आज आम्ही नॉर्वे मध्ये येऊन चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले. आता मागे बघताना वाटत आहे कसे गेले चार महिने कळले पण नाही पण नॉर्वे मध्ये आल्यावर सुरुवातीच्या काळात जी धावपळ होत होती तेव्हा प्रत्येक दिवस हा खूप मोठा व न संपणारा वाटत होता. तर आज मला त्याबद्दल लिहून ठेवावे असे वाटले म्हणून हा आणखीन एक प्रयत्न.
जेव्हापासून समजले की आपल्याला नॉर्वेला जायचे आहे तेव्हापासून आमची हळूहळू तयारी चालू झाली होती. मग ते काय काय गोष्टी घेऊन जायच्या याची यादी करण्यापासून आमची सुरुवात झाली. घरामध्ये एखादे कार्य असल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटू लागले. काय काम करायची याची पण आम्ही आणखीन एक यादी तयार केली. कंपनीच्या सर्व formalities, documentation हे सर्व इंद्र ला कंपनीचे काम सांभाळून करताना तारेवरची कसरत होत होती. त्यात आमचे पुण्याचे घर पण दोन वर्षे बंद असल्यामुळे ते सर्व आवरून परत घर बंद करेपर्यंत सर्व कामे करायची होती. लग्नकार्यात शेवटच्या क्षणापर्यंत कामे असतात आणि शेवटी जी तारांबळ उडते तसे आमचे पण काहीसे झाले. असे सर्व करत आम्ही एकदाचे नॉर्वे मध्ये आलो.
नॉर्वे मध्ये आल्या आल्या राहायला घर मिळणे ही आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट होती. नाहीतर इथे घर मिळणे खूप कठीण जाते. काही माणसे देवासारखी मदतीला धावून येतात तशी आमची house owner व इंद्रच्या कंपनीतील सहकारी यांनी आम्हाला मदत केली. सुरुवातीला वेगळे हवामान, वेगळी भाषा, वेगळा देश याची सवय व्हायला जरा वेळ गेला. इकडे आल्यावर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे वाहन नाही व कुठेही जायचे तर public transport ने किंवा चालत जायचे हे सवयीचे व्हायला जरा जड गेले. तसे आमचे सुरुवातीचे घर मुख्य गावापासून लांब होते, शिवाय बस स्टॉप पासून पण बऱ्यापैकी अंतर होते आणि तीव्र चढ-उतार होते. तशी चालायची थोडी सवय व आवड दोघांनाही आहे पण सर्व सामान, जड पिशव्या घेऊन जाताना दमणूक होत होती. सर्व काही नवीन असल्यामुळे गुगल मॅप वर शोधून तिथे पोहोचणे, कित्येकदा मॅपवर चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे कुठेतरी वेगळीकडे जाणे व परत मूळ रस्त्यावर येणे हे असे आमचे बरेचदा होत होते त्यातच आमचे रोजचे आठ दहा किलोमीटर तरी चालणे होत असे. प्रत्येक दुकानांमध्ये सर्व नॉर्वेजयन भाषांमध्ये असते त्यामुळे कोणतीही वस्तू किंवा कोणताही पदार्थ घेताना प्रत्येक वेळा मोबाईल वरती translate करावे लागत होते. यात पण खूप वेळ जायचा.
नॉर्वे खूप महागडा देश आहे. सर्व वस्तू खूप महाग असतात. त्यामुळे कधीतरी कंटाळा आला किंवा बरे वाटत नसले तर आपण पटकन कोणालातरी डबा सांगतो, बाहेरून खाऊन येतो किंवा घरी ऑर्डर करतो पण हे असे इथे करणे म्हणजे अगदी चैनीची गोष्ट होते. आम्ही इथे आलो तेव्हा इथे दिवस खूप मोठा असे. रात्री अकरा नंतर सूर्यास्त होई. त्यामुळे त्या वेळेप्रमाणे आपले रुटीन बसवायला जरा वेळ गेला. इथल्या हवामानात पण सतत बदल होत असतात म्हणजे आत्ता ऊन आहे तर दुसऱ्या क्षणी पाऊस पडतो. त्यामुळे बाहेर कुठेही जायचे तर आम्हाला उन्हाळी टोपी, छत्री, थंडीतील टोपी, जर्किन हे सर्व घेऊन जावे लागते. लॉकडाऊन पासून आम्ही दोन वर्षे सांगलीमध्ये राहिला होतो. तिथे सहज रीतीने मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे आम्हाला लॉकडाऊनचे हाल कधी जाणवले नाहीत. शिवाय घरी सर्वजण असल्यामुळे एकटेपणा पण कधी जाणवला नाही. आणि इथे आल्यावर प्रत्येक गोष्टीसाठी चालत दुकानात जाऊन वस्तू आणणे. सर्व कामे आपले आपण करणे हे जरा अवघड गेले. इथली सर्व पद्धतही भारतीय पद्धतीपेक्षा वेगळी आहे. नॉर्वे मध्ये सुरवातीची नोंदणी प्रक्रिया आणि सर्व formalities पण खूप क्लिष्ट आणि वेळखाऊ आहेत. आजही आम्हाला काही गोष्टींची सवय व्हायला अवघड जाते. तरी हल्ली मोबाईल, कॉम्प्युटर्समुळे जग किती जवळ आले आहे. मनात आले की आपण घरच्यांशी फोनवर बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. पण पूर्वी जेव्हा या काही सोयी नव्हत्या तेव्हा लोक कसे राहत होते याचे मला कौतुक वाटते.
पण या सगळ्यात मला आवर्जून सांगावेसे वाटते ते माझ्या सासर व माहेर या दोन्ही कुटुंबांकडून आम्हाला कायम मिळणारी मदत व पाठिंबा. यामुळे आम्हाला धीर मिळतो आणि इतक्या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन एक आत्मविश्वास पण मिळतो की मनात आणले तर आपण काहीही साध्य करू शकतो.
आता आमच्यासमोर नवीन आव्हान आहे ते म्हणजे इथल्या थंडीमध्ये राहणे. कारण आम्ही नॉर्वेला येणार हे ऐकूनच बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले “नॉर्वेला जात आहात, किमान एक वर्ष तरी राहून दाखवा.” पण हे सर्व स्वीकारताना व मार्ग काढत आनंदाने जगताना एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि खूप छान वाटते.
तळटीप -नॉर्वे खूप सुंदर देश आहे. इथे सोयी सुविधा पण आहेत, फिरायला भरपूर आहे ती एक बाजू आहेच. आणि इथली स्थानिक लोक पण समजून घेतात आणि मदत करतात आपल्याला. पण त्याचबरोबर ही पण आणखीन एक बाजू आहे तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. शिवाय मी हे फार खोलात (दोघांची तब्ब्येत, आलेल्या अडचणी) न जाता लिहले आहे.
सौ.अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
5.8.2022