सध्या नॉर्वेमधे हळू हळू हिवाळा चालू होत आहे. त्यामुळे दिवस उजाडायला सात तर कधीकधी साडेसात होतात. आम्ही आलो तेव्हा उन्हाळ्यामध्ये पहाटे साडेतीन-चार वाजल्यापासूनच दिवस उजाडायचा आणि रात्री अकराच्या सुमारास दिवस मावळायचा. पण आता संध्याकाळचे सात-साडेसात वाजताच अंधार पडतो. खूपदा तर पूर्ण दिवस पाऊसच असतो किंवा नुसती हवा पावसाळी असते. तेव्हा बरेचदा सूर्य अजिबात दिसत नाही. बाहेर बऱ्यापैकी अंधार असला की किती वाजले याचा काही अंदाजच येत नाही.
बाहेर कुठे अगदी थोड्यावेळ जरी जायचे म्हणले तरी सुद्धा आधी खूप तयारी करावी लागते. म्हणजेच जर्किन, टोपी, गळ्याला स्कार्फ, हातमोजे, छत्री या सर्व तयारीनेच बाहेर जावे लागते. इथले तापमान पण खूप वेगळे आहे. म्हणजे परवा तर एक डिग्री तापमान होते, तर काल साधारणपणे अकरा डिग्री पर्यंत पोहोचले होते. तापमानातील हा असा फरक खूप पडत असतो. खूपदा असे होते की, दिवसभर पाऊस झाला आणि संध्याकाळी पाच नंतर असे वाटते की आता संपला दिवस तर अचानक काही वेळासाठी का होईना सूर्य देव हजेरी लावून जातात.
बाहेर गेल्यावर रोज नवीन अनुभव असतो. झाडांची पाने रस्त्यावर गळून पडल्यामुळे पूर्ण रस्ता हा जणू पानांचाच बनला आहे असे कधीतरी वाटते. कुठेतरी झाडावर हिरव्या पानातून एक लाल रंगाची वेल डोकावून बघत असते. एक वेगळ्याच प्रकारची रंगछटा ही सर्वत्र पसरलेली असते. मधूनच एका घराच्या धुराड्यातून धूर येताना दिसतो. हवेमध्ये झाडांचे, पानांचे, धुराचे वास एकत्रित मिसळलेले असतात. काही काही घरांमध्ये राहिलेले डागडुजीचे काम उरकण्याची गडबड दिसून येते. अंधार लवकर पडत असल्यामुळे सर्व घरांमध्ये व घराबाहेर दिवसा पण दिवे लावायला लागतात. या सर्व वातावरणात इथली सर्व सुंदर घरे अधिकच उठून दिसायला लागलेली आहेत.( इथल्या घरांचे प्रकार घरांची रचना हा तर एक वेगळाच विषय आहे त्या विषयावर पण मी लिहिण्याचा प्रयत्न करेन.) आम्ही राहतो तो भाग मुख्य रस्त्यापासून जरा आतल्या बाजूला आहे. शिवाय वाहतूकही खूप नाहीये. त्यामुळे गाड्यांचे आवाज पण खूप येत नाहीत व बऱ्यापैकी शांतताच असते. पण पक्ष्यांचे आवाज, पावसाचा आवाज, पावसाचे पाणी खाली पडलेल्या पानांवर पडून झालेला एक वेगळा आवाज हे आवाज हवेत मिसळून राहतात.
हे सर्व बघायला, अनुभवायला मला आवडते. त्यामुळेच कदाचित बाहेर थंडी जास्ती असली तरी दिवसातून किमान एकदा तरी बाहेर जाऊन “चालून” यावेसे वाटते व चालून आल्यावर मन ताजेतवाने होते व दुसऱ्या दिवसाची वाट बघत राहते.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
14.10.2022