सफर Lofoten ची…

प्रत्येकाच्या मनामध्ये अश्या काही जागा, काही गोष्टी असतात की संधी मिळाली की त्या नक्कीच बघायला किंवा करायला आवडतील. थोडक्यात म्हणजे प्रत्येकाची ठराविक अशी “Bucket list” असते. Norway मधे आल्यावर आमच्या देखील Bucket list मध्ये अशी काही ठिकाणी होती. त्यातील एक ठिकाण या आधीच बघून झाले होते ते म्हणजे Flåm! आणखीन एक जागा जी अजूनही बघायची राहिली होती ती म्हणजे Lofoten!
Norway च्या Nordland प्रांतातील एक द्वीपसमूह म्हणजे Lofoten. जरी नॉर्वे मधील हे ठिकाण असले तरी Oslo पासून खूप लांब आहे. त्यामुळे तिथे पोहोचायला आम्हाला पूर्ण दिवसाचा प्रवास करावा लागणार होता. आधी Oslo हून विमानाने एक दीड तास प्रवास करून Bodø या ठिकाणी पोहचायचे आणि Bodø हून एका फेरी बोटीने Lofoten मधील Svolvær मध्ये जायचे होते. प्रवासाची सुरुवात तर छानच झाली. आम्ही Bodø ला पोहोचलो. तिथून Svolvær साठी जी फेरीबोट होती ती संध्याकाळची होती. त्यामुळे आमच्या हातात Bodø फिरायला काही तास होते. सगळ्यात आधी विमानतळावरून बस घेऊन रेल्वे स्टेशनवर गेलो. तेथे असलेल्या लॉकर रूम मध्ये आमचे सर्व सामान ठेवले. आता आम्ही मोकळेपणाने फिरायला तयार झालो. रेल्वे स्टेशनवर तर खूपच शांतता होती. अगदी तुरळक म्हणजे एखाददुसरा माणूसच तिथे दिसत होता. अगदी छोटेसे पण आटोपशीर वाटावे असे हे रेल्वे स्टेशन मला आवडले. इमारतीच्या एका बाजूला असलेला उभा Clock tower व त्याला लागूनच लांब पसरलेली इमारत अशी याची रचना होती. आतमध्ये गेल्यावर एक मोठे काचेचे दालन होते. त्याच्यात काही जुन्या किंवा सध्या वापरात नसलेल्या अशा गोष्टी छान मांडून ठेवल्या होत्या. म्हणजे एखादा जुना कॅमेरा, जुन्या काळातला टेलिफोन, पूर्वी पैसे टाकून वजन करायचे मशीन असायचे ते देखील तिथे होते. ते बघून लहानपणी बसस्टॉप वर असणाऱ्या अशा वजन तपासणाऱ्या मशीनची आठवण आली. अश्या काही गोष्टींचे किती अप्रूप वाटायचे नाही लहानपणी? कित्येक वेळा त्यातील वजन हे चुकीचेच दिसायचे पण तरी त्यात देखील एक मज्जा वाटायची. अश्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत बाकीचे रेल्वे स्टेशन मी बघू लागले. त्या रेल्वे स्टेशनवर जिथून आत आले त्याच समोरील दुसऱ्या दारातून प्लॅटफॉर्मवर जाण्याचा मार्ग होता. मग जरा वेळ उगीचच इकडे तिकडे बघत फोटो काढत वेळ घालवला. आता आम्ही पुढे निघालो. आम्ही सरळ बसचा एक दिवसाचा पास काढला म्हणजे सारखे सारखे तिकीट काढत बसायला नको आणि व्यवस्थित फिरता देखील येईल. आता जरा भूक लागायला लागली होती त्याच्यामुळे आधी जेवून घेतले. मग जेवण झाल्यावर फिरण्याचा उत्साह आणखीनच वाढला होता. आता खऱ्याअर्थी फिरण्याची सुरुवात झाली. Bodø फिरण्यासाठी त्या दिवशी ठराविक वेळेच हातात असल्यामुळे फार लांब न जाता तिथलीच जवळची काही ठिकाणे आम्ही बघू लागलो.


मुख्य गावापासून अगदी हाताच्या अंतरावर असलेले सुंदर निळेशार Fjord, त्याच्या काठावर बांधलेल्या लहान-मोठ्या बोटी, पलीकडच्या तीरावरील घरे, अनेक रंगीत सुंदर इमारती उभ्या ठाकलेल्या आम्हाला दिसल्या. यातील प्रत्येक इमारतीचा रंग वेगळा असला तरीही तितकाच शोभूनही दिसत होता. Bodø मध्ये आल्यापासून एक दोन जणांकडून ऐकले होते की, इथले वाचनालय हे खूप प्रसिद्ध आहे आणि नक्कीच बघण्यासारखे आहे. माझ्या मनामध्ये त्याबद्दल जरा उत्सुकता होती म्हणून एक धावती भेट त्या वाचनालयाला दिली. 2014 मध्ये बांधलेल्या “Stormen”(the storm) या सांस्कृतिक इमारतीमध्ये हे वाचनालय आहे. वाचनालय होते नक्कीच छान, प्रशस्त, अगदी स्वच्छ! निरनिराळ्या विभागांमध्ये असलेली असंख्य पुस्तके रचून ठेवली होती. लहान मुलांसाठी अनेक उपक्रम राबविलेले दिसत होते. कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कल्पनांमध्ये काढलेली चित्रे अडकवलेली दिसत होती. पण याआधी मी Oslo मधील मुख्य वाचनालय देखील बघितले आहे. त्याचमुळे असेल कदाचित या वाचनालयात त्यापेक्षा काही वेगळेपण मला जाणवले नाही आणि अजून एक कारण म्हणजे वेळ कमी असल्याने घाईघाईत बघितले. पण जर कोणी अशा मोठ्या वाचनालयाला जर पहिल्यांदाच आणि जरा वेळ काढून भेट देत असेल तर त्याला नक्कीच सुखद अनुभव मिळेल. वाचनालयाव्यतिरिक्त या इमारतीमध्ये Theatre आणि Concert hall देखील आहे. आता फेरी बोटीने Svolvær ला जायच्या आधी परत रेल्वे स्टेशनवर सामान घेण्यासाठी आम्ही निघालो. वाटेत एक छान Souvenir shop होते. दुकानाच्या बाहेर (कापसाने भरलेल्या) एका मोठ्या रेनडियर ला विणलेले स्वेटर घालून ठेवले होते. त्या जवळ हातमाग ठेवला होता. हातमागावर विणकाम केलेले दिसत होते. दुकानाच्या बाहेरील आकर्षक सजावट व फुलांची केलेली रंगसंगती बघून त्या दुकानात जाण्याचा मोह आम्हाला कुणालाच आवरता आला नाही. ते बघून झाल्यावर आमचे सर्व सामान, रात्रीच्या जेवणासाठी काही व्यवस्था असे सर्व घेऊन आम्ही Svolvær च्या बोटीमध्ये बसलो.


फेरीबोट खूपच आरामशीर होती. दोन्ही बाजूच्या खिडक्यांपाशी असलेल्या टेबल-खुर्च्या व मध्यभागी ओळीने ठेवलेल्या खुर्च्या अशी त्याची रचना होती. आत गेल्या गेल्या सर्वांचे सामान ठेवण्यासाठी एक वेगळा मोठा कक्ष होता. जिथे फळ्या एकमेकांवर रचल्या होत्या. बोट सुटल्यावर हळूहळू बोटीने वेग पकडला. पाण्याचे तरंग दिसू लागले. ऊन आले की पाण्याचा रंग निळाशार दिसे व ढग आले की पाण्याचा रंग करडा दिसू लागे. हे बघून क्रोएशियातील Plitvice National park मध्ये बघितलेल्या तलावांची आठवण आली. वाटेतील एकेक डोंगर, घरे मागे सारून आमची बोट दिमाखात पुढे जात होती. वरच्या बाजूला असलेल्या deck वर जाऊन फोटो काढावे असा विचार केला पण अतिप्रचंड वारा व थंडी यामुळे आम्ही फार काळ तिथे टिकू नाही शकलो. तरी प्रयत्नपूर्वक 20-25 मिनिटे तरी तिथे काढली. सर्व बाजूंनी असणाऱ्या नयनरम्य नजाऱ्याने सर्वजणच चकीत होत होते. मध्ये मध्ये काही ठिकाणी बोट थांबत होती. त्यावेळेस प्रवासांची ये-जा चालू होती. काही लहान नौका शेजारून जाता येताना दिसत होत्या. काठावर असलेल्या जंगलातून मधूनच एखादा पक्षांचा थवा उडे. Fjord मधील पाणी तर इतके स्वच्छ होते की, कधी जमीन संपून पाणी सुरू होई आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसू लाग हेच कळत नव्हते. अगदी एखाद्या चित्रात रेखाटावा तसाच सर्वत्र देखावा होता. कधी किनाऱ्यावर एक एक झाड वेगवेगळे दिसे तर कधी झाडांच्या सर्व आकृत्या एकरूप होऊन त्याचे रूपांतर जंगलात झालेले दिसून येई. सर्व विचार सोडून द्यावे व निसर्गाशी एकरूप होऊन शांतपणे जो देखावा समोर येईल तो बघत बसावे असाच सर्व नजराणा होता. Svolvær मध्ये आत शिरतानाच एक मोठा पुतळा दिसला. “Fiskerkona” म्हणजे “Fisherman’s Wife” चा तो पुतळा होता. खोल समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या नवऱ्याची वाट पाहत उभी असलेली एक बाई अश्या अर्थाचा हा पुतळा आहे. कधी शांत, तर कधी खवळलेला असे समुद्राचे रूप सतत बदलत असते आणि अश्या समुद्रात जाऊन, स्वतःच्या आयुष्याशी खेळून मासेमारी करणे म्हणजे किती अवघड आहे. ह्या विचाराने आणि वाटणाऱ्या काळजीने स्वतः समुद्रात उभी राहून नवऱ्याची वाट पाहतानाचे त्या बाईच्या चेहऱ्यावरील भाव शिल्पकाराने अगदी अचूक टिपले आहेत.


रात्री 9.30 वाजता आम्ही Svolvær मध्ये पोहोचलो. बंदरावरून चालत आम्ही आमच्या अपार्टमेंटच्या दिशेने जाऊ लागलो. त्यादिवशी हवा छान होती. रात्रीचे 9.30 वाजले असून देखील सर्वत्र उजेड होता. वाटेतील कॅफे, रेस्टॉरंट भरलेली होती. सर्वजण आरामात बसून उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत होते. Norway मध्ये मागच्या वर्षी सारखाच या वर्षी देखील खूप पाऊस आहे. त्यामुळे मधेच एखादा दिवस जरी उन्हाचा मिळाला तरी लगेच सगळीकडे आनंदोत्सव असल्यासारखाच वाटतो. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून बाहेर जायचे होते. म्हणून फार वेळ बाहेर न फिरता लगेच झोपायला गेलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आमची बस सुटली. पूर्ण दिवसाची बस टूर त्यादिवशी घेतली होती. Svolvær मधील लहान लहान रस्त्यांवरून बस धावू लागली. Northern Norway मधील Islands वर वसलेले हे छोटेसे गाव पूर्वीपासून मासेमारीसाठी नावाजलेले आहे. तसेच हे Trade, administration व Communication चे देखील महत्त्वाचे ठिकाण आहे. तेथे घडणाऱ्या अनेक उत्सवांमधून व प्रदर्शनांमधून देखील इथल्या संस्कृतीचे उत्तम तऱ्हेने दर्शन घडते. बस मधून जाताना हळूहळू पाऊस सुरू झाला होता. पावसात बस मधून फिरताना सुद्धा मज्जा येत होती. या प्रवासात वेगवेगळ्या तऱ्हेची, वेगवेगळ्या धाटणीची तीन-चार लहान लहान गावे बघितली. प्रत्येक ठिकाणचे काहीतरी वैशिष्ट्य होते. Henningsvær म्हणले की जुनी, नवीन लाकडी घरे, त्यामधून जाणारा रस्ता, मध्ये मध्ये ठेवलेले आकर्षक रंगसंगती केलेले मोठे रांजण आठवते. तसेच तेथे एका कॅफे मधील पारंपरिक पद्धतीचे केक व कॉफी याचा घेतलेला आस्वाद हे आठवते. तसेच Nusfjord मधील डोंगराच्या कुशीत धुक्याची चादर पसरून विसावलेल्या अनेक सुंदर लहान मोठ्या नौका, अनेक रंगीबिरंगी घरे आठवतात. मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या या सर्व जागा बघताना निसर्ग, संस्कृती जपत नाविन्याची कास धरत उत्तम तऱ्हेने सांधलेला मेळ दिसला. शेवटी बघितलेल्या समुद्र किनाऱ्यावरून तर सुंदर प्रकारे Panoramic view बघण्याचा आनंद मिळाला. प्रत्येक ठिकाणाहून काही गोड आठवणी व काही खास क्षण गोळा करून आम्ही परत Svolvær मध्ये पोहचलो. आता इथे मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी येऊन इथला प्रसिद्ध Smoked Salmon खाल्ला नाही तर काय मजा? त्यामुळे त्या दिवशी रात्री मुद्दामून ठरवून आम्ही आमच्या अपार्टमेंटजवळ असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला.


तिसऱ्या दिवशी जरा आराम होता. एक तर हवा ढगाळ होती. त्यामुळे खूप लवकर बाहेर न पडता जरा आरामातच आवरले. शिवाय त्या दिवशी रात्री आठ नंतर आमची एका बोटीतून चक्कर होणार होती. सकाळी आवरून, खाऊन, पिऊन झाल्यावर आम्ही निघालो. सुरुवातीला तिथला जवळपासचा परिसर फिरायला सुरू केले. रविवार असल्याकारणाने सर्वत्र शांतता होती. काही दुकाने नुकतीच उघडत होती. काही वेळाने वाऱ्याचा खूपच त्रास होऊ लागल्याने पटकन एका Souvenir shop मध्ये घुसलो. प्रथेप्रमाणेच इतर ठिकाणी असतात तशाच बहुतांश वस्तू इथे दिसत होत्या. काही गोष्टी जरा स्वस्त वाटल्या. हळूहळू दुकान पर्यटकांनी भरू लागले. दुकान बघून झाल्यावर बाहेर पडून मग एक रस्ता पकडून आम्ही चालू लागलो. डोंगराच्या कुशीतच हे टुमदार गाव असल्यामुळे जाता जाता कित्येक डोंगररांगा दिसू लागल्या. मग फिरून दुपारी परत रूमवर येऊन जेवण केले आणि विश्रांती घेतली. संध्याकाळी सात नंतर बाहेर पडलो. आमची बोट आधीपासूनच बंदरावर लागली होती. बोटीत बसल्यावर सर्वप्रथम सर्वांना गरजेच्या व घ्यावयाच्या सूचना दिला गेल्या. आठ नंतर बोट सुरू झाली. पहिली दहा पंधरा मिनिटे बोट सुरळीत गेल्यानंतर प्रचंड लाटा उफाळू लागल्या व बोटीवर येऊन धडकू लागल्या. त्यांचा जोर इतका प्रचंड होता की बोटीतील आम्हाला सर्वांना नीट उभे देखील राहता येईना. त्यामुळे आहे त्या जागेवर बसून सर्वजण लाटांचा जोर कमी होण्याची वाट पाहू लागले. साधारणपणे 20-25 मिनिटानंतर बोट सुरळीत चालू लागली. आधी आम्ही वरच्या बाजूला असणाऱ्या खुर्च्यांवर बसलो होतो पण लाटांमुळे बोट हालून त्रास व्हायला लागला. त्यामुळे आम्ही खाली येऊन बसलो तिथे जरा सुसह्य वाटत होते. आता आजूबाजूला दिसणाऱ्या निसर्ग, पाणी या सर्वांचा आम्हाला आनंद घेता येऊ लागला.
कुठेतरी कोपऱ्यात एखादे टुमदार घर दिसे. तशी घरे बघून तर मला कायम आश्चर्यच वाटते की, अशी एकटी माणसे कशी राहतात? घराभोवती असलेले पक्षी, प्राणी, अथांग पसरलेले Fjord, डोंगरदऱ्या यांच्या साथीने राहण्याचा अनुभव नक्की कसा असेल? काही दिवसांसाठीच असेल तर ठीक. पण कायम इथली माणसे अशी राहू शकत असतील का? डोंगरांमधून वाहत असलेले धबधबे, पांढरे गुळगुळीत दगड, काही दगडांवर उगवलेल्या वनस्पती, झाडे हे सर्वच म्हणजे डोळ्यांसाठी एक सोहळाच जणू! मला इथली अजून एक गंमत वाटते ती म्हणजे, एकीकडे बघितले तर जाता जाता वाटेतील दिसणारा एक साधा दगड देखील लक्षवेधी ठरवा, तर दुसरीकडे अथांग, अमर्यादित पसरलेल्या डोंगरांमुळे असे कित्येक क्षण आनंददायी ठरावेत. कितीही भरभरून कौतुक केले तरी शब्द कमी पडतील असाच हा देश! बरं, फक्त माझेच हे असे होते असे नाही बर का! माझ्या ओळखीचे, नात्यातले कित्येक जण या दोन वर्षात नॉर्वेमध्ये फिरायला येऊन गेले. आलेल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच स्थान या देशाने निर्माण केले आहे हे मात्र नक्की.


जशी जशी बोट पुढे जात होती तसेच आजूबाजूचा देखावा अजूनच फुलत होता. काही वेळानंतर एका Crew member नी तेथील आजूबाजूची थोडीफार माहिती देण्यास सुरुवात केली. त्या त्या भागातील पक्षी, प्राणी, पाण्यातील काही जीव, वनस्पती या सर्वच गोष्टींची माहिती ती मुलगी देत होती. काही भागातील रहिवासी, त्यांचा इतिहास, त्यांची राहण्याची पद्धत याबद्दल देखील अगदी सफाईदारपणे माहिती पुरवत सर्वांचे मनोरंजन करत होती. white-tailed eagle चे देखील दर्शन या प्रवासात घडले. एके ठिकाणी उंच उभ्या ठाकलेल्या दोन डोंगरांमधून आमची बोट शांतपणे जात असतानाचा अनुभव तर फारच विलक्षण होता. डोंगराच्या अगदी जवळ जाऊन तो डोंगर न्याहाळताना फारच छान वाटत होते. नजर जाईल तिथे फक्त निसर्गच निसर्ग! हे बघून निसर्गापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव प्रकर्षाने झाली. हे सर्व बघून बोट आता परतीच्या मार्गाला लागली. परत येताना देखील सर्व नव्याने बघत आहे असेच वाटत होते. वाटेत परत एकदा Vestfjorden च्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या बाईचा पुतळा दिसला. त्या दिवशी अगदी “Midnight Sun नाही तरी रात्री 11.30 वाजताचा सूर्य बघून परत रुम वर येऊन परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. इथे येऊन गाडी भाड्याने घेऊन देखील फिरण्याची मज्जा काही वेगळीच आहे. हातात गाडी असेल तर अनेक जागी तुम्ही लवकर आणि सोप्या पद्धतीने पोहचू शकता. Whale watching, Kayak, Sea Eagle Safari, Rib Safari, hiking अश्या अनेक activities चा देखील आनंद घेऊ शकता. हे सर्व आम्हाला करता आले नाही पण निदान lofoten या ठिकाणी पोहचू शकलो आणि थोडेतरी बघू शकलो याचे समाधान वाटते.
परत येताना अगदी पहिल्या दिवशी केला तसाच पूर्ण दिवसाचा प्रवास होता. तो करून आम्ही शेवटी एकदाचे Oslo च्या विमानात बसलो. पूर्ण प्रवासाचे अनेक सुंदर क्षण डोळ्यासमोरून जात होते. नवीन ठिकाण, नवीन लेख, नवीन अनुभव हे सर्व पाहण्यासाठी, लिहण्यासाठी, शिकण्यासाठी आता पुढचे कोणते ठिकाण निवडायचे? या विचारात असतानाच आमच्या विमानाने Oslo च्या दिशेने उड्डाण केले.

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
15-7-2024

1

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links