काही प्रवास असे असतात की जे कायम आठवणीत राहतील. नॉर्वेतील एका सुंदर ठिकाणी जाण्याचा नुकताच योग आला. इथे आल्यापासून बऱ्याच जणांनी सुचवलेले व नॉर्वेत आल्यावर प्रत्येकानी एकदा तरी बघायलाच पाहिजे असे हे ठिकाण म्हणजे Flam! इतकेच नाही पण त्या ठिकाणी जाण्यापर्यंतचा रस्ता पण इतका सृष्टी सौंदर्यांनी भरलेला असेल तर त्या ठिकाणी जाण्याची मज्जा ही काही वेगळीच असते. आता इतकी प्रस्तावना लिहिल्यावर मूळ विषयावर येऊन मी सुरुवात करतेच!
Oslo मधून सकाळी ‘Bergensbanen’ या रेल्वेमधून आम्ही निघालो. रेल्वे स्टेशनवर अगदी वेळेवर पोचल्यामुळे फार वेळ ताटकळत बसावे लागले नाही. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे, नॉर्वे मधील अत्यंत सुंदर निसर्ग, तलाव असलेल्या मार्गावरून ही रेल्वे जाते. Oslo पासून निघाल्यावर साधारणपणे दीड तासांनी घाट सुरू झाला. हळूहळू डोंगर व बोगद्यांमधून वळणे घेत घेत रेल्वे पुढे जात होती. ह्या पूर्ण मार्गावर 180 बोगदे आहेत! त्यावरून नॉर्वेचे landscape हे रेल्वे अथवा रस्त्यांसाठी किती खडतर आहे ते समजते. हळूहळू डोंगरावर व तलावामध्ये अजूनही न वितळलेला बर्फ दिसू लागला. या रेल्वेमध्ये कॅन्टीनही होते. कॅन्टीन मध्ये बसूनही आपल्याला बाहेरचा निसर्ग बघत खाण्यापिण्याचा आनंद घेता येतो. तिथल्या एका कॅन्टीन स्टाफ कडून आम्हाला ह्या रेल्वेबद्दल थोडी माहिती मिळाली.
साधारणपणे 100 वर्षांपूर्वी ही रेल्वे चालू झाली. उन्हाळ्यामध्ये अत्यंत सुंदर दिसणारा हा मार्ग हिवाळ्यामध्ये/ बर्फामध्ये तितकाच कठीण असतो. हिवाळ्यात अति बर्फवृष्टीमुळे वाटेत साठलेला बर्फ बाजूला करावा लागतो, शिवाय काही प्राणी वाट ओलांडताना रेल्वेला धडकतात. अश्या प्रसंगी रेल्वे चालकाला त्या अर्धमेल्या प्राण्यांना मुक्ती देण्यासाठी बंदुक बाळगावी लागते! अश्या कठीण परिस्थितीत देखील प्रवाशांना सेवा देण्याचे काम हे Bergen Bannen चे कर्मचारी करत असतात.
साधारणपणे पाच तासानंतर आम्ही Myrdal ला पोहोचलो. त्याच स्टेशनवरून Flåmsbana ही लहान रेल्वे घेऊन आम्ही निघालो. या वीस किलोमीटर अंतर असलेल्या प्रवासात अनेक वळणे घेत आणि अनेक बोगदे पार करत, उतारावरून रेल्वे जात होती. या एका तासाच्या प्रवासात जणू काही एखाद्या चित्रपटांमधून किंवा एखाद्या स्वप्नातून आपण जात आहोत व आपल्यासमोर एक एक गोष्ट उलगडत आहे असाच भास होत होता. या रेल्वेमध्ये ठिकठिकाणी स्क्रीन बसवले होते व त्यावर पुढे काय दिसणार आहे याविषयी माहिती दिसत होती.
Vatnahalsen, Reinunga अशी स्टेशन्स हळूहळू पार करत रेल्वे Kjosfossen या ठिकाणी आली. आता आमच्यासमोर खूप मोठा, सुंदर धबधबा होता. इथे रेल्वे दहा-पंधरा मिनिटे थांबली. सर्वांना खाली उतरून धबधब्याजवळ जाऊन फोटो काढता येणार होते. आणि एक गंमत म्हणजे, जेव्हा रेल्वे थांबली तेव्हा बाहेरून Viking शैलीतील संगीताचे स्वर ऐकू येऊ लागले आणि अचानकपणे एका डोंगरावरून पुढे येत एका बाईने त्यावर नृत्य सादर करायला सुरुवात केली. हा अनुभव एकदमच अनपेक्षित व मजेशीर होता. रेल्वेच्या दारात उभे राहून पण धबधब्यांचे पाणी अंगावर येत होते व सर्वांना ताजेतवाने करत होते. 20 किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गामध्ये एकूण 20 बोगदे आहेत त्यातील 18 बोगदे हे हातानी खणले आहेत. या मार्गातून वाहणार्या नदीसाठी सुद्धा बोगदे बांधून त्यावरून रेल्वे मार्ग बांधला आहे. हे काम म्हणजे नॉर्वेच्या इतिहासातील एक सर्वोत्तम काम मानले जाते. या वरूनच इथल्या लोकांची जिद्द व लोकांच्या सोयीसाठी केलेले कष्ट दिसून येतात. असे सर्व बघत आता आम्ही Flam ला पोहचलो.
Flåm हे Flåmsdalen valley मधील एक गाव आहे. येथील फिऑर्ड ‘Sognefjorden’ हे नॉर्वे मधील सगळ्यात मोठे व खोल आहे म्हणूनच याला “king of the fjord” म्हणतात. त्यातील एक भाग असलेल्या Aurlandsfjorden च्या बाजूला flam वसले आहे. Aurlandsfjorden हे UNESCO’S famous world heritage list मध्ये असलेले तसेच National Geographic नी Best unspoiled travel destination in the world अश्या प्रकारे गौरवलेले हे fiord बघताना सगळ्याचा विसर पडतो आणि आपण थक्क होऊन फक्त बघत बसतो. या जगातील अत्यंत सुंदर असलेली एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघू शकत आहे याचा आनंद खरंच शब्दामध्ये सांगणे कठीण आहे.
इथे आल्यावर दोन-तीन तास आमच्या हातात होते. तिथे आधी आम्ही मनसोक्त जेवलो. जेवण झाल्यावरती आजूबाजूचा परिसर फिरून बघता बघता कसा वेळ गेला हे कळलंच नाही. आता पुढचा प्रवास फेरी बोटीतून होता. या बोटीतून आम्हाला Gudvangen ला जायचे होते. इथे बोटीमध्ये जाण्यासाठी थोडीशी गर्दी होती. पण आत गेल्यावर प्रशस्त व आरामदायी बैठक व्यवस्था असल्याने गर्दी फारशी जाणवली नाही. हा प्रवास सुध्दा खूप नयनरम्य आहे. Gudvangen मध्ये पोचल्यावर त्यादिवशीचा आमचा प्रवास संपला होता. हॉटेलमध्ये सामान ठेवून थोडावेळ आराम करून आम्ही परत बाहेर निघालो. आमचे हॉटेल म्हणजे एक दुमजली छोटेसे घर होते. घराच्या बाहेर थोडी बसण्यासाठी जागा होती. समोर, मागे, आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त डोंगररांगा, गर्द हिरवी झाडी, असंख्य लहान मोठे धबधबे आणि पक्षांचा किलबिलाट एवढ्याच गोष्टी जाणवत होत्या. या अशा वातावरणामध्ये राहणे म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. तिथूनच जवळ एक जुना लाकडी पूल होता. पुलावरून जात असताना fjords दिसले. आकाशाच्या निळाईवर जमा झालेले पांढरे शुभ्र ढग, fjords मधील स्वच्छ पाणी, पाण्यात ठेवलेले “कयाक” हे सर्व बघत असताना एक सुंदर चित्र काढले आहे असे वाटले. पुलावरून पलीकडे गेल्यावर Viking Village तयार केले होते. आम्ही पोहचलो त्या वेळेत ते बंद झाल्यामुळे बघता आले नाही. तिथेच बाहेर एक दुकान होते. त्या दुकानात अनेक विविध प्रकारच्या वस्तू, खेळणी, लाकडी शोभेच्या वस्तू दिसत होत्या.
दुसर्या दिवशी सकाळी बस मधून निघालो. Voss पर्यंत बसने जाऊन पुढे रेल्वे घेऊन बर्गनला जायचे होते. Voss स्टेशनला जेव्हा आम्ही पोहोचणार होतो त्यानंतर लगेचच दहा मिनिटात रेल्वे सुटणार होती. नेमकी आमची बस उशीरा आली त्यामुळे आम्हाला रेल्वे मिळते की नाही अशी भीती वाटू लागली. पण आम्ही अगदी वेळेत पोचलो, त्यानंतर दोन-तीन मिनिटातच रेल्वे आली व आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. एक-दीड तास प्रवास करून आम्ही Bergen ला पोहचलो.
बर्गन हे नॉर्वेतील एक मोठे शहर असून ते पूर्वी नॉर्वेचे राजधानीचे शहर होते. भोवताली असलेल्या डोंगरांगांमुळे Bergen ला “City of Seven mountains” असे म्हणतात. ही माहिती समजल्यावर मला माझ्या माहेरची -“सप्ततारा सातारा”ची आठवण आल्यावाचून कशी राहील! Bergen हे नाव Bjorgvin व Bergvin वरून पडले. त्याचा अर्थ डोंगर किंवा डोंगरातील कुरण असा होतो. येथे पाहण्यासाठी, फिरण्यासाठी, trekking करण्यासाठी खूप जागा आहेत. वेळेअभावी आम्ही सर्व ठिकाणे नाही पाहू शकलो पण काही महत्त्वाची ठिकाणे बघितली त्यातील पहिले ठिकाण म्हणजे bryggen!
Bryggen येथील एका बाजूला असलेल्या सुंदर जुन्या इमारती बघण्यासाठी जगाच्या प्रत्येक कोपर्यातून पर्यटक येतात. अगदी मध्यवर्ती असलेल्या या रस्त्यावरून जाताना प्रत्येक इमारतीसमोर पाऊले आपोआप थांबतात. पिवळी, केशरी, हिरवी, निळी, लाल अशी विविधरंगी जुनी घरे, घरांचे लाकडी खांब, काही घराशेजारील लहान लहान बोळ व त्यात असलेली दुकाने, हॉटेल्स हे सर्व लक्ष वेधून घेतात. 1702 मध्ये लागलेल्या आगीनंतर इथल्या इमारती परत जुन्या पद्धतीने बांधून उभ्या करण्यात आल्या. इतिहास व वर्तमान याची उत्तम रीतीने सांगड घालत असलेले हे ठिकाण नक्कीच बघण्यासारखे आहे.
येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे Fløyen! इथे जाऊन आल्याशिवाय Bergenचा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही असे म्हणले तरी खोटे ठरणार नाही. समुद्रसपाटीपासून 320 मीटरवर असलेल्या या डोंगरावर जाण्यासाठी funicular होते. अत्यंत तीव्र चढावर बांधलेल्या रेल्वे रुळावरून आम्ही या funicular मधून वरती डोंगरावर गेलो. इथून Bergen शहर दिसत होते. खाली असलेले चर्च, तलाव व तलावातील कारंजे, fiord मध्ये असलेली प्रवासी जहाजे, निरनिराळे रस्ते हे सगळे इतके लहान दिसत होते की एखादी सुंदर लहान शहराची प्रतिकृती बघत आहे असा भास होत होता. इथे डोंगरावर restaurant, cafe, shops असे सगळे होते. लहान मुलांसाठी खेळायला Troll Forest होते. ज्यांना ट्रेकिंग ची आवड आहे त्यांच्या करता ही जागा अगदी योग्य आहे. तिथे Kongle म्हणजे Acorn च्या आकाराची एक खोली बांधली आहे. ज्यामध्ये आपण राहू शकतो व इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. Bergen मधील सर्व ठिकाणे काही पाहता आली नाहीत त्यामुळे परत एखादी ट्रीप करू ह्या विचाराने आम्ही Bergen-Oslo हा परतीचा प्रवास केला.
हा प्रवास आपण आपल्या आवडीनुसार, सोयीनुसार पण ठरवू शकतो. आम्ही Oslo-Myrdal-flam रेल्वे नी केले. पण Myrdal ला उतरून रेल्वे नी खाली न येता zipline करत खाली येऊन नंतर सायकल भाड्याने घेऊन पण आपण flam पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला परत Myrdal ला जायचे असेल तरी flam पासून रेल्वे घेऊ शकता किंवा पुढे Bergen ला जाऊ शकता. शिवाय ट्रेकिंग साठी पण वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेतच. पर्याय कोणताही असो पण एक मात्र नक्की, इथे जाऊन आल्यावर निसर्गाचे एक अद्भुत रूप पाहिल्याचे समाधान खूप दिवस मनात राहतेच.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
24.6.2023
4 responses to “Flam – Bergen”
अतिशय सुंदर प्रवास वर्णन, जणु काही आपण देखील फ्लाम लाजाउन आल्या सारखे वाटते
धन्यवाद
खूपच छान वर्णन 👌 छायाचित्रण पण अप्रतिम 👌👌
धन्यवाद