South Easten Europe मधील व Ionin Sea, Aegean Sea, Mediterranean Sea यांनी वेढलेला तसेच अनेक लहान मोठ्या सुंदर बेटांनी नटलेला असा हा एक देश. या देशाचे एकच वैशिष्ट्य सांगणे जरा अवघडच आहे कारण Western Civilization, Democracy, Western philosophy, Art, Theatre, अनेक Mathematical Principals व सगळ्यात महत्वाचे Olympic Games या सर्वांचे जन्मस्थान अशी ओळख असलेला हा देश. समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि खाद्य संस्कृतीमध्ये देखील वेगळेपणा दाखवणारा. अर्थात आता एवढे वर्णन वाचून हा कोणता देश ते सर्वांना समजले असेलच. आज मी लिहीत आहे “Greece” बद्दल.
कधी कधी काय होते आपण ठरवतो एक पण आपल्या नशीबात असते वेगळेच ठिकाण. तसेच आमचे झाले आणि ग्रीस ला जायचे ठरले. बरं आधीच या देशाबद्दल एवढे ऐकले होते की कधी कधी आम्हीच गोंधळून जात की ठराविक 5,6 दिवसात नक्की काय आणि कधी बघायचे? असे करत करतच प्रवासाचा दिवस उजाडला.
घरातून पहाटे चार वाजता निघालो. पहिले विमान होते Oslo ते Zurich. विमान Zurich मध्ये शिरल्या शिरल्या खाली हिरवी हिरवी शेते दिसू लागली. अगदी फुट-पट्टीने आखल्या सारख्या सरळ आडव्या रेषा असलेली शेती बघताना माउंट टिटलीस वरून खाली बघितलेल्या निसर्गाचीच आठवण मला झाली. विमान प्रवास करत असताना प्रत्येक देशाचे वेगळेपण बघायला मला खूप आवडते. कुठे हिरवळ दाट झाडी असते, कुठे पर्वतरांगांनी वेढलेले छोटेसे गाव असते तर कुठे काठोकाठ पाण्याने भरलेले तलाव व आजूबाजूला असलेली देखणी घरे असतात.
आता पहिला टप्पा तर झाला होता. दुसरा टप्पा होता Zurich ते Athens. जसे आम्ही Athens मध्ये पोहोचलो तसे विमानातून उतरल्या उतरल्या प्रचंड उकाडा आणि गर्दी हे प्रकर्षाने जाणवली. शून्य डिग्री पासून ते पंचवीस डिग्री हा फरक खूप जाणवला. Oslo मध्ये राहून या दोन्हीची सवयच मोडल्यासारखी झाली आहे. पण मुळातच उन्हातून फिरता यावे यासाठी इकडे आल्यामुळे आम्ही आता त्याचा आनंद घेऊ लागलो. तिसरा टप्पा होता Athens ते Santorini. हा विमान प्रवास अगदी छोटा म्हणजे 30 ते 35 मिनिटांचाच होता. Santorini मध्ये पोहोचल्यावर तिथल्या एका बस ने हॉटेलपर्यंत जायचे होते. विमानतळाच्या बाहेरच बस स्टॉप होता. आमचे हॉटेल “फिरा” या भागात होते. बस मधून जाताना मुख्य गावाबाहेरील भाग आधी दिसू लागला. उजाड माळरान, मध्ये मध्ये दिसणारी घरे याचे सर्वप्रथम दर्शन झाले. हळूहळू बस वळणे वळणे घेत जात होती तसे खास करून “ग्रीक शैलीतील” पांढऱ्याशुभ्र भिंती असलेल्या इमारती दिसू लागल्या. काही वेळानंतर बस स्टॉपवर थांबली. तेथून एका चढया रस्त्यावरून चालत पुढचा रस्ता होता. वाटेत मोठी बाजारपेठ लागली. दोन्ही बाजूला असलेली अनेक छोटी-मोठी दुकाने जाता जाता मी पटपट बघू लागले. सर्वच दुकाने खूप सुंदर आणि आकर्षक पद्धतीची होती. साधारणपणे दहा-पंधरा मिनिटं चढावरून चालत जाताना आता मात्र सलग 15 तास केलेल्या प्रवासाची दमणूक जाणवायला लागली होती. पण जेव्हा आम्ही आमच्या रूम पर्यंत पोहोचलो तेव्हा तिथला नजराणा पाहून दमणूक कुठल्या कुठे पळाली हे मला माझेच कळले नाही. आमची रूम देखील नेहमीसारखे हॉटेल नव्हते तर वेगवेगळ्या वर खाली बांधलेल्या अपार्टमेंट अशी रचना असलेली हे एक इमारत होती. खोलीतून बाहेर पडल्यावर छोटीशी बाल्कनी होती. तेथे बसायला एक छोटा सोफा, टेबल खुर्ची ही मांडली होती शेजारी छोटासा Swimming Pool व समोर सोबतीला अथांग निळाशार समुद्र पसरला होता. निरभ्र आकाशामुळे तर अजूनच मज्जा येत होती. समुद्रात काही प्रवासी जहाजे थांबलेली दिसत होती. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत अंधार झाला होता त्यामुळे दिव्यांच्या लखलखाटाने समुद्राकाठचा परिसर उजळून निघाला होता. बाल्कनी मध्ये उभे राहून दोन्ही आजूबाजूला पाहिल्यावर आमच्यासारखे अनेक जण तेथे उभे राहून सुंदर नजराणा बघण्याचा आनंद घेताना मला दिसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. आधी मला वाटले ब्रेकफास्ट नेहमीप्रमाणेच असेल म्हणजे अनेक पदार्थ मांडलेले असतील, buffet असेल. पण तसे न होता आम्हाला आधी एका टेबलावर बसवले. चहा की कॉफी असे विचारले. काही वेळाने ज्यूस चा ग्लास देखील समोर आणून ठेवला व त्यानंतर एका मोठ्या थाळीवजा काचेच्या प्लेटमध्ये मांडलेले अनेक पदार्थ समोर आणून ठेवले. हे बघून तर आम्ही थक्कच झालो व विचारात देखील पडलो की हे सर्व संपायचे कसे? या प्लेटमध्ये अगदी ब्रेड बटर जॅम पासून ब्रेडस्टिक, दोन-तीन प्रकारची फळे, केक असे अजून देखील बरेच पदार्थ दिसत होते. आता ब्रेकफास्ट नंतर खऱ्या अर्थी फिरायची वेळ झाली. इथे Rent ने गाडी, स्कूटर असे सर्व पर्याय फिरण्यासाठी उपलब्ध होतात. आम्ही स्कूटरचा पर्याय निवडला. स्कूटर घेण्यासाठी भारतीय लायसन्स देखील चालतो असे आम्ही ऐकले होते पण काही ठिकाणी इंटरनॅशनल लायसन्स लागतो. मला इथे खास करून नमूद करावेसे वाटते की जर तुम्ही भारतातून इथे फिरायला म्हणून येणार असाल तर आरटीओ मध्ये जाऊन आधीच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढणे करणे हेच सोयीचे पडते किंवा तसे नाही केले तर इकडे येऊन एका लिंक वरती जाऊन ही प्रोसेस करावी लागते. पण त्यासाठी दोन-तीन तास लागू शकतात आणि अगदीच आपल्याला तात्काळ हवा असेल तर थोडे जास्ती पैसे घालून 15 मिनिटात करता येते पण त्यापेक्षा भारतातून येतानाच हे करून आलं तर ते अगदीच सोयीचे पडते.
सर्वप्रथम आम्ही Fira ते Akrotiri असा टप्पा निवडला. एका बाजूला असलेल्या समुद्रकिनारा कायम आमच्या सोबत होताच. आम्ही पाहिलेली काही ठिकाणे –
1. Pyrgos Kallistic- सगळ्यात आधी या ठिकाणी गेलो. पायऱ्यांवरून वर जाताना अनेक सुंदर दुकाने दिसली. पांढऱ्या, पिवळ्या रंगवलेल्या भिंतीवर अनेक ठिकाणी wall paintings, Wall hangings लटकवलेली दिसत होती. टेबलावर सुरेख मातीची भांडी, शोभेच्या वस्तू निरनिराळ्या रंगात उठून दिसत होती. इथल्या प्रत्येक घराचे, दुकानाचे दार देखील तितकेच सुंदर दिसत होते. पांढरी शुभ्र भिंत, मधोमध असलेले रंगीत दार, बाजूला असलेली छोटीशी खिडकी आणि कडेने उगवलेली बोगनवेल असे दृश्य तर कितीतरी वेळा बघायला मिळाले. Fira पासून साधारणपणे सात किलोमीटर अंतरावर असलेले हे छोटेसे गाव! एका ठराविक पद्धतीने वरच्या उंचीवर वसवले आहे तेथून सर्व बाजूंनी Santorini चा नजराणा बघण्याचा आनंद घेता येतो. हे गाव सर्वात मोठे व संरक्षित केलेले गाव आहे. आणखीन चालत अगदी वरच्या टप्प्यावर पोहोचलो तिथे एक पांढऱ्या भिंतीवर निळ्या रंगाचे डोम असलेले चर्च दिसले. इथले वैशिष्ट्य हेच की सर्व चर्चचे डोम निळ्या रंगाचे असते आणि पुढे एकावर एक असलेले मनोरे व त्यामध्ये घंटा बांधलेल्या असतात. चर्चचे डोम व आकाश यांचे रंग एकमेकात अगदी सुंदरतेने मिसळलेले दिसतात.
2. Heart of Santorini- Fira जवळच असलेले Agios Nikolas यांचे चर्च आहे. हे चर्च त्यापुढील असलेल्या सुंदर नजराण्यासाठी प्रसिद्ध आहे. राखाडी, पांढरा, काळा असे रंग असणाऱ्या दगडांनी व डोंगरांनी वेढलेले हे एक पठार आहे. एका बाजूला बघितल्यावरती Fira, Oia हे डोंगरावरती दिसणारे भाग व दुसऱ्या बाजूला अगदी शेवटच्या टोकाला असलेले light House व त्या आजूबाजूचा परिसर हे अगदी प्रकर्षाने दिसून येत होते. समुद्रातील प्रवासी जहाजांमुळे पाण्यावर उठलेले तरंग बघतच बसावेसे वाटत होते. त्याच पठारावरून थोडे उतरून खाली गेले की चर्च दिसते. इथेच एक गुहा देखील आहे आणि त्या गुहेमधून बघितले की बदामाच्या आकारात असलेले दगड आणि त्या समोर असलेला निसर्ग दृष्टीस पडतो त्यामुळे ह्याला “Heart of Santorini” असे म्हणतात.
3. Akotiri- पूर्वी प्रामुख्याने मासेमारी व शेती यासाठी नावाजलेले एक हे छोटेसे गाव होते. इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वी तांब्याच्या व्यापाराच्या सुरुवातीने बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ व उद्योगाची भरभराट झाली. पुढील पाचशे वर्ष या भरभराटीची नोंद आहे. त्या काळातील मातीची भांडी, पक्के रस्ते, उत्कृष्ट हस्तकला यांचे पुरावे सापडलेले आहेत. इसवी सन पूर्व 16 व्या शतकात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात हे संपूर्ण गाव गाडले गेले. पूर्वीपासून अनेक टप्प्यांमध्ये चालत आलेले उत्खनन चालत आलेले आहे. या संग्रहालयात निरनिराळ्या प्रकारातील, आकारातील हस्तकला, मातीची, तांब्याची भांडी, त्या काळातील घरे व त्यांची रचना याबद्दल आपल्याला जाणून घेता येते. येथे अनेक लहान मोठे मातीचे हांडे दिसले. त्यावरील नक्षीकाम, रंगसंगती हे अजूनही दिसून येते. अनेक भांड्यांना तडे गेलेले दिसत होते तरी देखील त्याचे योग्य प्रकारे जतन केल्यामुळे आपल्याला हे आत्ताच्या काळात बघता येणे हा एक विलक्षण अनुभव आपण घेतो. येथील अनेक साहित्य Santotini मधीलच एका दुसऱ्या संग्रहालयामध्ये बघायला मिळते.
4. Museum of Prehistoric Thera – Akrotiti व Potamas येथील उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक वस्तू येथे योग्य प्रकारे जतन करून ठेवलेले आहेत.
5. Amoudi Bay- हे एक Fishing Port आहे. समोर अथांग समुद्र व वर नजर गेल्यावर दिसणारा Oia चा डोंगराळ परिसर हे येथील वैशिष्ट्य आहे. स्वच्छ निळे पाणी व त्याला हिरव्या रंगाची असलेली किनार बघताना एखाद्या पुस्तकातील गोष्ट वाचल्याप्रमाणे भास होत होता. उत्कृष्ट Sea food साठी ही जागा प्रामुख्याने ओळखली जाते.
6. Megalochori – एक पारंपरिक गाव बघण्यासाठी व अनुभवण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. गावची हद्द दर्शवणारी कमान ओलांडून आत गेल्यापासून प्रत्येक पावलापावावर दिसणारा वेगळेपणा अनुभवताना खूपच मज्जा येते हे मात्र नक्की. जसे जसे आपण चालत आत जाऊ लागतो तसे हे गाव आपल्यासमोर उलगडत जाते व आपल्याला अचंबित करत जाते.
7. Oia – इथे फिरताना अगदी Fira सारखाच अनुभव आला. दोन्ही बाजूला दुकाने त्या मधून जाणारा छोटासा रस्ता आणि सोबतीला समुद्र. काही पारंपरिक खाद्यपदार्थ असलेली हॉटेल्स तर काही आधुनिक पद्धतीची हॉटेल्स बघत आम्ही चालत पुढे जात होतो. Fira पासून Oia पर्यंत अनेक जण चालत देखील येतात. 10 km अंतर असलेला हा टप्पा आहे. अनेक चढ उतार पार करुन, दमून भागून अनेक जण आलेली दिसत होती. वेळ कमी होता आणि ऊन देखील खूप होते त्यामुळे आम्ही मात्र थोडाच भाग चालून पूर्ण केला.
8. Atlantis Books- Oia मध्ये चालता चालता हे एक एक छोटेसे घरवाजा दुकान दिसले. त्याविषयी आधी मी ऐकले होते पण नेमके ते बंद असल्याने बघता आले नाही. त्याच्या भिंतीवर बाहेरील बाजूस अनेक पुस्तके एका रकान्यामध्ये ठेवली आहेत असे चित्र काढले होते. काही पुस्तके उघडलेली तर काही मिटलेली अश्या प्रकारची निरनिराळी चित्रे काढून भिंत सजवली होती. त्यावरूनच आतील दुकान किती आकर्षक असेल याचा अंदाज आला.
9. Agios Nikolas Castle – प्रामुख्याने सूर्यास्त बघण्यासाठी जगप्रसिद्ध असलेली ही जागा आहे. 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला आणि देखरेखीसाठी एक टॉवर देखील बांधला. 1956 मध्ये झालेल्या भूकंपात किल्ल्याचा बराचसा भाग खाली कोसळला. आत्ता त्याचा काहीच भाग शिल्लक आहे. Caldera View, Volcanic Island व Agean Sea बघण्यासाठी इथे लोक येतात.
आत्ताच मी उल्लेख केला की सूर्यास्त बघण्यासाठी इथे सर्वजण आधीपासूनच जागा शोधत असतात. आम्हीदेखील अश्या काही निवडक जागा हेरून ठेवल्या होत्या. पण आमचे अगदी “काखेत कळसा आणि गावाला वळसा” असे झाले. आमच्या खोली बाहेरील बाल्कनी मधूनच आम्हाला शांतपणे व मनसोक्त सूर्यास्त बघायला मिळाला. दिवसभर फिरून सूर्यास्ताची वेळ गाठताना जरा गडबड झाली. पण अगदी योग्य वेळेत आम्ही पोहचलो.
“Santorini” या जागेने कमीतकमी दिवसात मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. आणि आता उद्या इथून निघायचे त्यामुळे आता मनात थोडी चलबिचल होत होती. त्यामुळे सूर्यास्तानंतर परत एकदा एक छोटीशी फेरी मारून शक्य तेवढे डोळ्यात साठवून आम्ही Athens ला जायला निघालो.
क्रमशः
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
15.11. 2023.
2 responses to “निळाशार देश…”
फारच सुंदर लेख आहे …..अप्रतिम
धन्यवाद.