घटना 1- डिसेंबर 2022 मध्ये आमचा नॉर्वेतील पहिलाच हिवाळा होता. तेव्हा आम्ही Tromso ला गेलो होतो. माझे दीर आणि जाऊ तिथेच राहत असल्याने त्यांच्याकडेच आम्ही उतरलो होतो. नक्की आठवत नाही पण, गेल्या गेल्या पहिल्या एक दोन दिवसातच कधीतरी एकदा रात्री जेवण करून शतपावली घालायला बाहेर पडलो. बर्फ, थंडी भरपूर होतीच. जरा कोपऱ्यावर गेल्यावर माझ्या जावेनी आकाशाकडे बोट दाखवून ते बघा Northern lights असे आम्हाला सांगितले. आम्हीपण जरा निरखून बघितले तर पांढरट, हिरव्या रंगाचा एक धूसर पट्टा आकाशात दिसला. तेव्हा सर्वप्रथम कळले की जे फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये बघतो ते Northern lights आणि प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारे Northern lights यामध्ये देखील खूप फरक असतो. आयुष्यात पहिल्यांदाच Northern lights बघितले त्याचा आनंद झाला. फार काळ तो पट्टा आम्हाला दिसला नाही पण निदान एक छोटीशी झलक तरी दिसली. “आत्ताच तर आलो आहोत, अजून तर सहा-सात दिवस हातात आहेत. बघू, नशिबात असेल तर परत दिसतीलच” असा विचार करून समाधानाने आम्ही घरी आलो.
घटना 2- Tromso मध्ये असतानाच एक प्रसिद्ध ठिकाण आहे Fjellheisen ते बघायला गेलो. तिकडे गेल्यावर अचानक लक्षात आले की थोड्या वेळातच Northern lights दिसण्याची शक्यता आहे. अशी संधी समोर असताना कोण घालवेल? असे म्हणून आम्ही थांबायचे ठरवले. एका डोंगरावरती हे ठिकाण होते. शिवाय कडाक्याच्या थंडीत बाहेर खूप वेळ देखील उभे राहता येत नव्हते. त्यामुळे तेथे आतमध्ये असलेल्या Cafe मध्ये आम्ही अधून मधून जाऊन बसत होतो. बराच वेळ वाट बघून देखील Northern lights काही केल्या दिसत नव्हते. फार उशीर झाला नव्हता. दुपारचे तीन-चार वाजले होते पण हिवाळा असल्यामुळे बाहेर पूर्ण अंधारच होता. मग शेवटी परत एकदा बाहेर जाऊन बघू आणि नाही दिसले तर मग लगेच घरी जाऊ असे म्हणून आम्ही बाहेर गेलो. त्या क्षणी अंधुक अंधुक हिरवे पट्टे आकाशात दिसू लागले. हळूहळू वाढत जात अगदी स्पष्टपणे Northern lights आम्ही बघू शकत होतो. ( त्या अनुभवाचे वर्णन आणि Tromso मधील ठिकाणांचे वर्णन वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे.)
घटना 3- Oslo मध्येच (November 2023) मध्ये एकदा रात्री घरी बसलेले असताना आज Northern lights दिसणार आहेत असे समजले. हो-नाही करत करत आम्ही ते बघायला निघालो. घरातून निघून metro ने Sognsvann या ठिकाणापर्यंत पोहोचायला साधारणपणे 30 ते 40 मिनिटे लागली. त्यावेळेस देखील आम्ही असेच म्हणले की, अगदी नशिबात असतील तरच दिसतील नाहीतर पुढच्या वेळेस परत प्रयत्न करू. Metro मधून उतरून जसे जसे आम्ही lake च्या दिशेने जात होतो तसे तसे आम्हाला Northern lights लगेच दिसू लागले. अंधारात, थंडीत कुडकुडत आम्ही जिथे उभे होतो तोच बर्फाने गोठलेला Lake होता. त्यावर उभे राहून आम्ही Northern lights बघितले. हा एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव होता. त्यावेळेस हिरवा व लाल अशा दोन रंगांमध्ये असलेले Dancing Aurora मला बघायला मिळाले. योग्य वेळेस, योग्य ठिकाणी असणे ही एक गोष्ट Northern lights बघताना किती महत्त्वाची असते याची प्रचिती त्यावेळेस परत एकदा झाली. कारण अगदी दहा मिनिटांचा जरी उशीर झाला असता तरी आम्हाला हा अनुभव घेता आला नसता.
घटना 4 – 11 may 2024 ला जगभरातील अनेक ठिकाणी त्याचबरोबर Oslo मधून देखील इतके सुंदर Northern lights दिसले की जणू काही एखादा दुर्मिळ योग असावा. पण म्हणले तसेच शेवटी तुमच्या नशिबात असायला हवे. कारण आम्ही नेमके त्या दिवशी बघायला गेलोच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
त्या वेळचे इतरांचे फोटो बघून 12 तारखेला जिद्दीने रात्री 1.30 वाजता परत गेलो. KP जास्त होता आणि ढग नव्हते. आदल्या दिवशी दिसलेल्या फोटोवरून खूप आशा होती की आज पण नक्की दिसणारच. साधारणपणे एक-दीड च्या सुमारास Sognsvann ला गेलो. तिथे जाऊन एक-सव्वा तास वाट बघून देखील आम्हाला काही Northern lights बघायला मिळाले नाही.
या सर्व घटना मी इथे मुद्दाम नमूद केल्या आहेत. बरेच दिवसापासून हा विषय माझ्या डोक्यात होताच. कारण Northern lights या विषयी सविस्तर मी अजून काहीच लिहले नव्हते. म्हणून आज ठरवून या विषयात हात घातला.
Northern lights म्हणजे नक्की काय हे सोप्या भाषेत सांगायचा मी थोडा प्रयत्न करते. सूर्याच्या पृष्ठभागावर होणारी वादळे म्हणजेच सौरवादळे. वादळामुळे तयार झालेले सौरकण सौरवाऱ्याबरोबर (Solar Wind) पृथ्वीच्या जवळ येतात आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे (magnatic field) उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्याकडे आकर्षिले जातात. आता हे कण पृथ्वीच्या वातावरणातल्या अणू (atoms) बरोबर टक्कर देतात. त्यामुळे त्या सौर कणांमधली ऊर्जा atoms ला दिली जाते. ही atoms मध्ये जास्ती झालेली ऊर्जा वातावरणात पसरते त्यामुळे आपल्याला रंगीत उजेड दिसतो हेच ते Northern lights!!!
उत्तर आणि दक्षिण अश्या दोन्ही ध्रुवांवर असे lights दिसतात ज्याला अनुक्रमे Northern lights (Aurora borealis) आणि Southern lights (Aurora Australis) म्हणतात.
हे शब्द ग्रीक-रोमन पौराणिक कथांमधून आले आहेत.
खूप जणांचे याविषयी नानाविध प्रश्न असतात. काही जणांना वाटते नॉर्वेमध्ये कधीही आपण Northern lights बघू शकतो. पण मला खास करून सांगावेसे वाटते की Northern lights प्रत्यक्ष दिसण्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी कारणीभूत असतात.
1. KP Index- पृथ्वीच्या वातावरणातील geomagnetic activity त्याचे मोजमाप करण्यासाठी वापरतात. 0-9 अशी पातळी मोजतात ज्याच्यामुळे कोणत्या भागात Northern lights दिसण्याची शक्यता जास्ती आहे हे आपल्याला समजू शकते.
2. Solar Wind- Northern lights उत्तम प्रकारे दिसण्याचे रहस्य या सौर वाऱ्याच्या वेगामध्ये आहे. सौर वारे जितक्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतात तितके Northern lights जास्त तीव्र होतात.
3. Cloud Cover- जरी KP Index जास्त आहे पण ढग असतील तर Northern lights दिसणार नाहीत. त्यासाठी आकाश पूर्णपणे अथवा बहुतांश निरभ्र असायला पाहिजे.
4. Day Light- वर लिहिलेल्या घटनेतील शेवटच्या घटनेमध्ये Northern lights न दिसण्याचे महत्त्वाचे कारण हेच होते की मे महिन्यात रात्री पूर्ण अंधारच पडला नाही. म्हणजे जरी KP Index जास्त आहे, आकाश निरभ्र आहे पण आकाशात उजेडच आहे त्यामुळे Northern lights activity होत असून देखील ते डोळ्यांनी बघू शकलो नाही. म्हणूनच साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च/एप्रिल हा काळ Northern lights बघण्याच्या दृष्टीने चांगला असतो. कारण त्या काळात सूर्यास्त लवकर होतो आणि अंधार जास्ती वेळ असतो. त्यावेळेला पृथ्वी सूर्याकडे अशा प्रकारे झुकलेली असते की, उत्तर ध्रुवीय वर्तुळावर (inside arctic circle) सूर्य कधीच उगवत नाही. आणि ह्याच्याच विरुद्ध उन्हाळ्यात (साधारण जून ते ऑगस्ट) सूर्य मावळतच नाही, म्हणजे त्यावेळेला सूर्य रात्रंदिवस आकाशात असतो. या कालखंडांना अनुक्रमे ध्रुवीय रात्र आणि ध्रुवीय दिवस म्हणतात. त्यामुळे जेव्हा ध्रुवीय रात्र असते त्या काळात Northern lights दिसण्याची शक्यता असते.
5. योग्य वेळ, योग्य ठिकाण- हल्ली हल्लीच असे बरेचदा झाले की Oslo मधून देखील Northern lights दिसत होते. नाहीतर उत्तरेकडील काही ठराविक ठिकाणी जाऊनच आपल्याला Northern lights बघावे लागतात.
जरी या सर्व गोष्टी जुळून आल्या तरी सुद्धा ज्या भागात Northern lights दिसत आहेत त्या भागात तुम्ही त्या ठराविक वेळी असणे हे देखील खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच मला असे वाटते की, फक्त या वरच्या सर्व गोष्टींवर नाही तर एखाद्याच्या नशिबावर देखील हे अवलंबून असते. असे कित्येकजण आहेत की एखादी Northern lights बघण्याची ठराविक टूर घेऊन, कित्येक तास प्रतीक्षा करून देखील त्यांना Northern lights दिसले नाही. या उलट अशी देखील माणसे आहेत की ज्यांना कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते की आपल्याला घरबसल्या बघायला मिळतील आणि त्यांना सहज दिसले. अशा देखील घटना नुकत्याच घडलेल्या आहेत.
एकदा का या सगळ्या गोष्टी व नशीब अशी एकत्र भट्टी जमून आली आणि प्रत्यक्ष डोळ्यांना Northern lights दिसले तर त्यावेळेस होणारा आनंद हा शब्दात सांगणे हे मात्र कठीणच जाते. कितीही वेळा बघितले तरी प्रत्येक वेळी बघताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो व अशी वेळ परत परत यावी आणि परत परत बघता यावे अशी इच्छा देखील मनात असतेच असते.
हे असे सगळे जरी असले तरी मला असे वाटते की, कितीही नवीन नवीन शोध लागले, विज्ञान कितीही पुढे गेले तरी “निसर्ग” नावाचा जो काही चमत्कार आहे तो कायमच मनुष्याच्या एक पाऊल पुढे आहे. कारण कितीही झाले तरी आजही 100% कोणीच खात्री देऊ शकत नाही की ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी तुम्हाला Northern lights 100% बघायला मिळतीलच! जरी नुसती शक्यता दर्शवली तरी Northern lights कधी, कुठे व कसे दिसतील हे “ठरवणारा” व “दर्शवणारा” हा कायमच सर्वांपेक्षा श्रेष्ठ होता, आहे आणि असणार!
मग कधी येताय तुम्ही तुमचे नशीब आजमावायला?
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
6 June 2024.
5 responses to “Northern lights-एक जादुई अनुभव…”
[…] Northern lights-एक जादुई अनुभव… – आठवणींचा खजि… […]
Khup ch chan anu ashich lihit ja
Mast
Great 👍
Thank you 🙂