सर्वांच्या आयुष्यात गुरूंचे स्थान विशेष महत्त्वाचे असते. लहानपणापासूनच प्रत्येक वळणावर अनेकजण आपल्या आयुष्यात येतात. त्या प्रत्येक जणांकडून छोट्या मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी शिकत आपण पुढे जात असतो. अनेक अनुभवांची पुंजी (मग ते अनुभव चांगले असो वाईट असो) आपल्या पाठीशी सदैव असतेच. मला वाटते मनुष्यरुपी गुरू व्यतिरिक्त असाच एक मोठा व सदैव आपल्या पाठीशी उभा असणारा गुरु म्हणजे निसर्ग! कारण इथे फिरताना जेव्हा जेव्हा मी निसर्गाच्या जवळ जाते तेव्हा तेव्हा मला खूप सकारात्मक तर वाटतेच पण खूप काही शिकायला देखील मिळते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर नुकतीच Sognsvann या सुंदर ठिकाणी मी जाऊन आले. तशी इथे आधी सुद्धा मी बरेचदा गेले होते पण इथल्या सर्व जागा अशाच आहेत ते कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा अजिबात येत नाही. Oslo च्या उत्तरेस मुख्य गावापासून अगदी 30 ते 40 मिनिट अंतरावर असलेले हे एक सुंदर सरोवर आहे. गाडी व मेट्रोनी जायची सोय असल्यामुळे सर्व वयातील लोकांसाठी अगदी सोयीची अशी जागा आहे. चारी बाजूंनी वेढलेल्या अनेक झाडांच्या मधोमध असलेले सुंदर निळेशार पाणी इतके स्वच्छ असते की पाण्याचा तळ देखील पाहता येईल. हा तलाव पाहता क्षणी आवडूनच जातो. तलावाच्या भोवताली अनेक चालण्याचे मार्ग आहेतच पण सायकलींसाठी मात्र एक वेगळा स्वतंत्र मार्ग आहे. मध्ये मध्ये बसायला अनेक ठिकाणी बाक आहेत.
काल मी मुद्दामून चालण्यासाठी म्हणून तिथे गेले. त्याआधी थोडे थोडे चालून परत आले होते पण पूर्ण सरोवराला फेरी मारली नव्हती. मग काल ठरवून तिकडे गेले. चालताना पूर्ण वेळ नजर इथल्या निसर्गावरून हटतच नव्हती. काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ होत जाणारी उंचच्या उंच झाडे बघत असताना “कितीही उंच गेलात तरी पाळेमुळे कायम जमिनीवरच ठेवा” ही शिकवण जणू निसर्ग आपल्याला देत आहे अशी जाणीव होते. रस्त्यात मधून मधून लहान लहान झरे दृष्टीस पडतात. झऱ्याचे खळखळत वाहणारे पाणी अगदी ऐकतच बसावेसे वाटत होते. दगड, पाणी, पाण्यात वाढलेली लहान मोठी झाडे हे अगदी एकमेकांत इतके एकरूप झाले होते की जणू काही “सर्वांनी मिळून एकत्र येऊ आणि पुढे जाऊ” असे निसर्ग आपल्याला सुचवत आहे असे वाटते. काठावरील झाडांचे आणि आकाशाचे सरोवराच्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब तर खूपच सुंदर दिसत होते. आकाश, पाणी, झाडे ही आपापल्या जागी सुंदर आहेतच पण, ” स्वतःचा मी पणा सोडून एकमेकांच्या मदतीने एकमेकांचे सौदर्य अधिकाधिक खुलवू” हेच निसर्ग शिकवत आहे असे भासले. कारण पाण्यामुळे झाडे शोभत होती व झाडांमुळे पाणी.
ही एक फेरी पूर्ण करायला साधारणपणे सव्वा ते दीड तास लागला. या वेळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, निसर्ग हा जगातील इतका मोठा व महत्त्वाचा घटक असून देखील, ना त्याबद्दल कुठला गर्व, ना कोणाकडून कसलीच अपेक्षा व नेहमीच सर्वांना समान वागणूक देणारा हा एकमेव घटक कायम त्याचा मोठेपणा सिद्ध करत वर्षानुवर्षे सर्वांना अचंबित करत असतो. पण समाजातील काही व्यक्ती याच निसर्गाला फारच गृहीत धरतात व अनेक चुका करतात. मग मात्र कठोर होऊन कानउघाडणी करायला व स्वतःचे रौद्ररूप धारण करायला देखील निसर्ग मागेपुढे पाहत नाही.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
9.10.2023
2 responses to “सर्वश्रेष्ठ गुरू”
वा सुरेख वर्णन केले आहेस. तळे अगदी डोळ्यासमोर उभे राहते.फोटोमध्ये परत पाहिल्याचा आनंद मिळाला.
धन्यवाद.