Oslo Christmas Market

मागच्या आठवड्यात National Theatre च्या जवळ फिरायला गेले असताना तिथे एका ठिकाणी christmas market ची जोरदार तयारी चालू होती. ते पाहिल्यावरच आम्ही ठरवून टाकले की लगेच पुढच्या आठवड्यातच हे बघायला यायचे.

काल संध्याकाळी आम्ही तिथे बघायला गेलो. National Theatre जवळचा भाग पूर्ण दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. झाडांवर, रस्त्यावर, निरनिराळ्या इमारतींवर निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे दिवे लावले होते. कोणी कुटुंबासमवेत, कोणी एकटे, कोणी मित्रमंडळींसोबत फिरायला आले होते. आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. लहान लहान मुले तर मस्तपैकी बागडत इकडे तिकडे फिरत होती. हे सर्व अनुभवत आम्ही जिथे मुख्य मार्केट आहे तिथे जाऊ लागलो. वाटेत खूप दुकाने, हॉटेल्स लागली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने केलेल्या decoration मुळे रस्त्याची शोभा अजूनच वाढत होती.

Oslo चा Assembly hall आहे त्या समोरच्या रिकाम्या जागेत खूप मोठ्या प्रमाणात हे मार्केट आहे. तिथे आत जाण्यासाठी खूप सुंदर कमान उभी केली आहे. पूर्ण कमानीला दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यातून आत जात असताना इतके सुंदर वातावरण होते की प्रत्येक जण फोटो काढून, व्हिडिओ काढून या नाताळनगरीत प्रवेश करत होता. आत गेल्यावर खूप सारी खाण्याची, कपड्यांची, खेळण्यांची अशी दुकाने आम्हाला दिसली. लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ होते. एक मोठा फिरता पाळणा सर्वांसाठी उभा केला होता ज्यात बसून तुम्ही आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघू शकत होता. ‘त्यात बसायचे का?’ हा प्रश्न विचारायची गरजच नव्हती. सर्वांसाठी तो खूपच सुंदर नजराणा होता. प्रत्यक्ष रस्त्यावरून पाहिलेल्या या सर्व जागा वेगळ्या उंचीवरून बघताना जास्ती सुंदर वाटत होत्या. नंतर सर्व दुकाने पाहत फिरत फिरत आम्ही पुढे जाऊ लागलो. खाण्याच्या पदार्थांचा घमघमाट सर्वत्र सुटला होता. मग आम्ही आमचा मोर्चा खाण्याकडे वळवला. एकाच ठिकाणी खाण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे तीन-चार पदार्थ खाल्ले. अशा सर्व ओळीने असलेल्या दुकानांपुढे खाण्यासाठी बसण्याची पण छान सोय होती. मध्यभागी शेकोटी व बाजूंनी गोल आकारात केलेल्या बैठक व्यवस्थेत बसून आम्ही पोटभर खाल्ले. गोड पदार्थांची तर अगदी रेलचेलच होती. वाफळललेले crépes, waffles हे पदार्थ (आम्हाला वाटणाऱ्या) कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आनंद घेत आम्ही खाल्ले. अशी सर्व मज्जा करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो.

आज “बालदिन” आहे त्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते या सर्व christmas market मध्ये फिरताना, दुकाने बघताना आम्हाला पण लहानपणी पाहिलेल्या cartoons मध्ये असलेल्या काल्पनिक गावांमधूनच आपण फिरत आहोत की काय असे वाटू लागले. एकंदरीत इथल्या नाताळ सणाची सुरुवातच इतक्या दणक्यात झाली आहे त्यामुळे पुढच्या एक ते दीड महिन्यात अजून वेगवेगळ्या ठिकाणी फिरून सर्व मजा बघण्याची खूप उत्सुकता आता मनात आहे.

14.11.2022

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links