वरवर पाहता हे फक्त एक फर्निचर चे दुकान वाटले तरी दुकानात शिरल्यापासून प्रत्येक गोष्ट पाहताना अगदी हरखून जायला होते. छोट्या-छोट्या गोष्टी पासून अगदी पूर्ण घर बांधताना केलेली खोल्यांची रचना, त्यातील सर्व आकर्षक रीतीने मांडलेले सामान, त्यातील रंगसंगती हे बघताना अक्षरशः वेळेचा विसर पडतोच. आता सर्वांना समजले असेलच की मी कशाबद्दल बोलत आहे. अर्थातच, आता सर्व देशांमध्ये पोहोचलेले व लोकप्रिय असलेले IKEA!!!
1943 मध्ये Sweden मध्ये Ingvar Kamprad यांनी या दुकानाचा शोध लावला. सुरवातीला या दुकानामध्ये frames, घड्याळे विकत. 1947 मध्ये फर्निचर विकायला सुरुवात झाली व 1955 मध्ये स्वत:चे फर्निचर बनवण्यास सुरुवात केली. Ingvar Kamprad (Founder), Elmtaryd (The farm where founder grew up), Agunnaryd (The founders’ hometown) यातील पहिली अक्षर घेऊन IKEA हे नाव दिले गेले. त्यामुळेच काही देशात ह्याचा उच्चार “आईकिया” असा करतात तर काही देशात “ईकेआ”! ह्या दुकानाची लोकप्रियता इतकी आहे की आता प्रत्येक देशात कमीत कमी एक तरी दुकान असतेच. भारतात IKEA च्या मुंबई, हैदराबाद आणि बंगलोर येथे शाखा आहेत. पण भारतात लहान शहरांमध्ये स्थानिक फर्निचर च्या दुकानातून कमीत कमी किमतीला सुद्धा हवे तसे फर्निचर बनवून घेण्यास सोपे असल्याने IKEA चा कितपत जम बसेल सांगता येत नाही! पण एका अर्थी ते बरेच आहे नाहीतर स्थानिक दुकानदारांच्या उलाढालीत खूप फरक पडू शकेल.
इथे वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे कक्ष असतात. जसे की स्वयंपाकघर म्हणले की उपयोगी अश्या असंख्य गोष्टी तिथे सापडतात. तसेच घरातील किंवा बागेतील प्रत्येक गोष्टी साठी असलेले कक्ष तिथे आहेत. दुकानात शिरल्यापासून ते सर्व दुकान बघून बाहेर येईपर्यंत आपण तर अगदी रममाण होऊन बघत राहतो पण नंतर पाय मात्र बोलू लागतात. मग एवढे दमल्यावर आरामात बसून अनेक तिखट, गोड पदार्थांचा आनंद आपण घेऊ शकतो. ब्रेड, सलाड, केक, ज्यूस, चहा, कॉफी अश्या अनेक पदार्थांची इथे रेलचेलच असते. काचेच्या कपाटात ओळीने ठेवलेले हे खाद्यपदार्थ एका ट्रे मध्ये घेऊन शेवटी payment साठी जाऊ शकतो.
आता खाऊन जरा तरतरी आल्यावर व सर्व वस्तूंची खरेदी करून झाल्यावर payment करण्यासाठी जाताना आपल्या समोर एक मोठा हॉल येतो, ज्यात खूप मोठमोठ्या रॅक मध्ये दुकानातील सामान पॅक करून ठेवलेले असते. आपल्याला हवी असलेली वस्तू नंबर व कोड च्या मदतीने आपण इथून घेऊन payment करण्यासाठी पुढे जाऊ शकतो. त्यासाठी इथे अनेक counters असतात. ही counter म्हणजे एक टच-स्क्रीन आणि स्कॅन गन असलेले मशीन असते. त्यावर सर्व घेतलेल्या वस्तूंवर असलेले लेबल स्कॅन करून बिल payment करायचे असते. हे सर्व आपले आपण करू शकतो. जर मदत लागली तर त्यांचे कर्मचारी तिथे असतातच त्यांची मदत आपण घेऊ शकतो. बिल करून बाहेर पडताना परत एक दोन दुकाने लागतात ज्यामध्ये खाण्याचे काही सामान मिळते.
बाहेर पार्किंग साठी खूप मोठी जागा असतेच. पण जर गाडी नसेल तरीसुद्धा बहुतेक करून बस नी जाण्यासाठी देखील सोय असते. बस स्टॉप पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर दुकान असते. शिवाय मुख्य city पासून खास करून या दुकानात जाण्यासाठी व तिथून परत येण्यासाठी ठराविक वेळेत मोफत बस असतात. त्या बस मधून आपण कमी वेळात येऊ शकतो.
Oslo मध्ये IKEA ची 2 मोठी दुकाने आहेत. या दोन्ही दुकानांमध्ये मी जाऊन आले पण परत परत जाऊन बघताना अजिबात कंटाळा आला नाही. उलट प्रत्येक वेळेस नवीन वाटणाऱ्या सर्व आकर्षक गोष्टी बघून मज्जा मात्र खूप आली.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
29.7.2023.