एखादी खाडी(fjord) आहे जी पूर्णपणे गोठलेली आहे व त्यावर सगळीकडे बर्फाचे आवरण आहे. त्यावर लहान मुले बागडत आहेत, कोणी कोणी सायकल चालवत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात आहे, कोणी स्केटिंग करत आहे तर कोणी नुसते चालत फिरत आहेत. वाचताना हे सर्व काल्पनिक वाटत आहे ना? पण हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे आणि अशा खाडीवरून चालले देखील आहे!
परवा एके ठिकाणी बस मधून जाताना वाटेत हे गोठलेले Fjord बघितले व तिकडे जाण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. शनिवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. आलेला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद घेत होता. विशेष सांगावेसे वाटते ते म्हणजे इथली व्यवस्था! या fjord वरील ठराविक भागच खेळण्यासाठी, चालण्यासाठी उपलब्ध होता. बाकी काही ठिकाणी पट्टे लावून तो भाग पूर्णपणे बंद केला होता. त्यातूनही अगदीच काही अडचण आली किंवा मदतीची गरज लागली तर स्वयंसेवक मदतीला तयार होते. त्यांच्या गाड्या पण अगदी वेगळ्याच होत्या ज्या जमीन, पाणी, बर्फ या सर्वांवरून चालू शकतील. त्यामुळे येणारा प्रत्येक जण निर्धास्तपणे तरीसुद्धा आपापली काळजी घेऊनच तिकडे फिरत होता.
हे सर्व बघून मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, कितीही थंड हवामान, कितीही टोकाची परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये राहून, त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन आनंदी राहणे आणि इतरांना आनंदी ठेवण्यात मदत करणे हा इथल्या लोकांचा स्वभाव खूप काही शिकवून जातो.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
6-2-2023