लहानपणापासूनच आपले व मातीचे नाते किती घट्ट असते नाही का? लहानपणी खेळात मातीचे आकार बनवताना, दिवाळीतील किल्ला करताना किंवा गणपतीची मूर्ती बनवताना देखील आपला व मातीचा संबंध येतो. पावसाळ्यात येणाऱ्या मातीच्या वासाने मन आनंदित होते. ही मुळे घट्ट रुजलेली असतात याचा प्रत्यय मी आज घेतला.
हल्ली सगळीकडचा बर्फ वितळल्याने रोज संध्याकाळी चालण्यासाठी आम्ही कुठलातरी नवीन रस्ता शोधून काढतो. आज सुध्दा अशाच एका पायावाटेने जात एका छोट्याशा खूप झाडी असलेल्या रस्त्याला लागलो. मुख्य रस्त्यापासून फार लांब न जाता त्यालाच समांतर असणारी अशी ही पायवाट आहे. पालवी फुटायला नुकती सुरुवात झाली असल्यामुळे समोरच्या रस्त्यावर झाडे असूनही सर्व रस्ता स्पष्ट दिसत होता. मध्येच उन्हाची तिरीप साथ देत होती. कडेने वाहणारी नदी पाण्याचा, होणारा खळखळाट यामुळे मनात खूप छान वाटत होते. कोणत्याही माणसांचा किंवा गाड्यांचा आवाज न येता फक्त चालताना होणारा पानांचा, पाण्याचा व पक्षांचा आवाज कानावर येत होता. चालताना वाटते बरेच ठिकाणी झाडांची मुळे आलेली दिसत होती. खडकांवर शेवाळे दिसत होते. मधून मधून नवीन रोप जन्म घेत होती. या संपूर्ण परिसरात जमिनीवर पडून कुजलेल्या पानांचा व मातीचा वास एकत्र होऊन दरवळत होता.
वाटेत बरीच झाडे पडलेली दिसली पण ती आहेत त्या स्थितीमध्ये जतन केली होती. कोणीही ती झाडे बाजूला करायला येत नाही किंवा लाकूड तोडायला येत नाही. म्हणजेच कोणी निसर्गामध्ये हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. हे इथले वैशिष्ट्य म्हणता येईल. मातीतून चालल्यामुळेच असेल कदाचित रोजच्यापेक्षा जास्त मजा आली. शिवाय लहान असतानाच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्यामुळे भारताची आठवण आल्यावाचून देखील राहिली नाही.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
20.4.2023