एखाद्या दिवशी अनपेक्षितपणे एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण दिसावे व ते ठिकाण एकदमच आवडून मनामध्ये कायमचे कोरले जावे असे आमचे झाले. दुपारनंतर सहज म्हणून बसमधून नुसती एक फेरी मारून येऊ व यावेळेस आपण अजून बघितली नाहीये त्या बाजूला जाऊ असे ठरवले व आम्ही बसमधून निघालो. मला असा बसचा प्रवास पण खूप आवडतो. वाटेत काही ओळखीचे, काही नवीन रस्ते लागतात. वेगवेगळ्या रंगाची, आकाराची घरे मागे टाकत निवांत बस मध्ये बसून उबदार हवेमध्ये प्रवासाचा आनंद घेत जायला मला नेहमीच आवडते. (सर्व बस मध्ये heater असतात त्यामुळे बाहेर कितीही थंडी असली तरी बस मध्ये उबदार वाटते.)
Snarøya नावाच्या बस स्टॉप वर आम्ही उतरलो. थोडा वेळ पुढे चालत जाऊ लागलो. थोडे पुढे गेल्यावर एक fiord दिसले. त्याच्या कडेने एक पायवाट दिसली. पुढे एक वळण होते. आधी आम्हाला वाटले की जिथे वळण आहे तिथे रस्ता संपत आहे. मग जसे पायवाटेने हळूहळू जाऊ लागलो तसा रस्ता पुढे उलगडत गेला व हा आजूबाजूचा परिसर हळूहळू दिसू लागला. त्या दिवशी पूर्ण धुके होते त्यामुळे धुक्यात पूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. अधून मधून बदकांचे थवे पाण्यात उतरताना दिसत होते. समोरच्या काठावर लहानसे एक घर दिसले. पाण्यात होडी बांधून ठेवली होती. होडी हालत असल्यामुळे पाण्याच्या आवाजात होडीचाही आवाज मिसळत होता. आजूबाजूला असलेले मोठे खडक देखील पाण्यामुळे निरनिराळ्या आकाराचे झालेले दिसत होते. अजून काही अंतर पुढे गेल्यावर एक मोठा बाक दिसला. तिथे काही वेळ बसून आम्ही photo काढले.
तसा हा संपूर्ण परिसर शांतच होता. अगदी तुरळक माणसे दिसत होती. त्या परिसरात आजूबाजूला बरीच घरे असूनही एवढी शांतता कशी काय? त्याच्यामुळे आम्हाला जरा नवल वाटले. पण आता इथल्या लोकांचा स्वभाव समजायला लागल्यामुळे लगेच लक्षात आले की “निसर्ग हे आपल्याला मिळालेली देणगी आहे व त्याचा आदर आणि जपणूक करणे” अशा भावनांची सर्व लोकं असल्यामुळे अशा ठिकाणी शांतता असणे उचितच होते! भरभरून फोटो काढून आम्ही परत निघालो. परत येताना fiord मधून आवाज आला म्हणून बघितले तर एक मोठी बोट fiord मधून जाताना अंधुकपणे दिसत होती.
“ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा” या ओळी अक्षरशः जगल्याचा अनुभव घेऊन आम्ही घरी परत आलो पण कधी एकदा त्याविषयी लिहून काढते असे झाले. सुंदर ठिकाण, सुंदर वातावरण अशा गोष्टी जुळून आल्यावर लिखाण करताना सुद्धा आपण सुंदर आठवणी कोरल्याचा आनंद मिळतो हे मात्र नक्की!
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
21.3.2023
3 responses to “Snarøya”
Dear Amarendra / Anuradha, Can I forward your articles to my friends ?
– Arun Aurangabadkar
हो नक्कीच करा 🙂 धन्यवाद काका.
[…] 10. Snarøya – एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण जे पाहताक्षणी आवडावे, अगदी असेच हे ठिकाण. बस मधून उतरल्यावर 5 मिनिटे चालत गेल्यावर लगेच इथल्या निसर्गाचे दर्शन घडते. अथांग पसरलेल्या fjord च्या साथीने एका छोट्याशा पायवाटेने चालत जाताना प्रत्येकजण रममाण होतो. नक्की पहावे असेच हे एक ठिकाण.https://athavaninchakhajina.com/?p=1697 […]