तशी मला काही खूप पक्षी निरीक्षण करण्याची किंवा पक्षांचे फोटो काढण्याची आवड नाहीये. पण हल्ली हल्लीच एक दोनदा पक्षीनिरीक्षण करण्यासाठी गेले आणि खूपच छान अनुभव घेऊन घरी आले.
काल मी Østensjøvannet येथे जाऊन आले. हे Oslo मधील एक मोठे सरोवर आहे. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील एक पक्षी आहे Smew. अगदी नावाप्रमाणेच छोटासा आणि बदक वर्गात मोडणारा हा पक्षी आहे. यातील नर हे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात आणि मादी राखाडी रंगाची असते. तिच्या डोक्याचा आकार चेस्टनट सारखा असून डोक्यावर तुरा असतो. Smew पक्षी कधी कधी Common Goldeneye बरोबर संकरीत होतात. (पु ल देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास तर Smew चे विजातीय पोरींशी संधान असते!)
कदाचित म्हणूनच आज आम्ही गेलो होतो तिथे फक्त एकच नर पक्षी होता. बाकीच्या अनेक बदकांबरोबर हा एकमेव Smew आनंदाने सरोवराच्या पाण्यात विहार करत होता. मधूनच पाण्याखाली एखादी डुबकी मारून मासे पकडून परत पाण्यावर येऊन तरंगत होता. आम्ही तिथे पोहचलो तेव्हा आधीपासूनच अनेक जण फोटो काढण्यासाठी तिथे आलेले होते. सर्वजण Smew ची अगदी आतुरतेने वाट बघत होते. पण Smew मात्र जरा लाजाळू वर्गात मोडत असल्याने त्याच्या त्याच्या कक्षेतच फिरत होता. जरा जवळ येत आहे असे वाटल्यावर सगळे फोटोग्राफर सरसावून बसत होते पण फक्त एक झलक दाखवून मात्र परत तो लांब जात होता असाच खेळ सतत चालू होता. त्याशिवाय common goldeneye, Eurasian coot, Mallard, Eurasian Magpie हे सर्व पक्षी दिसले. एक देखणा राजहंस त्याच्या त्याच्या ऐटीत फिरत होता. मधूनच काठाच्या जवळ येऊन चक्क सर्व माणसांकडे निरखून बघत होता. त्याच्याकडे बघून तर “एका तळ्यात होती” या कवितेतील ओळी आठवल्या. साधारण एका तासानंतर काही फोटो काढून झाल्यावर आम्ही मात्र निघालो कारण थंडी खूप जाणवायला लागली होती.
Photo Credit: Amarendra Ukidwe
कितीही ऊन असो, थंडी असो किंवा बर्फ असो एवढ्या जिद्दीने, सातत्याने अनेक जण अनेक वर्ष पक्षी निरीक्षण करतात किंवा विशिष्ट पक्षाचे फोटो काढण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करत, न थकता, न कंटाळता कसे बसतात याचे मला खूप कौतुक व अप्रूप वाटत आले आहेत. पण आज थोड्या वेळासाठी का होईना मी तो अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि खरंच काहीतरी खूप छान, नवीन गोष्ट केल्याचा आनंद मला मिळाला.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
3.3.2024