नॉर्वे मध्ये आल्यापासून इथल्या लोकांचे निसर्गावर असलेले प्रेम, निसर्ग जपण्यासाठी केलेले प्रयत्न हे मी बऱ्याचदा अनुभवले आहे. काल पाहिलेला उत्सव हा त्यातीलच एक भाग आहे, असे मला वाटते. या उत्सवाचे नाव आहे Elvelangs i Fakkellys.
(Autumn) शरद ऋतूत दरवर्षी हा उत्सव होतो. त्यामुळे प्रकाश आणि अंधार यामुळे निसर्गात होणाऱ्या बदलाची ओळख होते. या उत्सवाची सुरुवात 2000 मध्ये झाली. त्या उत्सवाचा मूळ हेतू हाच असतो की आपले निसर्गाशी असलेले नाते जास्ती दृढ करणे. म्हणूनच रात्री मेणबत्ती आणि पणतीच्या प्रकाशात नदीकिनाऱ्यावरून चालत जाऊन, त्याचबरोबर विविध देशातील व प्रांतातील लोककलेला, संस्कृतीला पाठिंबा देऊन हा उत्सव साजरा करतात. काल हा उत्सव दोन वर्षांनी झाला त्यामुळे सर्व जण खूप उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसत होते.
रात्री आठ वाजता उत्सवाची सुरुवात झाली. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याचे विभाजन केले होते. आम्ही गेलो तिथे सुरुवातीला Fire show, Juggling, Dance असे प्रकार एकापाठोपाठ एक असे चालू होते. ते बघून थोडे पुढे चालत गेलो. रस्त्याच्या कडेला लावलेल्या पणत्या, मेणबत्त्या, झाडांवर विविध आकारात व रंगात लावलेले दिवे तसेच निरनिराळ्या घरांवर केलेली रोषणाई हे बघत आम्ही चालत पुढे जात होतो. पुढे गेल्यावर आम्हाला एक गाण्याचा ग्रुप दिसला तो पारंपारिक गीते सादर करत होता. ती सर्व गाणी Norwegian मधून असल्याने आम्हाला काही समजले नाही पण त्यांचे सादरीकरण एवढे छान होते त्यामुळे आम्हाला ऐकताना खूप छान वाटत होते. नंतर दुसऱ्या ठिकाणी नदीच्या पात्रात एका मोठ्या कापडावर वेगवेगळी चित्रे काढली होती. मग आणखीन थोडे पुढे गेल्यानंतर एका उंच इमारतीवर एक Slide show चालू असलेला आम्ही पाहिला. अंधारामध्ये ते दृश्य खूप सुंदर दिसत होते. इमारत खूप उंच असल्याने बऱ्यापैकी लांबून तो Slide show दिसत होता त्यामुळे प्रत्येक जण तिथे आकर्षित होत होता. नंतर पुढे एक माणूस Carillon वाजवत होता. Carillon म्हणजे एका मोठ्या काचेच्या पेटीत लहान, मोठ्या आकारातील घंटा ठेवल्या असतात आणि दुसऱ्या बाजूला पियानो सारखी पण मोठी व लाकडी बटणे असतात. हाताने आणि पायाने हे वाद्य वाजवावे लागते. तो माणूस इतके छान सादरीकरण करत होता व लोकांना येथे खिळवून ठेवत होता. हे सर्व बघून आम्ही परत घरी आलो. घरी येताना पण काहीतरी नवीन आणि छान बघितल्याचे समाधान आम्हाला वाटत होते.
खरंतर काल दिवसभर हवा ढगाळ होती. दिवसभर ऊन नव्हते त्यामुळे जरा कंटाळवाणे झाले होते. पण हा उत्सव बघताना, नदी व आजूबाजूचा परिसर पाहत चालताना कंटाळा जाऊन मनात उत्साह कधी निर्माण झाला ते माझे मलाच कळले नाही.