नॉर्वे माझ्या नजरेतून…

नक्की आठवत नाही पण साधारणपणे पाच-सहा वर्षांपूर्वी ओळखीच्या एकांकडून नॉर्वे ची माहिती ऐकल्यावर तिथले वातावरण, तिथले हवामान याविषयी समजल्यावर थक्क होऊन आम्ही म्हणालो “बापरे नॉर्वे, कुठल्या कुठे आहे ते. कशी काय लोक राहत असतील तिकडे?” तेव्हा आम्हाला अजिबात कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन आमच्याच आयुष्यामध्ये नॉर्वेला जाण्याची संधी येईल.
किती गंमत असते नाही, काही गोष्टी नकळत, काही संधीने तर काही ध्यासाने आपल्या आयुष्यात येतात व त्या स्वीकारून आपण पुढे जात असतो. नॉर्वेची संधी तर आम्ही स्वीकारली पण नॉर्वे मध्ये आलो तेव्हा आमच्यासाठी सर्वच गोष्टी कोऱ्या पाटी सारख्या होत्या. हळूहळू सवयीने आम्ही ती पाटी भरू लागलो. जसे जसे दिवस पुढे जात होते तसे नॉर्वे आम्हाला समजू लागले. मुळात भारतीय असल्यामुळे व इतकी वर्ष तिथेच राहिल्यामुळे नॉर्वे मधल्या पद्धती, नियम हे अंगवळणी पडायला थोडा वेळ लागला. पण इथल्या स्थानिक लोकांच्या मदतीमुळे हा प्रवास खूप सुखकर गेला.
नवीन आलेल्या माणसाला आपलंसं करून कोणताही समज, गैरसमज न करता शक्य तेवढी मदत करण्याचा नॉर्वेजियन लोकांचा स्वभाव हा एक खूप महत्त्वाचा गुण आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही आपल्याला इथल्या लोकांचा मदत करायचा स्वभाव लगेच लक्षात येतो. मला आठवतंय नवीन असताना एकदा आम्ही रस्ता चुकलो. Google map वर पण नीट रस्ता समजत नव्हता. एकांना विचारले तर आमच्याबरोबर काही अंतर चालत येऊन त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. अजून एक म्हणजे आपली एखादी वस्तू रस्त्यात पडली तर नुसतं हाका मारून न दाखवता, ती गोष्ट स्वतः उचलून हातात आणून देणे मग ती वस्तू कोणतीही असली, अगदी चिखलाने माखलेले बुटाचे ग्रिपर्स जरी असले तरी ते उचलून आपल्या हातात देतात. इथले सर्वजण तसे शांत स्वभावाचे. फार कुणाच्या मध्ये न पडता आपण बरे व आपले काम बरे या मताचे! अगदीच ओळखीचे कोणी दिसले की जाता जाता “Hi, Hi” असे ठराविक पद्धतीने म्हणून परत आपापल्या वाटेने जायला मोकळे. असे म्हणतात की नॉर्वे मध्ये रोजच्या जीवनात आचरणात आणायची 10 सूत्रे आहेत. त्याला “Jenteloven” असे म्हणतात. बरं, ही सूत्रे कोणत्या शाळेत शिकवली जातात असे नाही, पण लहानपणापासूनच सर्वांच्या मनात रुजवली जातात व त्याप्रमाणे सर्वजण वागताना दिसतात. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, “आपण इतरांपेक्षा खूप हुशार किंवा वेगळे नाही.” “आपण इतरांपेक्षा महत्त्वाचे नाही.” “कोणालाही कधी कमी लेखू नये किंवा हसू नये.” अश्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवण्यावर भर देतात.
दुसरा महत्वाचा गुण म्हणजे, आहे त्या परिस्थितीत राहून देखील कसे आनंदी राहता येईल याकडे या लोकांचा कल जास्त असतो. हिवाळ्यात fjords (फियोर्ड्स) देखील गोठतात इतकी थंडी असते. पण त्यातूनही मार्ग काढून गोठलेल्या fjords वर Skiing, Skattng करून आनंदी राहत असतात. अगदी लहान लहान मुले पण यात सहभागी होतात. नॉर्वे मध्ये एक म्हण आहे की “हवामान कधी खराब नसते, आपले कपडे त्याला साजेसे नसतात”. म्हणजे निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारणे व पुढे जाणे हा इथे राहणाऱ्या लोकांकडून शिकण्यासारखा एक खूप मोठा गुण आहे असे मला वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी सर्वांचे दुसरे घर कुठेतरी जंगलात किंवा गावाबाहेर असते त्याला इथे “केबिन” म्हणतात. उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये अशा केबिनमध्ये जाऊन कुटुंबाबरोबर वेळ काढायला इथल्या लोकांना खूप आवडते.
हे झाले इथल्या लोकांबद्दल! नॉर्वेच्या निसर्गाबद्दल बोलायचे तर नॉर्वे म्हणजे, “अमर्यादित व अवर्णनीय निसर्ग सौंदर्याने नटलेला श्रीमंत देश” असेच म्हणावे लागेल. नदी, तलावापासून fjords पर्यंत ते रोजच्या रस्त्यापासून डोंगरदर्‍यांपर्यंत असलेली निसर्गदेवता प्रत्येक वेळी वेगळीच भासते. ठिकाण तेच पण उन्हाळ्यात बघितले तर एक रूप दिसते व थंडीत बघितले तर वेगळेच रूप दिसून येते. कितीही वेळा बघितले तरी समाधान काही केल्या होत नाही. इथला निसर्ग सुंदर आहेच पण त्याला जपण्याकरता इथल्या लोकांनी घेतलेली मेहनत हा देखील एक वाखाणण्यासारखा गुण आहे.
तसा विचार केला तर पॅलेस,बागा, जुन्या-नव्या इमारती हे बाकी देशांमध्ये पण सर्व ठिकाणी आहेतच की!!! पण तरीसुद्धा काहीतरी अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे नॉर्वे हा अत्यंत वेगळा व कायम मनात राहील असा आहे. ती गोष्ट काय असा विचार केल्यानंतर मला वाटते की “Fjords” हे इथले वैशिष्ट्य आहे. सुंदर निळेशार पाणी असलेले Fjords, त्याच्या आजूबाजूचा शांत नयनरम्य परिसर व त्याला साजेसे असे सर्व वातावरण याच गोष्टी आलेल्या प्रत्येक नवीन माणसाला आपलेसे करतात.
जसे नॉर्वे म्हणजे “Fjords” तसेच नॉर्वे म्हणजे “Northen Lights!” हे प्रत्यक्ष बघणे हा खूपच अविस्मरणीय अनुभव असतो. इतक्या गोठवणाऱ्या थंडीत देखील उभे राहून “नॉर्दन लाईट” पाहण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचे बळ लागते व इथला निसर्गच आपली इच्छा पूर्ण करण्याकरता ते बळ आपल्याला देतो. त्यामुळेच असेल कदाचित अजून जास्त उत्साहाने आपण इथल्या सर्व गोष्टी पाहू शकतो.
नॉर्वे मध्ये 4 ऋतू असतात ते म्हणजे Winter, Spring, Summer, Autumn. सध्या Summer संपून Autumn चालू झाला आहे. या काळात म्हणजे सप्टेंबर पासून ते नोव्हेंबर पर्यंत निसर्गाने केलेली रंगांची उधळण बघताना व अनुभवताना आपण थक्क होऊन जातो. झाडांच्या पानांचे रंग बदलायला सुरुवात होते. हिरवी, पिवळी, लाल अश्या रंगात दिसणारी झाडे लक्ष वेधून घेतात. मला तर हे सर्व बदल अनुभवायला खूपच आवडते. कितीही फिरले किंवा एक ठिकाण जरी परत बघितले तरी प्रत्येक वेळेस वेगळाच अनुभव येतो व हे सर्व वर्णन करण्यापलीकडे आहे असा प्रत्यय येतो. हवेमध्ये देखील बदल होतात म्हणजे दिवस हळू हळू लहान लहान होत जातात. उन्हाळयात बाहेर सर्वत्र दिसणारा उत्साह कुठेतरी कमी झाला आहे असे भासू लागते. कारण उन्हाळ्यात पहाटे 3.45-4 च्या सुमारास सुर्योदय होतो आणि रात्री 10.45-11 ला सुर्यास्त होतो. आणि थंडी मध्ये सकाळी 9 नंतर सुर्योदय होऊन दुपारी 3 -3.30 ला सुर्यास्त होतो. इथे टोकाची थंडी असते. एकदा का बर्फ पडू लागला की मार्च, एप्रिल पर्यंत खूप बर्फ पडतो व साठतो. आणि त्यावेळेस ऊन अजिबात येत नसल्या कारणाने बर्फ लवकर वितळत नाही. त्यामुळे दरवर्षी सगळीकडचा बर्फ साधारण एप्रिल- मे दरम्यान वितळतो. त्यानंतर वसंत ऋतू नवी पालवी व नवीन चैतन्य घेऊन येतो. याच दरम्यान येतो नोर्वेचा उत्सव म्हणजे “संविधान दिवस”! खूप उत्साहाने आणि दिमाखात सर्वजण हा दिवस साजरा करतात. थंडी मध्ये आलेला कंटाळा, आळस सर्व झटकून येणाऱ्या उन्हाळ्यासाठी सज्ज होण्यासाठी तयारी करू लागतात. असे सगळे छान, सुंदर असेल तरी इथली बेभरवशाची हवा आणि टोकाची थंडी या गोष्टी काही प्रमाणात त्रास देतात. आत्ता ऊन आहे म्हणेपर्यंत पाऊस सुरू होतो. त्यामुळे पावसाच्या तयारीने बाहेर निघेपर्यंत परत ऊन होते. रोज नवीन दिवस तसा रोज नवीन खेळ इथला निसर्ग खेळत असतो. बाहेर जाताना कायम उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणजे बर्फ या तयारीनेच जावे लागते. पण काही असेल तरी जसे मिठाशिवाय जेवण अपूर्ण असते तसेच या देखील सर्व गोष्टींशिवाय नॉर्वे अपूर्णच आहे असे मला वाटते.
आता इथे राहून एक वर्ष होऊन गेले. त्यात काही अडचणी देखील आल्या पण त्यातूनही मार्ग काढत वाटचाल करताना लागणारा खंबीरपणा व चिकाटी हे देखील नॉर्वेनी आम्हाला शिकवले. या एका वर्षात खूप ठिकाणे बघितली, नवीन गोष्टी अनुभवले, इथला निसर्ग, नवीन झालेल्या ओळखी या सगळ्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या व माझ्यातच छान सकारात्मक बदल होत गेले. या पुढेही अजून खूप फिरायचे आहे, शिकायचे आहे, लिहायचे आहे आणि त्यासाठी नॉर्वे हात पसरून सज्ज आहेच.

20

3 responses to “नॉर्वे माझ्या नजरेतून…”

  1. […] नॉर्वे देश फिरायला कसा आहे? किती सुंदर आहे? इथले लोक कसे आहेत? या विषयी आधी बऱ्याच लेखांमध्ये मी उल्लेख केला आहे. त्या एका लेखाची लिंक मी इथे देते.https://athavaninchakhajina.com/?p=1570 […]

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links