Zaanse Schans

(या आधीच लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा.)

Easter ची सुट्टी आणि Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

1961 पासून 1974 पर्यंत Amsterdam मधील काही ठराविक भागातील जुनी घरे आणि पवनचक्क्या हालवून एक सुंदर ठिकाण निर्माण झाले ते म्हणजे Zaanse Schans! Zaanse Schans हे नेदरलँड्समधील Zaandik मध्ये वसलेले छोटेसे गाव आहे. हे नाव Zaan नदीवरून पडले आहे. आज हे खूप प्रसिध्द ठिकाण तर आहेच पण त्याचबरोबर उत्तम जीवनशैली, सुंदर हस्तकला यामुळे देखील नावाजलेले आहे.
बस स्टॉप पासून चालत जाताना जुन्या पद्धतीची घरे, दुकाने दिसू लागली. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठा नकाशा असलेले फलक होते. चालत जायच्या मार्गावर काही ठिकाणी फुलांची चित्रे काढली होती. वाटेत एक कोको फॅक्टरी होती. त्यामुळे सर्वत्र कोकोचा वास सर्वत्र पसरला होता. एका मोठ्या पुलावरून पलीकडे जात हे छोटेसे टुमदार गाव होते. त्या पुलावरून जाताना एका पुस्तकाच्या गोष्टीतच शिरत आहे असे वाटायला लागले.


सुरवातीला लहान लहान फुलांचे ताटवे बघून ही फुले जणू काही आमचे स्वागतच करत आहेत असे वाटले. ओळीने असलेल्या पवनचक्क्या व त्याच्या बाजूला असलेली हिरव्या व लाल रंगाची कौलारु घरे दिसू लागली. हा संपूर्ण परिसर चालत, सायकलवरून किंवा फेरी बोटीतून आपण पाहू शकतो. आम्ही चालतच जाण्याचे ठरवले. जसे आम्ही पुढे जात होतो तशी एक एक आकर्षक रीतीने सजवलेली जुन्या पद्धतीची घरे आम्हाला दिसत होती. घराबाहेरील बागेत विविध प्रकारची फुलझाडे होती. घराच्या बाजूने कालवा होता व कालव्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला लहान पूल बांधले होते. पाण्यातून बदके फिरत होती.


पुढे आम्हाला दुकाने दिसू लागली. काही दुकानात लहान लहान वस्तू होत्या. सुंदर नक्षीकाम केलेली काचेची भांडी, कप बशांचे विविध प्रकार होते. कुठे एका पांढऱ्या रंगाच्या कपबशीवर निळ्या रंगाने केलेले सुंदर नक्षीकाम तर कुठे लाल रंगाच्या काचेच्या प्लेट वर काढलेले चित्र होते की बघताच घेण्याचा मोह व्हावा. त्याचप्रमाणे घड्याळे, इतर अनेक शोभेच्या वस्तू सुंदर रीतीने मांडल्या होत्या. एक दुकान तर 1623 मध्ये बांधलेल्या सर्वात जुन्या घरात आहे. दुकान जसे जुने आहे त्याचप्रमाणे तेथे मिळणाऱ्या वस्तू देखील अगदी जुन्या व वैविध्यपूर्ण होत्या. पुढे एक चीज फॅक्टरी होती. तिथे पारंपरिक वेशभूषेत असलेले Cheese makers सर्वांचे स्वागत करून वेगवेगळ्या पद्धतीचे चीज नमुन्यासाठी देत होते. चीज चे सर्व प्रकार, त्यातील फरक किंवा चीज बनवण्याची पद्धत ह्याची सर्व माहिती ते सांगत होते.


इथे लाकडी बुटांचे – “Clogs” चे खूप महत्त्व आहे. शेतात काम करताना आजही लाकडी बूट वापरतात. एका छोट्याशा लाकडी तुकड्यापासून कमीत कमी वेळात किती सुंदर बूट बनवतात त्याचे प्रात्यक्षिक देत होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे बूट तिथे विकायला होते. निरनिराळ्या रंगात कोरीवकाम केलेले, वेगवेगळी चित्रे काढलेले बूट होतेच शिवाय लग्नासाठीचे वेगळे, बर्फामध्ये घालायचे वेगळे, काही खास कार्यक्रमासाठी, सणासाठी वेगळे अशा पद्धतीने बूट होते. एका बुटावर xxx (तीन फुल्या) असे चिन्ह होते. त्याला देखील ठराविक कारण आहे. Andrew नावाचा fisherman होता. जो ख्रिश्चन संत होता. त्याला पंधराशेच्या शतकामध्ये X (फुली) आकाराच्या वधस्तंभावरती खिळवले “crucify” केले. त्याच्या स्मरणार्थ हे चिन्ह असते. पण त्यामागे असलेल्या कारणांची अनेक वेगवेगळी मते आहेत. Amsterdam मध्ये पूर्वी तीन गोष्टींची भीती असायची. आग, पूर व साथीचे रोग! त्यापासून संरक्षण मिळावे म्हणून हे चिन्ह वापरत असत असे कारण प्रचलित आहे. आतून बाहेरून हे दुकान वस्तूंनी, आलेल्या लोकांनी भरून गेले होते. दुकानच्या बाहेर भिंतीवर निरनिराळ्या रंगाचे लाकडी बूट विशिष्ट आकारात लावले होते. एके ठिकाणी मोठे बूट बनवले होते ज्यात उभे राहून किंवा बसून फोटो काढता येत होते. हे सर्व बघताना कसा वेळ जात होता ते कळतच नव्हते.


एका दुकानात coffee, Ice cream, Coco milk असे निरनिराळे पर्याय होते. थंडी खूप असल्याने Ice cream न घेता आम्ही Coco milk घ्यायचा विचार केला. Coco milk आपण सुद्धा तयार करू शकत होतो त्यासाठी विशिष्ट क्रमाने सूचना लिहून सर्व साहित्य ठेवले होते. आम्ही गरम गरम Coco milk घेऊन त्या थंडी मधून फिरू लागलो. पूर्वीच्या काळातील हस्तकला, इतिहास, संस्कृती ह्याचे आजच्या काळात केलेले उत्तम सादरीकरण बघणे म्हणजे जणू सर्वांसाठी एक पर्वणीच आहे! अर्थात ज्याच्या नावातच “शान” आहे असेच हे शानदार गाव आहे. हे सर्व मनात साठवून आम्ही तिथून निघालो.
संध्याकाळी आम्ही मुख्य Amsterdam सिटी बघायला गेलो. मुख्य रेल्वे स्टेशनची मध्यभागी असलेली इमारत व आजूबाजूच्या अनेक लहान मोठ्या नव्या जुन्या इमारती हे सर्व बघायला झालेली गर्दी, हॉटेल्स, विकायला ठेवलेल्या वस्तू यांनी हा सगळा परिसर भरून गेला होता. तिथल्या कालव्यातून जाणारी बोटीची फेरी आम्ही घेतली. व्हेनिस शहरांप्रमाणेच Amsterdam हे कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. ह्याला “Venice of the North” – उत्तरेचे व्हेनिस असे पण म्हणले जाते. फेरी बोट अतिशय छान रेखीव होती. आतमध्ये बसायला सोफा होता. प्रत्येकासाठी स्वतंत्र टेबल होते. सर्व बाजूंनी असलेल्या काचेच्या खिडक्यांमुळे आजूबाजूचा परिसर छान दिसत होता. हळूहळू आमची बोट पुढे जाऊ लागली. थोड्या थोड्या अंतरावर बोटीत असलेला गाईड माहिती देत होता. वाटेत एक जुने हॉटेल दिसले त्याची गंमत म्हणजे त्या जागी राहणाऱ्या लोकांनी त्यांची जागा हॉटेलसाठी द्यायला नकार दिल्यामुळे मध्यभागी दोन जुनी घरे व बाजूंनी मोठे आलिशान हॉटेल असे बांधण्यात आले. ती घरे आजही त्याच जागेवर आहेत. इथे कालव्यावर बांधलेले 1200 पेक्ष्या जास्त पूल आहेत. पूर्वी प्रत्येक पुलासाठी एक गार्ड ची खोली असे. तंत्रज्ञानामुळे आता त्या खोल्यांचा वापर होत नसल्यामुळे आता त्या खोल्या राहण्यासाठी भाड्याने देतात हे ऐकून मज्जा वाटली. रेल्वे स्टेशन जवळ नवीन एक सायकल स्टँड बांधला आहे. जो खूप मोठा तर आहेच पण सांगायचे कारण म्हणजे पूर्ण सायकल स्टँड हा कालव्याच्या खाली बांधला आहे. तिथे 10000 च्या आसपास सायकली मावतात. ह्या संपूर्ण इमारतीची रचना करताना इतिहास व कला या गोष्टी पण मांडल्या आहेत. इथले लोक किती सायकल प्रेमी आहेत याचा प्रत्यय आम्ही देखील प्रत्यक्ष घेतला.


काही काही ठिकाणे बघताना आपल्या आजूबाजूचे वातावरण, हवामान पण अगदी प्रत्येक ठिकाणाला साजेसे होते आणि आपल्यामध्ये असलेला उत्साह अजूनच वाढतो. अगदी तसेच आमचे झाले. आता पुढचे जे ठिकाण होते त्याबद्दल मनात आनंद, उत्सुकता, मज्जा, थोडी शंका असे सगळे विचार एकत्र होते कारण ते ठिकाण होते Tulip Garden!!!

क्रमशः

Tulip Garden विषयी वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा.

Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

नॉर्वे देशातील प्रवास वर्णने आणि अनुभव वाचण्यासाठी खालील लिंक click करा .

नॉर्वे – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

स्वित्झर्लंड विषयी वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा.

स्वित्झर्लंड – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

ग्रीस विषयी वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा.

ग्रीस – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
25.4.2023

115

8 responses to “Zaanse Schans”

  1. किती छान वर्णन!प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्यासारखे फोटोंमुळे वाटले.

  2. खूप छान वर्णन आहे. प्रत्यक्ष बघितल्यासारखे वाटते. अशीच लिहीत रहा

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links