आंबा…सर्वांच्या अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा. लहानपणापासूनच प्रत्येकाच्या कितीतरी आठवणी या फळाशी जडलेल्या असतातच त्याचमुळे असेल कदाचित “अरे आमच्या लहानपणी तर आंबे म्हणजे….” अशी प्रत्येकाची कमीत कमी एक तरी गोष्ट असतेच असते.
फळ तेच पण निरनिराळ्या लोकांच्या आवडीप्रमाणे खाण्याचे प्रकार अनेक! म्हणजे कोणाला नुसता आंबा आवडेल, तर कोणाला आमरस आवडेल. कोणाला मुरांबा आवडेल, तर कोणाला जॅम आवडेल. कोणाला फक्त हापूस आवडेल तर कोणाला पायरी आवडेल. हापूस म्हणलं तरी त्यात सुद्धा प्रत्येकाची पद्धत वेगळी. कोणी हापूस आंब्याचा फक्त रस खाईल, तर कोणी फक्त फोडी खाईल आणि मजा म्हणजे फोडी करण्याची सुद्धा प्रत्येकाची पद्धत ही ठरलेली असते हा! कोणाला तर आंबा अजिबात आवडत नाही. ते कसे काय हे माझ्यासाठी एक कोडेच आहे. उन्हाळा सुरू होता होता सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतात तोच हा आंबा.
आज हे सर्व लिहिण्याचे कारण मागच्या वर्षी नॉर्वे मध्ये आल्यामुळे आम्हाला आंबा खायला मिळाला नव्हता. अगदी मागच्याच आठवड्यात बोलबोलता आम्हाला आठवण झाली व आम्ही म्हणले पण की आता परत भारतात जाऊ त्याशिवाय आपल्याला आंबा मिळणार नाही. योगायोग असा की एका मैत्रिणीने आपणहून मला फोन करून आंबे आणते असे सांगितले व तिने अगदी घरपोच आम्हाला हापूस आंबे आणून दिले. पेटी उघडल्या उघडल्या आंब्याचा घरभर अगदी घमघमाटच सुटला. आज आंबे खाताना काही क्षण आमचाच आम्हाला विसर पडला की आपण नॉर्वे मध्ये आहोत. आम्हाला जर आधीपासून माहित असते की इथे पण आंबे मिळतात तरी देखील आम्हाला एवढा आनंद झाला नसता कदाचित. पण अनपेक्षित पणे मिळालेली एखादी गोष्ट कधीकधी जास्ती आनंद देऊन जाते नाही का?
– ०१ एप्रिल २०२३
