कहाणी GTD नॉर्वे ची

नॉर्वे मध्ये आल्यावर साधारणपणे दोन-तीन महिन्यांनी WhatsApp वर एक मेसेज वाचला. तो मेसेज होता “कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक” तर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचा. आम्ही तो मेसेज वाचला आणि आम्हाला तो उपक्रम आवडला. आमच्या असे लक्षात आले की नॉर्वे मध्ये हा उपक्रम अजून चालू झालेली नाहीये. मग अमरेंद्र ने आधी विनायक रानडे सरांना संपर्क केला. त्यावेळेस त्यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. आम्ही लगेच या मध्ये सहभागी व्हायचे ठरवले व असा “GTD नॉर्वे” चा प्रवास चालू झाला.

GTD म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी! त्याविषयी थोडक्यात माहिती अशी की दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची 25 पुस्तकांची एक पेटी असते, ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतात. सहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीत जास्त प्रकार जसे कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन. थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा वाचनासाठी उपलब्ध होते. ग्रंथ संपदा वाचनासाठी विनामुल्य असते. एका वाचक कुटुंबाकडे प्रत्येक ग्रंथ पेटी 3 महिन्यांसाठी असते. प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते. दर 3 महिन्यांनी ग्रंथ पेटी आपापसात बदलली जाते.

सुरुवातीला अगदी एक-दोन सभासद झाले असे करत करत दहा सभासद जमा झाले. अधून मधून सर्व सभासदांबरोबर phone, message वर चर्चा सुरू झाली की पुस्तकांच्या पेट्या नॉर्वेमध्ये कशा आणायच्या. बरेच दिवस वेगवेगळे पर्याय व बाकी सर्व माहिती काढून, तपासून बघेपर्यंत विनायक रानडे सरांनी सर्वांना सांगितले की सर्व पेट्या पाठवण्यासाठी तयार करून ठेवल्या आहेत.

आता त्या पेट्यांचा नॉर्वे च्या दिशेने प्रवास सुरू झाला. सर्व सभासद आतुरतेने पेट्यांची वाट पाहू लागले. साधारणपणे पोस्टा नी पाठवल्यावर आठ-दहा दिवसात दोन पेट्या नॉर्वेमध्ये पोहोचल्या व काल संध्याकाळी त्या आमच्या घरी पोहोचल्या. पेट्या आल्यानंतर उत्सुकतेने आम्ही लगेच त्या उघडून बघितल्या. त्यातील पुस्तकांचे क्रम, नाव, नंबर असलेली यादी हे इतक्या व्यवस्थितपणे नियोजन पूर्वक आहे. त्यामुळे प्रत्येक पेटीची देवाण घेवाण करणे अगदी सोपे जाईल. जसे सरांनी सांगितले होते तशी वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या लेखकांची दर्जेदार पुस्तके एकत्रित स्वरूपात आम्हाला दिसली. हा उपक्रम नोर्वेमध्ये अगदी योग्य दिवसांमध्ये चालू झाला आहे असे मला वाटते कारण थंडी, अंधार या वातावरणात घरातच बसून राहावे लागते. आता सोबतीला “मराठी पुस्तके” पण आहेत त्यामुळे आता एकटेपणा वाटणार नाही.

याआधी पण इथल्या वाचनालयामधून इंग्रजी पुस्तके आणली होती पण मराठी साहित्याच्या वाचनाने जे समाधान आणि जो आनंद मिळतो तो आता आम्हाला मिळणार आहे. शिवाय एक नाही दोन नाही तब्बल २५ पुस्तके एका पेटीत उपलब्ध असल्यामुळे खूप मज्जा येणार आहे.

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या “मराठी” माणसाला दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, तसेच वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विनायक रानडे सर आणि त्यांचे सहकारी जे प्रयत्न करत आहेत ते खरंच कौतुक कौतुकास्पद आहे. विनायक सर ह्या उपक्रमासाठी खूप तळमळीने काम करतात. त्यांच्याबरोबर बोलून अमरेंद्रला प्रेरणा मिळाली. वाचनसंस्कृतीला पुढे नेणाऱ्या ह्या कार्यात विनायक सर अगदी निस्वार्थी भावनेने काम करतात. रात्री उशिरा फोन झाला तरी “आत्ता फक्त रात्रीचे 11च होतायत” म्हणून उत्साहाने बोलू लागतात. कायम सकारात्मक आणि आशादायी असणाऱ्या विनायक सरांकडून खूप शिकण्यासारखे आहे. आता आम्ही पण या उपक्रमाचा एक भाग झालो आहोत याचा मला खूप आनंद वाटत आहे.

30.11.2022

1

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links