घरातून निघतानाच नेमका पाऊस जोरात आल्यामुळे नक्की बाहेर जायचे का नाही अशी द्विधा मनस्थिती झाली खरी, पण तरी सुद्धा निश्चयाने Vigeland Park मध्ये जाण्यासाठी ट्राम मध्ये बसलेच. जोरात पाऊस आल्यामुळे रस्त्यावर लोकांची पळापळ चालू होती. काहीजण आपापले सामान सांभाळत आडोसा शोधताना दिसत होते. आमची ट्राम जेव्हा पार्क जवळ आली तेव्हा जवळ जवळ पाऊस थांबलाच होता त्यामुळे मला जरा बरे वाटले.
ट्राम मधून उतरल्यावर लगेच समोर बागेचा सुंदर नक्षीकाम केलेलं दरवाजा दिसतो. हा दरवाजा इतका आकर्षक आहे की प्रत्येकाला बाग बघायची आपोआप इच्छा होईलच. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर प्रथमदर्शी बागेचा भव्यदिव्य परिसर, समोर सरळ रेषेत दिसणारे मोठे कारंजे, सर्व बाजूंनी असलेली लहान, मोठी झाडे नजरेस पडली. एका बाजूला गवतातून गेलेली लहान पायवाट दिसली. तिथूनच आम्ही जाऊ लागलो. वाटेतील फुलांचे ताटवे पार करून आम्ही पुढे गेलो. पायवाटेने जाताना झाडांमुळे तयार झालेल्या कमानीखालून जाताना झाडांमधून पाणी अंगावर पडत होते, जणू काही सर्वांच्या स्वागतासाठीच ही झाडे पाण्याचा शिडकावा करत आहेत असा भास झाला. बागेच्या परिसरातील काही इमारती इतक्या छान दिसत होत्या की दुरून देखील शोभत होत्या. पाऊस पूर्ण थांबून आता सर्वत्र ऊन पसरले होते. त्यामुळे सगळीकडे थोडी ऊब जाणवत होती. ऊन पावसाचा खेळ आता थोडेच दिवस अनुभवायला मिळणार असे जाणवले. काही अंतर चालून गेल्यावर एक उतार लागला. तिथे खाली गेल्यावर एका गोल आवारात अनेक बाक बसायला ठेवले होते. त्यापुढे एक तलाव होता. तलावाकाठी जाताना अनेक लहान मुलांची शिल्पे दिसली. लहान मुलांच्या हालचाली, त्यांचे हावभाव खूप सुंदर प्रकारे टिपलेल्या दिसत होत्या.
इथे एक जुने Telephon booth आहे. ज्याचा वापर पुस्तके ठेवण्यासाठी केला आहे. त्यावर Ta En Bok, Gi En Bok म्हणजे Take A Book, Give A Book! असे लिहले आहे. किती छान कल्पना आहे ना ही? जास्तीत जास्त लोकांनी “पुस्तके” वाचावीत यासाठी केलेली ही कल्पना हल्ली बऱ्याच ठिकाणी दिसून येते. तिथे अनेक चांगल्या स्थितीतील पुस्तके दिसली त्यावरून अनेक जण याचा वापर करत असल्याचा अंदाज मी काढला.
पुढे एक पूल लागला. त्या पुलावर 50 हून अधिक Sculptures होती. या बागेचे वैशष्ट्य हेच आहे की या पूर्ण बागेमध्ये Famous Norwegian Artist Gustav Vigeland यांनी बनवलेली शिल्पे आहेत. नॉर्वे मधील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. 1869 मध्ये त्यांचा जन्म झाला. लहान वयातच ते Oslo मध्ये आले आणि पूर्ण शहर त्यांच्या कार्याने प्रभावित झाले. 1914 मध्ये त्यांच्या सर्व शिल्पांसाठी एक पार्क बनवण्याची कल्पना मांडली ती कल्पना 1931 मध्ये मान्य झाली. त्यांनी बनवलेली सर्व शिल्पे त्यांच्या मृत्यूनंतर Oslo शहराला दान दिली गेली आणि त्यांचे घर होते ते बनले Oslo मध्ये प्रसिद्ध असणारे “Vigeland Museum!”
ही सर्व शिल्पे bronze, Granite, Cast Iron पासून बनवलेली असून निरनिराळ्या भावना त्यात सुंदर प्रकारे दाखवल्या आहेत. अगदी लहान बाळापासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीगणीक बदलणाऱ्या भावभावनांचे दर्शन प्रत्येक शिल्पामधुन होताना दिसते. जरी ही सर्व शिल्पे नग्नावस्थेत असली तरीदेखील इतक्या सहजतेने व चांगल्या पद्धतीने सर्व शिल्पे व त्यातील भाव साकारले आहेत की त्यात कुठेही अतिरेक वा विचित्रपणा अजिबात वाटत नाही. आपण देखील अगदी सहजतेने ही पूर्ण बाग बघू शकतो.
बाजूला असलेल्या तलावाच्या सोबतीने आम्ही पुढे जात होतो. पुढे एक टप्पा चढून गेल्यावर एक मोठे कारंजे होते. सहा giants नी धरून ठेवलेले एक मोठे आकाराचे भांडे असे हे शिल्प आहे. ‘Mans struggle with life’s burden’ अश्या अर्थाचे हे भव्य शिल्प आहे व त्या भोवताली Symbol of regeneration and eternal life हे दर्शवण्यासाठी 5-5 झाडांचा समूह आहे त्यात मनुष्याच्या विविध वयोगटातील कलाशिल्पे आहेत. हे बघत असताना कारंज्यामधील पाण्याचे अंगावर शिडकावे येत होते व अगदी छान वाटत होते.
पुढे अजून वरच्या टप्यावर 17 मीटर उंच एकाच दगडात कोरलेले एक monolith दिसले ज्यात 121 मानवी आकृत्या होत्या. हा टप्पा एकदम वरच्या उंचीवर होता त्यामुळे खालील सर्व बाग आता बघता येत होती. त्या बाजूंनी लांबवर पसरलेली मोठी बाग होती. ऊन-पाऊस या खेळामुळे बागेचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते.
या जागेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या ऋतूनुसार किंवा वेगवेगळ्या वेळेनुसार या बागेचे सौदर्य अधिकाधिक खुलू लागते. वरील सर्व वर्णन हे उन्हाळ्यातील आहे. (उन्हाळा असून देखील पाऊस भरपूर होता!) त्यानंतर काही दिवसांनी Autumn च्या अगदी सुरवातीला मुद्दाम सकाळी लवकर आम्ही इथे आलो. सकाळची मज्जा तर काही वेगळीच होती, धुक्यात हरवलेल्या वाटा, ढगांमधून डोकावणारा सूर्य, कोवळे ऊन, पक्षांचा किलबिलाट असे सगळे सुंदर चित्र होते. हे सर्व बघत असताना अचानक आठवले की मागच्या वर्षी आपण ठरवले होते की, जेव्हा Autumn असेल तेव्हा मुद्दाम इथे येऊन फोटो काढायचे. ते काही कारणाने राहून गेले होते. पण या वर्षी नक्की यायचे असे आम्ही ठरवले.
या मोठ्या बागेव्यतिरिक्त Oslo मध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी Vigeland यांनी बनवलेली शिल्पे आहेत. इतकेच नाही तर Stockholm मधील Theil Gallery मध्ये देखील यांच्या शिल्पांचा सर्वात मोठा संग्रह आहे. हे सर्व जाणून घेतल्यावर व बघितल्यावर “Vigeland Park” हे इथल्या लोकांसाठी एक अभिमानाचे आणि आवडते ठिकाण का आहे याची कल्पना आली आणि खात्री पटली.
सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
30.09.2023.
3 responses to “Vigeland park”
बाग डोळ्यासमोर उभी राहते.आणि फोटोही खूप सुरेख. Zoom केले तरी स्वच्छ,स्पष्ट दिसत आहेत.
धन्यवाद
[…] प्रत्येक शिल्पामधुन होताना दिसते.https://athavaninchakhajina.com/?p=1604 या वर मी लिहलेले वर्णन वाचायला […]