजे Limmat जिथे अठरा गरम पाण्याचे झरे आढळून येतात. रोमन काळापासून इथे सर्व प्रांतातून लोक येत असत आणि निरोगी होऊन जात असत.
सतराव्या शतकात Baden मधे श्रीमंत व्यापारी लोकांचे private bath होते. तेथे लोक आराम करायला आणि निरोगी व्हायला येत असत आणि तिथूनच “Badenfahrt” ची सुरुवात झाली. हा आता Switzerland मधील एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव दर दहा वर्षांनी साजरा केला जातो. पुढील वर्षी या उत्सवाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तो विशेष साजरा केला जाईल. (कदाचित त्यावेळेस मला तो उत्सव बघायची संधी मिळेल आणि मी त्याविषयी अधिक लिहू शकेन.)
क्रमशः ….
स्वित्झर्लंड – खर्याअर्थी श्रीमंत देश(भाग दोन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
स्वित्झर्लंड- Mount Titlis आणि Zurich (भाग 3) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)
2 responses to “स्वित्झर्लंड -जमिनीवरील स्वर्ग (भाग एक)”
[…] […]
[…] […]