काल सकाळी मस्त ऊन पडले होते. इथे थंडी सुरू झाल्यापासून सूर्यप्रकाश असणे ही गोष्ट खूप महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा सूर्य दिसेल तेव्हा बाहेर फिरून येणे ही गरज वाटायला लागली आहे. म्हणून काल आधीच Weather forcast मध्ये बघून त्याप्रमाणे नियोजन करून आम्ही “Ekebergparken” बघण्यासाठी निघालो.
बाहेर निघाल्यापासूनच खूप छान उत्साही वाटायला लागले. आधी आम्ही कधी त्या ठिकाणी गेलो नव्हतो त्यामुळे उत्सुकता पण होती. आमच्या घरा जवळच्या स्टेशनवरून तेथे थेट “ट्राम”नी आम्हाला जाता येत होते. तिथे पोहोचायला साधारणपणे 45 मिनिटे लागली. जाताना सर्व वातावरण इतके निसर्गरम्य आणि सुंदर होते त्यामुळे प्रवासाची मज्जा आणखीनच वाढत होती. वाटेत विविध रंगांची झाडे, ऐतिहासिक इमारती, घरे, नदी असे बघत आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर Oslo fjords दिसले व आम्ही तिथे बघतच राहिलो कारण पूर्ण fjords वर हळूहळू ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. हे असे दृश्य आम्ही नॉर्वेमध्ये प्रथमच पाहिले. एका बाजूला पूर्ण ऊन, दुसऱ्या बाजूला हळूहळू जमा होणारे ढग, त्यात डोकावणारा सूर्यप्रकाश आणि यातून जाणारी आमची ट्राम असा सुंदर अनुभव घेत आम्ही पुढे निघालो. पुढे एका चढावरून आमची ट्राम जायला लागली. या अशा सुंदर वातावरणातून वळणे घेत घेत अक्षरश: जादुई दुनियेत आम्ही प्रवेश केला असे वाटायला लागले. ढग आता पूर्ण रस्त्यावर आले होते आणि आम्ही उतरलो तेव्हा ढगांमधून आम्ही चालत जात होतो.
ट्राम मधून उतरल्यावर लगेचच बागेचा परिसर होता. ती जागा थोडीशी डोंगरावर असल्यामुळे चढत आम्हाला जायचे होते. झाडांची विविध रंगी पाने रस्त्यावर पडली होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कला शिल्पे करून ठेवली होती. असं सर्व बघत आम्ही वरती एका ठिकाणी पोहोचलो जिथून खालचा गावातला काही भाग आम्हाला दिसत होता ते आम्ही बघितले. फोटो, व्हिडिओ काढले. आणि तो पूर्ण भाग लगेच ढगांनी व्यापून गेला. अक्षरशः आम्हाला बघता यावे यासाठी ढग थांबले होते असे आम्हाला वाटले. अजून चढून गेल्यावर पुढे एक सपाट भाग होता तिथे पण खूप झाडे होती. सर्व परिसर खूप स्वच्छ होता. त्या परिसरात एक-दोन रेस्टॉरंट होती पण काल रविवार होता त्यामुळे ती बंद होती(!). इथे नॉर्वेमध्ये आल्यावर मला हा फरक खूप जाणवला म्हणजे शनिवार-रविवार आहे तर जास्ती लोक आले आहेत व रेस्टॉरंट मध्ये खूप गर्दी केली आहे, किंवा खूप ठिकाणी खाण्याच्या किंवा इतर अनेक वस्तू सुद्धा विकत मिळत आहेत असे अजिबात न होता इथे जास्तीत जास्त लोकं ही धावण्यासाठी, काही व्यायाम प्रकार करण्यासाठी, तर काही कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी असे आले होते. म्हणजे पूर्णपणे निसर्ग अनुभवणे किंवा निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाणे या गोष्टीत इथल्या लोकांचा भर दिसला.
आम्ही पण जरा वेळ तिथे बसलो व परत निघालो. परत येत असताना ऊन जाऊन परत अंधार पडायला सुरुवात झाली होती. कालपासून संध्याकाळी “साडेचारला” सूर्यास्त होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काल सकाळीच जाऊन आलो हे खूप चांगले झाले. आणि त्याच्यामुळे इतक्या दिवसाची आलेली मरगळ कुठेतरी दूर झाली व मनात उत्साह निर्माण झाला. आणि या जादुई दुनियेच्या सफरीने परत काहीतरी लिहावेसे वाटले.
2 responses to “जादुई दुनियेची सफर”
छान लिहिलंय…दृश्य समोर उभे राहते
धन्यवाद