महाराष्ट्र मंडळ नॉर्वे तर्फे काल एक खूप छान उपक्रम झाला. त्यात इथल्या एका नॉर्वेजियन वृद्धाश्रमात जाऊन त्या सर्वांबरोबर थोडा वेळ घालवून आम्हाला एक गीतमाला सादर करायची संधी मिळाली.
मागच्या आठवड्यात जेव्हा मला एका मैत्रिणीचा फोन आला व तिने विचारले की असा कार्यक्रम आपण करणार आहोत व त्यासाठी तुम्ही काही गाणं सादर करू शकाल का? तेव्हा मी हो म्हणून सांगितले खरे पण मनात थोडी शंका होती आणि उत्सुकता होती की आपली भाषा वेगळी आहे त्यामुळे जे आम्ही सादर करणार आहोत ते त्यांना आवडेल का? ते ऐकतील का? म्हणून आम्ही कमीत कमी अगदी पाच ते सहा मिनटाची एक गीतमाला (जी आम्ही दिवाळीच्या कार्यक्रमात पण सादर केलेली) सादर करण्याचे ठरवले.
काल संध्याकाळी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. एका जेवणाच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही थांबलो होतो. एक एक करून हळूहळू सर्व ज्येष्ठ त्या हॉलमध्ये येऊ लागले. आल्या आल्या सर्वजण अगदी हसून आनंदाने आमचे स्वागत करत होते. सुरुवातीला जेवणाचा कार्यक्रम झाला. जेवणासाठी खास करून भारतीय पदार्थ होते ते त्यांनी आनंदाने खाऊन बघितले. आम्हाला तर खूप आश्चर्य वाटले कारण हे सर्वजण साधारणपणे 75 ते 80 वयाचे वाटत होते. या वयाला नवीन पदार्थ खास करून त्यांनी कदाचित कधी खाल्ले पण नसतील असे पदार्थ खाऊन बघणे हे खूप मोठी गोष्ट आहे. मला खास करून सांगावेसे वाटते की या सर्वांसाठी त्यांचे पथ्य, त्यांचा आहार याविषयी चौकशी Marathi Mandal Norge, Oslo नी केली होती आणि त्या दृष्टीनेच पदार्थ ठरवले होते.
जेवण झाल्यावर आम्ही गाण्याचे सादरीकरण केले. मी गाणे म्हणले, अमरेंद्रनी बासरी वाजवली व तबल्याच्या साथीला अमित मुळे हे होते. त्या सर्वांनी गाणे खूप मनापासून व आनंद घेत ऐकले. आम्ही जी गाणी म्हणली ती भाषा त्यांना समजत नव्हती. गाणे ऐकून ते काय म्हणत होते ते मला व अमरेंद्रला समजत नव्हते. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांचा उत्साह हे खूप काही सांगून गेला आणि त्यांनी एवढे मनापासून ऐकून घेतले त्यामुळे आम्हाला पण आनंद झाला. गाण्याचे सादरीकरण झाल्यावर लहान मुला-मुलींनी स्वतः बनवलेली Greeting Cards त्या सर्वांना दिली. ती पण सर्व कार्डस त्यांनी अगदी आनंदानी बघितली. नंतर एका Norwegian गाण्यावर 2 लहान मुलींनी एक छान नृत्य सादर केले.
आमचे दोन तास कसे गेले ते आमचे आम्हालाच कळले नाही. असे म्हणतात ना की संगीताला भाषेची गरज नसते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही काल घेतला आणि महाराष्ट्र मंडळाने Marathi MandalNorge आम्हाला ही संधी दिली त्यामुळे आम्हाला एक खूप छान अनुभव व एक वेगळाच आनंद मिळाला.
5-12-2022