उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromsø भाग तीन)

(Tromsø मधील सुरवातीचे वर्णन वाचण्यासाठी लिंक शेवटी दिली आहे.)

बस मधून आम्ही Fjellheisen च्या दिशेने निघालो. बसचा प्रवास पण खूप छान चालू होता कारण बस मधून मुख्य गावातून पलीकडे जाताना खूप नवीन आणि सुंदर गोष्टी बघायला मिळत होत्या. वाटेत एक शाळा दिसली त्या शाळेच्या एका भिंतीवर खूप मोठे एक छान चित्र काढले होते. जाताना आर्क्टिक cathedral पण दिसले. त्याची रचना खूप वेगळी आहे. बसमधून उतरल्यावर बर्फातून थोडे अंतर चालल्यावर Cable Car चा बेस लागला. त्यातून फक्त चार मिनिटातच आम्ही वरती डोंगरावर पोहोचलो.

Floya डोंगर kirkelandet बेटाच्या सर्वात पश्चिमेला आहे. पूर्वीच्या काळी बंदरावरील जहाजावरील नविकांसाठी वाऱ्याची दिशा दाखवण्याचे काम येथे करत. ही Cable car 1961 मध्ये बांधली गेली. समुद्रसपाटीपासून 421 मीटर उंचीवर असलेल्या या डोंगरावरून खालील Tromsoya, त्याच्या शेजारी असलेले kvaloya बेट, मध्ये असलेले fiord हे सर्व सुंदर दिसते. उन्हाळ्यामध्ये Midnight Sun पाहण्यासाठी व हिवाळ्यामध्ये Northen Lights पाहण्यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे. मध्यभागी एक रेस्टॉरंट असून एका बाजूला एक लाकडी डेक व दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. सुरुवातीला आम्ही त्या डेक वर गेलो खालील दृश्य बघून आम्ही थक्क झालो.

चंद्राच्या प्रकाशात व रात्रीच्या दिव्यांमुळे ते सौंदर्य आणखीन उजळून निघत होते. मध्येच एक मोठे जहाज जाताना दिसले. बाहेर थंडी भरपूर होतीच आणि शिवाय भरपूर बर्फ पण पडला असल्यामुळे जास्ती वेळ बाहेर थांबता येत नव्हते. म्हणून जरा वेळ आत मध्ये असलेल्या रेस्टॉरंट मध्ये बसून परत आम्ही दुसऱ्या बाजूला असलेल्या डोंगरावरून पलीकडे चालत जाऊ लागलो. बर्फातून चालताना खूप काळजीपूर्वक चालावे लागत होते जरी ग्रीपर्स (spikes)घातले होते तरीसुद्धा पाय तसे थोडेफार घसरत होते. त्यात पण मजा अशी की ते grippers कुठेही आत मध्ये म्हणजेच साध्या जमिनीवर, कार्पेट वरती असे वापरता येत नाहीत कारण त्यांना खिळे असतात. मग प्रत्येक वेळा बाहेर जाताना ते घालायचे व प्रत्येक वेळेला आत येताना ते काढायचे असा खेळ सारखा करावा लागतो. तिथे पण असाच खेळ चालू ठेवून आम्ही काहीवेळ डोंगरावरून फिरून परत आत मध्ये आलो.

त्यादिवशी Northen Lights दिसणार असल्याची थोडीफार शक्यता दाखवत होते म्हणून आधी पूर्ण अंधार पडण्याची वाट आम्ही बघायला लागलो. अंधार झाल्यावर दर दहा मिनिटांनी बाहेर जाऊन आम्ही अंदाज घेत होतो. असे जवळजवळ तासापेक्षा जास्ती वेळ आत बाहेर केल्यावर शेवटी कंटाळून घरी जाऊया असे आम्ही ठरवले. पण पाय तिथून निघत नव्हता. असे वाटत होते की आपण निघू आणि त्याच्यानंतर Northen Lights दिसले तर! फक्त आता पाच मिनिट जाऊन बघू नाहीतर लगेच घरी जाऊ असे आम्ही ठरवले आणि परत गेलो त्यावेळेला आकाशात पांढरा पट्टा दिसू लागला. थोड्या वेळानंतर तो पट्टा जरा जास्ती गडद दिसू लागला. आमच्या डोळ्यांवर आमचा विश्वास बसेना कारण आता आम्ही प्रत्यक्ष नॉर्दन लाईट्स बघत होतो. मग आम्ही अशी जागा शोधायला लागलो की जिथून आणखीन छान प्रकारे आपल्याला बघता येईल. अशी एक जागा आम्हाला मिळाली त्या जागेवरून आता आम्हाला पूर्ण आकाश दिसत होते. त्याच्यामुळे आधी एक बाजूचा नंतर दुसऱ्या बाजूचा सुद्धा पट्टा आम्हाला हळूहळू दिसायला लागला. आता हिरव्या रंगाची छटा असलेले Northen Lights आम्ही प्रत्यक्ष बघू शकत होतो हे सर्व अनुभवताना खूप आनंद होत होता. त्या दिवशी जवळजवळ दीड ते दोन तास आम्ही आत बाहेर असा खेळ खेळत Northen Lights बघितले. फोटो आणि व्हिडिओ काढताना खूप अवघड जात होते कारण हात gloves च्या बाहेर काढले तर लगेच बधीर होत होते. तरीसुद्धा जिद्दीने आम्ही थोडेफार फोटो काढले. दोन तासांनी जेव्हा Northen Lights दिसायचे बंद झाले त्यावेळेला आम्ही निघालो. पण आता खूप समाधान वाटत होते कारण एवढ्या थंडीमध्ये आम्ही थांबलो त्याचे चीज झाल्यासारखे आम्हाला वाटत होते.

आजही हे सर्व वर्णन आठवून लिहताना सर्व काही स्वप्नवत किंवा एखाद्या सुंदर गोष्टी मध्ये वाचल्यासारखे वाटत आहे. “अरे बापरे, Tromsø ला खरंच जायचं?” तिथपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास आणि प्रवासातील सुंदर क्षण हे कधीही न विसरता येण्यासारखे आहेत.

तळटीप- Northen Lights दिसणे हा एक सुंदर अनुभव आहेच पण त्याबरोबर अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या पण माहीत असणे गरजेचे आहे.

1. फक्त हिवाळ्यामध्ये Northen Lights दिसतात पण रोज आणि कुठूनही दिसतील असे अजिबात नाही.

2. आकाश निरभ्र असणे आणि KP Index जास्त असणे अश्या गोष्टींवर सर्व अवलंबून असतं. Norway चे हवामान हे खूप पटकन बदलते, आणि बहुतेक वेळेला ढग असतातच!!

3. आपण प्रत्यक्ष जेव्हा Northen Lights बघत असतो तेव्हा आपल्या डोळ्यांना पांढरा रंग आणि थोडा हिरवा रंग दिसतो. फोटो मध्ये जसे दिसतात तसेच्या तसे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत!

4. शहरापासून लांब किंवा डोंगरावर अश्या ठिकाणी हे दिसण्याची शक्यता जास्त असते. पण तिथे साहजिकच खूप थंडी आणि वारा असतो. आणि अश्या वातावरणात जाऊन बघणे ही पण सोपी गोष्ट नाहीये.

5. Prediction बघून, वेळ ठरवून जरी बघायला गेलो तरी दिसतीलच अस कोणी सांगू शकत नाही. कारण तुमची जागा, वेळ, Luck ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात.

6. Northen Lights दाखवण्यासाठी bus tours असतात. तशी एखादी tour घेतली तर दिसण्याची थोडी जास्त शक्यता असते. पण खात्रीशीर कोणीच सांगू शकत नाही.

7. Photo आणि video काढणे हे पण एक आव्हान असते. Tripod (जो आम्ही विसरलो होतो) आणि video settings चा अभ्यास हे महत्त्वाचे आहे.

तिथे जाऊन अनुभव घेतल्यावर आम्हाला या गोष्टी समजल्या. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हा अनुभव नक्कीच घ्यावा.

Northern lights-एक जादुई अनुभव… – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Tromsø भाग 1 – Tromsø (भाग एक) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Tromsø भाग 2- Tromsø मधील संग्रहालये (भाग दोन) – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.

30.12.2022

4 responses to “उत्सुकता, प्रतीक्षा, कसोटी आणि…..(Tromsø भाग तीन)”

  1. सुंदर प्रवास वर्णन.
    सुरुवातीला हे सगळं नॉर्व मधील आहे असा उल्लेख हवा होता. पूर्ण लेख वाचल्यावर कळतं हे नॉर्वे असावं.
    -sanjay kank
    9850565678

    • धन्यवाद सर. तुम्ही जो भाग वाचलात तो Tromso मधील तिसरा भाग आहे. वेबसाइट वर नॉर्वे अंतर्गत हे सर्व लेख आहेत. मी तुम्हाला पहिल्या दोन भागांची लिंक देते.
      Tromso भाग 1- https://athavaninchakhajina.com/?p=1582
      Tromso भाग 2- https://athavaninchakhajina.com/?p=1587
      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल परत एकदा धन्यवाद. थोडा बदल करून त्या लेखामध्ये मी पहिल्या दोन भागाच्या लिंक देते.

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links