Color Line हे नॉर्वे मधून निघणारे व नॉर्वेला जाणारे सर्वात मोठे समुद्र पर्यटन जहाज(cruise ship)आहे. ही कंपनी युरोपमधील समुद्र पर्यटनाची अग्रगण्य कंपनी आहे.
आम्ही या जहाजातून ओस्लो(नॉर्वे) ते किल(Kiel जर्मनी) असा प्रवास केला. दुपारी दोन वाजता जहाज ओस्लो वरून निघाले. आम्ही जहाजामध्ये शिरलो तेच मुळात सातव्या मजल्यावर. एकूण पंधरा मजली जहाज होते. आत आल्यावर सर्व भव्य दिव्यता बघून आम्ही आश्चर्यचकित झालो आणि तेथील “शॉपिंग स्ट्रीट” बघून आम्हाला एखाद्या “शॉपिंग मॉल” मध्ये असल्यासारखा भास झाला. तेथे विविध प्रकारची दुकाने होती ,विविध प्रकारची रेस्टॉरंट्स होती. लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगळा कक्ष होता. एके ठिकाणी स्पा, फिटनेस सेंटर, नाईट क्लब, कसीनो असे कक्ष होते. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये तुम्ही कितव्या मजल्यावर आहात व त्या मजल्यावर काय काय बघण्यासारखे आहे याचे फलक होते. विविध बाजूंनी लहान मोठी डेक होती. तिथे बसायला खुर्च्या होत्या त्यामुळे आम्ही समुद्र व आजूबाजूचा परिसर याचा आनंद घेऊ शकत होतो. डेक वर हेलीपॅड ची सुद्धा सोय होती. आम्हाला त्यादिवशी (रात्री साडेदहा वाजता) सूर्यास्ताचे विहंगम दृश्य बघायला मिळाले. आमची जहाजवरची खोली ही एका हॉटेलच्या खोलीसारखी सर्व सोयींनी युक्त होती. आणि खोलीच्या खिडकीतून अथांग समुद्र दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता जहाज कील मध्ये पोहोचले. तिथे आम्ही ओपन रूफ टॉप असलेल्या बसमधून पर्यटन भ्रमंती केली.
किल हे जर्मनी देशाच्या Schleswig-Holstein या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. येथे जर्मन आरमाराचा सर्वात मोठा तळ आहे. किल हे विविध आंतरराष्ट्रीय नौकानयनासाठी ओळखले जाते. येथे उच्चतंत्र जहाज बांधणी केंद्र आहे तसेच हे महत्त्वाचे सागरी वाहतूक केंद्र देखील आहे. येथे जगातील सर्वात व्यस्त कृत्रिम जलमार्ग (कालवा) आहे. किलबंदर हे बाल्टिक समुद्रात फिरणाऱ्या क्रूज जहाजांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
हे सर्व बघून आम्ही परत दुपारी दोन वाजता जहाजाने परतीच्या प्रवासाला निघालो व तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता नॉर्वे मध्ये पोहोचलो. आत्तापर्यंत फक्त चित्रपटांमधून किंवा एखाद्या फोटोमधून बघितलेले मोठे जहाज प्रत्यक्ष समोर बघणे व त्यामधून प्रवास करणे हा अनुभव खूपच विलक्षण व सुंदर होता.
– सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
2 responses to “Color Line- एक अविस्मरणीय अनुभव”
फार सुंदर वर्णन
धन्यवाद