Brussels

(या आधीचे सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.)

Easter ची सुट्टी आणि Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Zaanse Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सकाळी आठ वाजता आमची बस निघणार होती. त्यामुळे स्टेशन वर जाऊन कॉफी व खाणे घेतले आणि बस मध्ये जाऊन बसलो. साडेदहा वाजता आम्ही Brussels मध्ये पोहचलो. खुप ऐनवेळी ठरल्यामुळे आणि एकच दिवस हातात असल्यामुळे ठराविक किंवा विशिष्ट ठिकाण बघायचे असे काही ठरवले नव्हते. अंदाजे फिरताना जे काही दिसेल त्यावर ठरवू असे म्हणून आम्ही चालत निघालो.
सुरवातीला आम्हाला Brussels Cathedral दिसले. हे St.Michael and St. Gudula यांचे असून 1047 मध्ये बांधले गेले. त्या समोर असलेला Baudouin राजाचा पुतळा लक्ष वेधून घेत होता. शहराच्या मुख्य भागात असलेली ही भव्यदिव्य, गगनभेदी इमारत बघितल्यावर सर्वांचे पाय आपोआप त्या दिशेला वळत होते. आमच्याकडे एक तर फारच कमी वेळ असल्यामुळे लगेच आम्ही तिथून निघालो. सुट्टीचा दिवस असल्यामुळे एके ठिकाणी नुकताच एक बाजार लागत होता. निरनिराळ्या उभारलेल्या तंबू मधून अनेक प्रकारची अत्तरे, चॉकलेट, कपडे, दागिने या सर्व वस्तू मांडल्या होत्या. एक दोन ठिकाणी खूप सुंदर चित्रे मांडून ठेवली होती. Brussels व त्या आजूबाजूचा परिसर चित्रातून अगदी हुबेहूब रेखाटण्याचा प्रयत्न केला होता.

काही अंतर पुढे गेल्यावर तर आमची खात्री पटली की एका दिवसात गडबडीत का होईना Brussels ला येऊन जाण्याचा निर्णय हा अगदी बरोबर होता, कारण आमच्या समोर होते इथले प्रसिद्ध Grand place!
चारी बाजूंनी असलेल्या आकर्षक ऐतिहासिक इमारती व त्यामध्ये असलेला चौक हे सर्व पाहताना आम्ही तर थक्क झालो. कुठ पासून बघायला सुरुवात करायची हेच सुरुवातीला लक्षात येईना. या जागेला “Grote Markt” म्हणजेच big market असेही म्हणतात. इथे बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात. अत्यंत सुंदर अश्या या चौकाचे रूपांतर 1998 मध्ये UNESCO World Heritage site मध्ये झाले. एका बाजूला असलेली Town hall ची इमारत 1401 ते 1455 मध्ये बांधली गेली. इमारतीच्या आत जाण्यासाठी अनेक लहान लहान कमानी, त्यावर चढवलेले मजले, वरच्या बाजूला चारी बाजूंनी असलेले लहान मनोरे तसेच, उंच च्या उंच जाणारे मोठे मनोरे व त्यावर असलेला Saint Michael चा राक्षसाचा वध केलेला पुतळा. इतकेच नाही तर संपूर्ण इमारतीवर केलेले शिल्पकाम, नक्षीकाम हे सर्व डोळे दिपवून टाकणारे होते.


हा संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेला होता. काही जणांचे ग्रुप आलेले दिसत होते. त्यांचे गाईड खुणेसाठी ठराविक छत्री, झेंडे घेऊन सर्व ग्रुप बरोबर फिरत होते. परिसराची माहिती देत होते. एके ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळण्यात माणसे रमली होती. लहान लहान मुले या गर्दीतून सुद्धा वाट शोधून त्यांच्या परीने स्वत:चे मनोरंजन करत होती. हे सर्व बघताना मला जाणवले की इतिहासकालीन असलेल्या या चौकाने किती जणांची सुखं- दु:ख जवळून पहिली असतील, युद्धामुळे झालेली हानी, आगीमुळे सोसायला लागलेले चटके याचा साक्षीदार असलेला हा चौक आज Brussels च्या अभिमानाचा विषय आहे.
जसे जसे आम्ही चालत पुढे जात होतो तसे इमारतींवर असलेली सुंदर चित्रे आमच्या समोर येत होती. काही काही चित्रांमधून केलेली विनोद निर्मिती असेल किंवा काही Cartoon Character घेऊन काढलेली चित्रे असतील. हे इथले वैशिष्ट्य आहे की इथल्या इमारतींवरती काढलेल्या चित्रांमध्ये त्यांनी Cartoon Character वर जास्ती भर दिला आहे. त्यामुळे इथला हा “Comic Route” अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे.


तिथून आम्ही निघालो काही अंतर गेल्यावर एका चर्च मधून सुंदर स्वर कानावर पडले म्हणून आम्ही न राहून आत गेलो. आत एक माणूस सुंदर Pipe Organ वाजवत होता. चर्चचे संपूर्ण आवार स्वरांनी अगदी भरून गेले होते. मेणबत्त्या तसेच अनेक दिव्यांनी आतील परिसर उजळत होता. खिडक्या, त्यावर असलेली चित्रे या सगळ्या प्रकाशात छान शोभून दिसत होती. हे सर्व शांतपणे बघून तिथून आम्ही निघालो.

“Manneken Pis” हे खरं तर जगप्रसिद्ध आहे. आम्ही पण तो लहान मुलाचा पुतळा बघितला. एका कोपर्‍यात असलेला हा लहान पुतळा बघताना जरा नवल वाटले. कारण तसा आकाराने खूपच लहान आहे. पण म्हणतात ना “मूर्ती लहान पण कीर्ती महान”!
आता Belgium ला आल्यावर Waffles न खाता कसे आम्ही परत जाणार! म्हणून आम्ही आमचा मोर्चा Waffles च्या दुकानाकडे वळवला. दुकानात गेल्यावर तेथे Waffles चे निरनिराळे प्रकार व त्याच्या किमती असलेले बोर्ड ठेवले होते. हे फोटो बघूनच भूक लागली. फारसा वेळ न घालवता आमच्यासमोर लगेच मस्त Chocolate, Starwberry असलेले व त्यावर Caramel Syrup व Cream घातलेले Waffles आले. ते खाऊन नंतर आम्ही काही दुकाने फिरलो. असे म्हणतात ना शेवट गोड तर सर्वच गोड, त्याचप्रमाणेच मस्त waffles खाऊन व थोडीफार Chocolate खरेदी करून आम्ही आमच्या या एक दिवसाच्या ट्रीप ची सांगता केली.


परत येताना बस मध्ये मुद्दाम वरच्या बाजूला आम्ही बसलो. समोर पूर्ण काच असल्यामुळे संपूर्ण परिसर छान बघता येत होता. आणि जी काही ठिकाणे बघायची राहिली होती त्याचे सुद्धा मनसोक्त फोटो आणि व्हिडिओ काढता येत होते. रात्री परत Amsterdam मध्ये पोहोचलो. आता आमची ट्रीप जवळ जवळ संपलीच होती, पण पुढचा अर्धा दिवस अजून हातात होता आणि तो अर्धा दिवस नुसतं हॉटेल मध्ये बसून आम्हाला घालवायचा नव्हता.

क्रमशः

(शेवटचा भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.)

Botanical garden Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सौ. अनुराधा अमरेंद्र उकिडवे.
12.5.2023

जर्मनी – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

पर्यटन माहिती – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

सहज मनातले – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)

2 responses to “Brussels”

  1. […] ह्या सदरातील आधीचे लेख :Easter ची सुट्टी आणि Amsterdam – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)Zaanse Schans – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)Keukenhof – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com)Brussels – आठवणींचा खजिना (athavaninchakhajina.com) […]

लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खालील Comment Box मध्ये नक्की लिहा…

माझ्या विषयी थोडेसे…

नमस्कार, मी सौ.अनुराधा अमरेन्द्र उकिडवे. मी एक गृहिणी आहे. मार्च 2022 मध्ये मी नॉर्वे मध्ये आले. मुळातच मला फिरायची खूप आवड आहे. त्यामुळे इथे आल्यावर लगेचच आम्ही फिरणे चालू केले. मग मला असे जाणवले की नॉर्वे बद्दल भारतात बऱ्याच लोकांना (खास करून माझ्या ओळखीमध्ये) माहीत नाहीये. त्यामुळे मी माझे सर्व अनुभव असलेले लेख लिहायला सुरवात केली. ते सर्व लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि जो आनंद मला लिहताना मिळतोय तसाच आनंद वाचकांना लेख वाचताना मिळावा याच हेतूने मी माझा ब्लॉग सुरू करत आहे.

Loading

Contact Info



वाचकांच्या प्रतिक्रिया


Social Links