आम्ही या वर्षी मार्च महिन्यात नॉर्वेमध्ये आलो. इथे आल्यापासून बऱ्याच स्थानिक व इतर लोकांकडून 17मे बद्दलची चर्चा ऐकत होतो. त्यामुळे आमच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली व आम्ही पण या दिवसाची वाट पाहू लागलो. जसा जसा हा दिवस जवळ आला तसा इथल्या लोकांचा उत्साह वाढू लागला. प्रत्येक घरातील व्यक्ती आपापल्या घरातील स्वच्छता, बागकाम, डागडुजी, रंगकाम असे करताना दिसू लागली. 17 मे च्या आत बाग व घराभोवतालचा परिसर हा स्वच्छ करून टापटीप केला जातो. प्रत्येक घरात नोर्वेचा (किमान एक तरी) झेंडा लावला जातो.
17 मे हा नॉर्वेचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 17 मे 1814 रोजी नॉर्वेच्या राज्यघटनेवर Eidsvoll मध्ये स्वाक्षरी झाल्यामुळे 17 मे (syttende mai) म्हणून साजरा करतात. या दिवशी नॉर्वेजियन राष्ट्रीय सुट्टी असते. प्रसिद्ध नॉर्वेजियन कवी Henrik Wergeland ह्यांच्या पुढाकाराने हा दिवस लहान मुलांचा सहभाग असलेला “उत्सव” म्हणून साजरा करतात. या दिवशी निरनिराळ्या शाळेतून लहान मुलांच्या परेड्स निघतात. अगदी 6-7 वर्षांपासूनची सर्व मुले ह्यात उत्साहाने सहभागी होतात. ह्या परेड रॉयल पॅलेस पर्यंत जातात. तिथे नॉर्वेच्या राजघराण्यातील व्यक्ती 3-4 तास सलग न थकता पॅलेसच्या बाल्कनी मधून परेडला हात हलवून अभिवादन करतात. परेड चालू असताना “Hurray” असे ओरडून आनंद व्यक्त केला जातो.
ब्यूनाड (Bunad) हे नॉर्वेच्या पारंपारिक पोशाखाचे नाव आहे. ह्या पोषाखामध्ये चांदीचे नक्षीकाम आणि हाताने केलेली एम्ब्रोईडरी असते त्यामुळे प्रत्येक पोषाख हा वेगळा व वैविध्यपूर्ण असतो. त्यामुळे हा पोशाख अत्यंत महाग असू शकतो. बहुतकरून आईकडून मुलीकडे हा पोषाख दिला जातो. त्यामुळे त्याला वंशपरंपरेचे महत्व प्राप्त होते.
संध्याकाळी शहराच्या विविध भागांमध्ये पारंपारिक नृत्याचे POLS DANCE चे सादरीकरण असते. अशा तऱ्हेने हा दिवस साजरा केला जातो.
– अनुराधा उकिडवे,
17.3.2022.