एक कोपरा घरातला आणि मनातला…

आपल्यापैकी बहुतांश लोकांना आवडीचा, जवळचा वाटेल असाच मुळी हा विषय आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात जो सापडतो, कधी कोणासाठी बालपणीच्या आठवणी घेऊन येतो तर कधी कोणासाठी भविष्यातील स्वप्ने…कोणासाठी कलात्मकता तर कोणासाठी शांतता…ज्याच्याशी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावभावना जोडल्या गेलेल्या असतात. कधीतरी खूप दमल्यावर, आपल्या यशाच्या किंवा अपयशाच्या वेळी, कधीकधी खूप आनंदाच्या प्रसंगी किंवा काही वेळेस अगदी दुःखाच्या प्रसंगीसुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबरच आपली सोबत करणारी ही एक आवडीची/ जिव्हाळ्याची जागा असते ती म्हणजे आपल्याच घरातील एक कोपरा…

एक कोपरा… जो आपल्या प्रत्येक वाटचालीचा साक्षीदार असतो. घराच्या चार भिंतींमध्ये आपली एक हक्काची जागा बनतो आणि कळत- नकळतपणे रोज कमीतकमी एकदा तरी आपण तिथे वळतो आणि मग आपलाच आपल्याशी संवाद चालू होतो. जिथे शब्द संपतात आणि शांतता देखील खूप काही बोलून जाते. 

तिथे बसल्यावर कधीतरी खिडकी बाहेर नजर जाताच निरनिराळ्या ऋतूनुसार, निरनिराळ्या वेळेनुसार, प्रसंगानुसार नानाविध गोष्टी नजरेस पडतात. कधी कधी मनाला चटके देणारी दाहकता, तर कधी गच्च भरून आलेल्या अवस्थेनंतर धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर परत लख्ख झालेले निरभ्र आकाश, गुलाबी थंडीची तर एक वेगळीच मजा असते, नाही का? हे असे ऋतूंचे खेळ चालू असताना आपल्या मनाचे चक्रदेखील अव्याहतपणे चालूच असते. जसे एकामागून एक विचार आपल्या मनात उमटतात. त्यातील काही विचार मनातच घर करून राहतात तर काही विरूनदेखील जातात. 

कधीतरी हातात एखादे पुस्तक आणि कॉफीचा मग घेऊन प्रत्येक घोटाचा आस्वाद घेत तिथे त्या कोपऱ्यात शांत बसून राहावे असे वाटते. कधीतरी बाहेरील बहरलेल्या बागेत एक सुंदर फुलपाखरू जणू काही हितगूज करण्यासाठी फुलावर येऊन बसलेले असताना त्याकडे बघतच बसावे असे वाटते. पावसाच्या सरी मातीत मिसळताना चहूबाजूंना पसरलेला मातीचा दरवळ माझ्या त्या कोपऱ्यात देखील डोकावून जातो. बाहेरचा सगळा कोलाहल एकीकडे आणि मी व माझा कोपरा एकीकडे असेच मला दरवेळी वाटते. 

त्या कोपऱ्यातल्या भिंती खूप काही सजवलेल्या नटवलेल्या असतात असे काही नाही. सकाळची कोवळी किरणे, एखादी वाऱ्याची छोटीशी झुळूक, फुलाचा मंद दरवळ किंवा हवेतील गारवा आणि रात्रीचा चंदेरी प्रकाश या सारख्या अनेक गोष्टी येतात आणि माझा कोपरा आपोआप सजवून जातात. 

कधीतरी एखाद्या क्षणी काहीच करू नये आणि त्या कोपऱ्यात फक्त शांत बसून बाहेर जे घडत आहे ते बघत बसावे असेच वाटते. असे असताना कधीतरी अचानक एक कल्पना मनात येते आणि मनातच घोळत राहते. इतकी की ती आपल्याला स्वस्थ बसूच देत नाही. 

आणि मग असे काहीतरी सुचते की जे आपोआप कागदावर उमटत जाते आणि अशा एखाद्या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासमोर येते…

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे. 

आठवणींचा खजिना 

21

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links