सध्या नॉर्वेमध्ये उन्हाळा संपून Autumn सुरू झाला आहे. त्यामुळे रोजच निसर्गामध्ये बदल दिसायला लागले आहेत. दिवस लहान होत आहे. झाडांमध्ये सुद्धा बदल होत आहेत. काही झाडांची पाने पिवळी तर काही लाल असे रंग दिसायला लागले आहेत.
रोज संध्याकाळी चालायला जाताना मला झाडांची नवीन रंगछटा पाहायला मिळते व मन अगदी उत्साही होते. आज पण बाहेर जाताना ढग खूप भरून आले होते. चालून झाल्यावर आम्ही एका दुकानामध्ये शिरलो. दुकानातून बाहेर पडल्यावर पाऊस सुरू झाला होता म्हणून छत्री उघडली आणि समोर पाहिले तर सुंदर इंद्रधनुष्याची कमान आम्हाला दिसली. आणि अजून नीट पाहिल्यावर आम्हाला दोन कमानी दिसल्या. ते इतके सुंदर दृश्य होते की आम्ही दोघे कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत उभे होतो. गंमत म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग इतके स्पष्ट दिसत होते आणि खूप वेळ तितकेच प्रखर राहिले होते, हे मी प्रथमच पाहिले.
रस्त्याच्या एका बाजूला ऊन, दुसऱ्या बाजूला पाऊस, काही झाडांवर पडलेले ऊन आणि वर असलेल्या इंद्रधनुष्याच्या कमानी हे सारे बघून खूप छान वाटले. तेवढ्यात ढगांचा गडगडाट झाला, तर मला वाटले की जणू काही नॉर्वेची निसर्गदेवता मला सांगत आहे – ही तर ही तर फक्त सुरुवात आहे, अजूनही खूप सृष्टी सौंदर्य बघायचे बाकी आहे. आम्ही तो क्षण फोटो आणि व्हिडिओ काढून टिपण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष बघण्याचा जो अनुभव होता त्याची सर नाही येऊ शकली.
14.9.2022