आत्तापर्यंत मी लिहिलेली प्रवास वर्णने तुम्ही वाचलेली आहेतच. पण नवीन वर्षी अजून काहीतरी वेगळे लिहावे असे वाटले पण काय लिहायचे हे नक्की समजत नव्हते. वही आणि पेन घेऊन बसले खरी, पण वाटले की उगाच वेगळं काहीतरी लिहिण्याचा अट्टाहास तर मी करत नाहीये ना? प्रवासवर्णन लिहायला थोडाफार जमलं मग उगाचच घाई तर होत नाहीये ना? किंवा अजून काही महिन्यांनी, काही वर्षांनी प्रयत्न करावा का? पण जसा पहिला प्रयत्न केला तसाच हा देखील करून बघूया असे वाटले.
हे सर्व लिहिल्यावर एकदम वाटले की Facebook Page ला “आठवणींचा खजिना” हे नाव दिले आहे त्याविषयी काहीतरी लिहू. हे लिहीत असताना रेडिओवर चालू असलेली गाणी मी ऐकत होते. जुनी गाणी ऐकताना एकदम मला सुचले.
कधीतरी अचानक जुने आवडते गाणे लागल्यावर एखादे ठिकाण, एखादी व्यक्ती किंवा एखादा पूर्ण दिवसच लगेच डोळ्यासमोर येतो. मन लगेच त्या आठवणींमध्ये बुडते. मग त्याबरोबर इतरही अनेक आठवणी एका मोगोमाग एक येऊन जातात. मग असे वाटते की परत ते क्षण जगायला मिळाले तर किती मज्जा येईल नाही? पण नंतर लगेच असे वाटते की आत्ता जे जगत आहे ते पण पुढे आठवणींचा नवीन खजिना तयार करण्यासाठीच की! व मन परत आजचा क्षण आनंदाने जगण्यासाठी धाव घेते.
म्हणूनच कोणीतरी असे म्हणले आहे की, “Yesterday is history, tomorrow is a mystery, but today is a gift. That is why it is called the Present.”
2.1.2023